संदीप पाठक यांनी ह्या प्रसिद्ध नाटकाला पुन्हा एकदा रंगमंचावर आणलं आहे.
लहानपणी मी ह्या नाटकाचे प्रयोग ब-याचदा बघितले होते आणि कॅसेट तर आजही ऐकते.
हे नाटक म्हणजे एकपात्री प्रयोगामधलं शिवधनुष्यच आहे आणि ते उचलून धरण्याचा प्रयत्न संदीप पाठक यांनी केला आहे पण तो कुठेतरी केविलवाणा वाटत आहे.
कालच्या प्रयोगाला अगदी पाच-पन्नासच मंडळी होती कारण ५००-१००० च्या नोटांचा गोंधळ झाल्यामुळे तिकिटं बहुदा विकली गेली नव्हती.
कालचा प्रेक्षकवर्ग कमी होता म्हणून असेल किंवा नेमकं काय असेल माहीत नाही पण संदीप पाठक यांना ह्या नाटकाला पेलता आलेलं नाही.
मूळ नाटक बघितलेलं असल्यामुळे त्याच्याशी तुलना होणं साहजिकच आहे, पण तरी मी समोर उभ्या असलेल्या कलाकाराचा अभिनय बघायचा प्रयत्न केला.
तिसरी घंटा झाल्यावर नाटकाचं नाव, कलाकार अशी थोडीफार माहिती दिली जाते पण तसं काही न-होता पडदा लगेच उघडला आणि संदीप पाठक समोर आले. प्रेक्षकांना नमस्कार करत त्यांनीच नाटकाबद्दल माहिती दिली आणि प्रयोगाला सुरूवात झाली.
मराठवाड्यातल्या एका खेडेगावत राहणा-या गर्भश्रीमंत शेतक-याच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे.त्याचा मुलगा लंडनला शिकायला जातो,एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यांचं लग्न ठरल्यापासून ते साक्षात लंडनमधल्या प्रशस्त हॉल मधे होण्यापर्यंतचा प्रवास ह्या नाटकातून आपल्यासमोर मांडण्यात आला आहे.
नाटक एकपात्री आहे त्यामुळे आवाजाच्या वेगवेगळ्या लकबीतून, चढ-उतारातून घरामधे असणा-या म्हाताऱ्या-कोता-यांपासून ते पोरांपर्यंत सर्व पात्रांना जिवंत करणं हे मोठं कसरतीचं काम आहे.
बाप्पा म्हणजे कुटुंबप्रमुख ह्यांचा धीरगंभीर आवाज, काशिनाथ म्हणजे त्यांच्या मुलाचा जरा बारीक पण वेस्टर्न अॅक्सेंट असणारा आवाज, बबन्या ह्या तरतरीत पोराचा उत्साह ओसंडून वाहणारा आवाज असे आणि गावातल्या वेगवेगळ्या मंडळींच्या बोलण्याच्या लकबी, घरातल्या बायकांच्या बोलण्याची ढब असा सगळा एकंदरीत आवाजावर बेतलेला अवघड मामला आहे हे नाटक म्हणजे!
श्री.लक्ष्मणराव देशपांडे यांचा आवाज जसा लागायचा अगदी तस्साच संदीप यांचा लागावा अशी अपेक्षा नाही पण, निदान त्या व्यक्तिरेखा ठळकपणे डोळ्यासमोर उभ्या राहाव्यात इतपत तरी चढ-उतार आवाजामधे असायला हवेत. नाटकाच्या सुरूवातीला थोडाफार आवाज लागत होता पण नंतर एकसुरी होत गेलं. त्यामुळे झालं असं की बाप्पा(काशिनाथचे वडील), बबन्या आणि काशिनाथ ही मंडळी डोळ्यासमोर उभी राहतच नव्हती.
ह्या व्यक्तिरेखांमधलं माझं आवडतं पात्र आहे बबन्या. त्याचे संवाद, बोलतांना इंग्रजी शब्दांची केलेली सरमिसळ हे मनोरंजक आहे पण ते समोर उभ्या असलेल्या कलाकाराला सादर करताच आलं नाही :( मला फार वाईट वाटलं,असो.
तुम्ही जर मुळ नाटक बघितलं असेल तर संदीप पाठक यांचं सादरीकरण न-पटण्यासारखं आहे पण, पहिल्यांदा बघत असाल तर एक घटका करमणूक होऊ शकेल.
शेवटी इतकंच म्हणेन की, संदीप पाठक यांना अजून कसून मेहनत घ्यावी लागणार आहे तरच कुठे व-हाड 'व-हाड' वाटेल.
No comments:
Post a Comment