काय जादू असते यार पावसाच्या पाण्यात माझ्या गच्चीतली सगळी झाडं अगदी तरारून फुलली आहेत :) :) :) पावसाळ्याआधी मी दररोज दोन वेळेस पाणी घालायचे पण इतका टवटवीतपणा क्वचितच दिसत होता.
साधं लहानसं रोपटं असू देत किंवा मोठ्ठं झाड पावसाच्या पाण्याचा परिसस्पर्श झाला की त्यातलं सोनं झळाळून निघतंच :)
रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर डोंगर आहे त्यावर पुष्कळ झाडी आहे पण कधी मान वळवून बघितलं जात नव्हतं पण, पहिला पाऊस झाला आणि अहाहा! काय नैसर्गिक सौंदर्य खुलून समोर आलं की ते बघतांना हरखून जायला होतं :)
डोंगराळ भागात ट्रेकला वगैरे गेल्यावर तर अस्सल १००नंबरी सोन्यासारखा उजळळेला, निरागस मुलाच्या खट्याळपणे स्वतःच्या नादात खेळणारा-हसणारा-डोलणारा निसर्ग बघितला की आत आत अगदी सुखावल्यासारखं होतं. ते रुप डोळ्यात किती किती म्हणून साठवावं असं वाटायला लागतं. फक्त डोळे किंवा बुद्धी असे अवयव नाही तर पूर्ण शरीर टिपकागदासारखं तो सुखद अनुभव सामावून घेत असतं.माझे तर शब्द, विचार सगळं थिटे पडतात आणि मनोमन मी त्या निसर्गाला नटवणा-या शक्तीपुढे नतमस्तक होते.
अशा निसर्गाच्या सानिध्यात असतांना जे काही आत्मिक सुख मिळतं ना ते शब्दात मांडण्यापेक्षा अनुभवण्यात खरी मजा आहे
No comments:
Post a Comment