Friday, July 7, 2017

जादू

काय जादू असते यार पावसाच्या पाण्यात माझ्या गच्चीतली सगळी झाडं अगदी तरारून फुलली आहेत :) :) :) पावसाळ्याआधी मी दररोज दोन वेळेस पाणी घालायचे पण इतका टवटवीतपणा क्वचितच दिसत होता.

साधं लहानसं रोपटं असू देत किंवा मोठ्ठं झाड पावसाच्या पाण्याचा परिसस्पर्श झाला की त्यातलं सोनं झळाळून निघतंच :)
रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर डोंगर आहे त्यावर पुष्कळ झाडी आहे पण कधी मान वळवून बघितलं जात नव्हतं पण, पहिला पाऊस झाला आणि अहाहा! काय नैसर्गिक सौंदर्य खुलून समोर आलं की ते बघतांना हरखून जायला होतं :)

डोंगराळ भागात ट्रेकला वगैरे गेल्यावर तर अस्सल १००नंबरी सोन्यासारखा उजळळेला, निरागस मुलाच्या खट्याळपणे स्वतःच्या नादात खेळणारा-हसणारा-डोलणारा निसर्ग बघितला की आत आत अगदी सुखावल्यासारखं होतं. ते रुप डोळ्यात किती किती म्हणून साठवावं असं वाटायला लागतं. फक्त डोळे किंवा बुद्धी असे अवयव नाही तर पूर्ण शरीर टिपकागदासारखं तो सुखद अनुभव सामावून घेत असतं.माझे तर शब्द, विचार सगळं थिटे पडतात आणि मनोमन मी त्या निसर्गाला नटवणा-या शक्तीपुढे नतमस्तक होते.
अशा निसर्गाच्या सानिध्यात असतांना जे काही आत्मिक सुख मिळतं ना ते शब्दात मांडण्यापेक्षा अनुभवण्यात खरी मजा आहे

Thursday, July 6, 2017

मखमली पाऊस

अहाहा मस्त मखमली पाऊस पडतोय आत्ता :) :) :) :) मला हा खास पुणे स्पेशल पाऊस प्रचंड आवडतो :) :) :) शांतपणे येणा-या जलधारा भोवती हळुवार पसरत जाणारं धुकं आणि हवेत भरून उरणारा किंचित बोचरा गारवा अहाहा :) :) :) अशा पावसात भिजायचं नसतं तर बॅल्कनी किंवा खिडकीमधे उभं राहून फक्त डोळ्यांनी ते सुख अनुभवायचं असतं :) :) :) बघता बघता कधी पाऊस थांबतो ते कळत नाही पण मनाला आलेला तजेला मात्र दिवसभर पुरतो :) :) :)

Wednesday, July 5, 2017

गरज

आमच्या आॅफिसमधे खूप वेगवेगळी झाडं, फुलझाडं लावलेली आहेत. ठराविक काळानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातात म्हणजे त्यांना आकार देणं, छाटणी करणं वगैरे. आॅफिसच्या पाय-या चढतांना डाव्या बाजूला सुपारीची झाडं आहेत आणि त्यांच्या पायथ्याशी गवत किंवा काही फुलझाडं लावलेली असतात. रोज त्या इवल्या-इवल्या रोपांना आलेली फुलं बघत जाण्याचा मला छंदच लागला आहे.

गेल्या काही दिवसात एका झाडाभोवती असणारी झेंडूच्या फुलांची रोपं दिसेनाशी झाली पण तिथे असलेली माती नांगरल्यासारखी पण दिसली. मग दोन-तीन दिवसांनी तिथे सुंदर असं ताजं हिरवं लाॅन दिसलं पण मला प्रश्न पडला ती झेंडूच्या फुलांची फुलझाडं गेली कुठे? माझं कुतूहल शमविण्यासाठी मी बागकाम करणा-या काकांना तसं विचारलं, त्यावर त्यांनी अगदी सहज उत्तर दिलं - मॅडम त्या फुलांचा बहार संपला आता म्हणून ती इथून काढून टाकली.

त्यांचं उत्तर ऐकून मी एक क्षण स्तब्ध झाले पण लक्षात आलं हा तर नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतो.
त्या फुलझाडांचं काम होतं फुलांनी बहरून त्या जागेला शोभा आणणं पण जेंव्हा बहार ओसरला तेंव्हा त्यांची गरज संपली म्हणून त्यांना उचलून कोप-यात टाकलं आणि ती जागा हिरव्या ताज्या लुसलुशीत गवताने घेतली!!

साधा नियम आहे - जोवर तुम्ही काही देण्यालायक किंवा काम करण्यालायक आहात तोवर तुमची गरज असेल, एकदा ते काम संपलं किंवा तुम्ही अपेक्षित काम करणं कमी किंवा बंद झालं की मग रिप्लेस व्हायला तयार रहा. कारण दुसरा कोणीतरी तसंच काम तुमच्या इतकं किंबहुना तुमच्यापेक्षा सरस करण्याच्या तयारीचा असतोच.
आॅफिसमधे तर हा गोल्डन रूल आहे पण घरामधे किंवा नातेसंबंधामधे पण असं सहज घडतं क्वचित आपल्या नकळत किंवा ठळकपणे :(