नवरात्र आलं की लहानपणीच्या दोन गोष्टी आवर्जून आठवतात - एक म्हणजे आम्ही राहत होतो त्या गल्लीत होणारा जोशपूर्ण गरबा आणि कुमारिका म्हणून कोणा-कोणाकडे फराळाला जायची मजा :)
आमच्या गल्लीमधे एक जैन मावशी राहत होत्या त्या आणि त्यांच्यासोबत अजून ब-याच जणी देवीच्या मूर्तीची स्थापना करायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ देवीच्या सगळ्या आरत्या म्हणणे, मग जोगवा मागणे असं अगदी साग्रंसगीत चालू असायचं.
साधारण रात्री ९च्या सुमाराला सगळे जण गरबा खेळायला त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जमायला लागायचे. त्यांच्या अंगणामधे एक मोठ्ठा फोकस लावलेला असायचा आणि दोन स्पीकर्स मधून वेगवेगळी गाणी वाजत असायची. सुरूवातीला चिल्ले-पिल्ले सुरु करायचे मग आम्ही शाळकरी मुलं-मुली मग काॅलेजला जाणारे, असे एक एक करत गोळा झाले की मग अगदी जोमात गरबा चालू व्हायचा. पहिलं गाणं अगदी नियम असल्यासारखं 'पंखीडा तू उडके जाना पावागढ रे, माताजी को मिलके बोलना गरबा खेलेंग,पंखीडा ओ पंखीडाss' हेच असायचं. तेंव्हा काही समजत नव्हतं काय आहे हे गाणं पण ठेका चांगला होता म्हणून सगळे ताल धरायचे आणि सुरु!
अशी दोन-तीन धीम्या गतीची गाणी झाली की नंबर यायचा आमच्या फेव्हरेट पाॅप-राॅक पंजाबी गाण्यांचा-दी फेमस दलेर मेंहदी! काय गाणी होती अरे त्याची फुल्ल-आॅन :D :D तुनक तुनक तुन तारारा, बोलो तारारारा, हो गयी तरी बल्ले बल्ले होजाएगी बल्ले बल्ले एक ना दोन सगळीच भन्नाट गाणी :D :D :D ह्या गाण्यांमधे जो स्पीड आहे नं ओ गाॅड आम्ही तर इतके दमून जायचो पण नाचायचं कोणी थांबवू शकायचं नाही!!
छकडी की काहीतरी एक प्रकार असतो त्यात टिप-या नाही वापरत फक्त ६ पावलं फेर धरून नाचायचं एकाच रांगेत सगळ्यांनी, ती उलटा चष्मा मधली दया करते ब-याचदा तो प्रकार. तर ह्या दलेर मेंहदीच्या गाण्यावर तसं नाचतांना अक्षरशः चक्कर येईल इतक्या फास्ट करायचो नाही नाही आपोआप व्हायचं आमच्याकडून :P :P
रोज अगदी २-३ तास खेळायचो आम्ही गरबा पण थकवा आला आहे आणि पाय दुखत आहेत म्हणून आज नको खेळायला असं कधीच वाटलं नाही. जैन मावशी, पाटील मावशी अशा ब-याच जणी आम्हा गरबा खेळणा-यांना सरबत, पाणी, मसाला दूध असं काही-बाहि देऊन सतत चार्ज राहायला मदत करायच्या. भन्नाट होतं ते सगळंच :D :D :D
हां तर दुसरी गोष्ट अशी की मला कुमारिका म्हणून फराळ करायला बोलावलं जायचं. आमच्या समोर एक मामीजी रहायच्या त्या नवरात्रीचे उपवास करत होत्या. त्यांच्याकडे अशी पद्धत होती की जी मुलगी अजून 'नैसर्गिकरित्या' मोठी झाली नाही तिला बोलवायचं-उपवासाचा खाऊ दयायचा आणि दक्षिणा पण दयायची किंवा पूजा करायची. मी शाळेला निघायच्या आधी रोज मला त्या बोलवत आणि गरमा-गरम साबुदाणा खिचडी,केळ असा खाऊ आणि १-१.२५रू. दक्षिणा म्हणून देत. आपल्याला दक्षिणा मिळते ह्या गोष्टीचं त्या वयात मला फार अप्रूप वाटायचं आणि आपण इतके लहान असून आपली पूजा वगैरे केली जाते ह्या विचाराने उगाच काहीतरी 'खास' आहोत अशा खुशीतच मी शाळेत जायचे :D :D :D
#आठवणी_लहानपणाच्या
No comments:
Post a Comment