नुकतीच उगवलेली चंद्रकोर बघितलीस तू? जरा लालसर झाक आहे तिला..जणू तारूण्याने रसरसलेल्या, प्रणयासाठी आसुसलेल्या कोवळ्या सखीच्या डोळ्यात असलेला मादकपणाच..पण थोड्या वेळातच हा रंग बदलेल आणि शुभ्र झळाळी ल्यालेली ती चंद्रकोर आकाशामधे चमकत राहिल..असंच काहीसं होतं जेंव्हा तुला भेटायची आस असते..तू भेटणार ह्या विचारानेच माझं तारुण्य फुलून येतं आणि तु मिठीत घेतल्यावर सगळा बहर रिता होतो पण मी मात्र समाधानाने ओतप्रोत भरून पावते..
Monday, January 30, 2017
Sunday, January 15, 2017
मौत का कुँआ
लाल डब्यातून प्रवास करतांना जर पुढच्या सिटवर बसायची वेळ आली तर - मौत का कुँआ चा थरार सहन करावा लागेल ही मनाची तयारी करुन, आपल्याच बॅगचा बेल्ट सीटच्या हँडलला अडकवून स्वत:च्या सुरक्षेची तरतूद करुन घ्यावी!!
लहानपणी कधी माझी हिम्मत झाली नाही मौत का कुँआ बघायची पण आज एस.टी.महामंडळाच्या कृपेने तो अनुभव माझं आयुष्य परिपूर्ण करुन गेला!!
मी नगर-पुणे स्पेशल हिरकणी बसने आज यायला निघाले. दाराजवळच डाव्या हाताला असलेल्या पहिल्या सीटवर जागा मिळाली. पाय लांब करायला मोकळी जागा आहे म्हणून जरा बरं वाटलं,बॅग ठेवली आणि कानात हेडफोन्स लावून निवांत बसले. १०मिनीटात गाडी निघाली, नगरच्या दुस-या स्टँडमधून गाडी बाहेर पडली आणि ड्रायव्हर च्या अंगात काहीतरी संचारल्यासारखं झालं.
रस्त्यावर एकही गाडी आमच्या बसच्या पुढे नसली पाहिजे ह्या नियमानुसार त्याने कर्कश हाॅर्नचा मारा करत गाडी फुल्ल स्पीडमधे सोडली. वाटेत येणारा ट्रक असू देत की बाईकवाला जोवर तो बाजूला होत नाही तोवर त्याच्या जिवावर उठल्यासारखा सतत हाॅर्न वाजवत त्याला अगदी खेटून गाडी चालवत होता. रस्ता लहान असू दे की मोठा त्याने कशाचीही तमा बाळगली नाही आणि अॅक्सलरेटरवरची पायाची पकड काही सैल केली नाही!!
बसमधे बसल्यावर थोडी झोप घ्यावी असा माझा विचार ह्या रोलर-कोस्टर राईडमुळे पार धुवून गेला :(
माझी बॅग छातीशी घट्ट धरून मी डोळे सताड उघडे ठेऊन बसले होते. सतत असं वाटत होतं की आज रस्त्यावरचा एखादा बाईक-कार नाहीतर ट्रकवाला मरणार आहे किंवा आमची बस तरी इतक्या भयानक स्पीडमुळे उलटी-पालटी होणार आहे!!
पुण्याला येतांना वाघोलीला नेहमी ट्रॅफिक जॅम असतो, ज्यामधे अडकायची वेळ शत्रूवरही येऊ नये अशी मी प्रार्थना करते पण, आज मात्र तो जॅम लागावा अशी तिव्र इच्छा होत होती जेणेकरून ह्या रेकणा-या बसला जरा तरी ब्रेक लागला असता. पण कसलं काय आज रस्ता नेमका मोकळा होता, मग काय ड्रायव्हर चेकाळलाच!! त्याने गाडी नसून सायकल चालवत आहे ह्या आवेशात गाडी पार शिवाजी नगरला आणूनच थांबवली!! २.३०ला सुटलेली गाडी डायरेक्ट ४.४५ला बस स्टँड मधे येऊनच थांबली!!!
आई ग!!
आजवर कित्येक वेळा मी बसने प्रवास केला आहे पण आज आलेला अनुभव भयंकर होता, कधी एकदा बस थांबते आणि मी खाली उतरते असं झालं होतं :(
Subscribe to:
Posts (Atom)