Thursday, September 19, 2019

#मुक्कामपोस्टUK : गमती-जमती

यूके मधे आताशा थंडीची चाहूल लागायला लागली आहे. सकाळचं तापमान म्हणजे ७वा साधारण ७° ते ९° असतं..
आजही मी घराबाहेर असणा-या 'चिल्ड' वातावरणात प्रवेश केला अन् तोंडातून उच्छावासासोबत धूssर बाहेर पडायला लागला 😜 हाताची बोटं, नाकाचा शेंडा क्षणाधार्त गारठले!
नाही म्हणायला सूर्यनारायणचं दर्शन झालं खरं पण तोही नुकताच ढगांच्या दुलईतून बाहेर पडत होता 😊
स्टेशनला पोहोचले आणि ट्रेनची वाट बघत होते तेंव्हा अचानक तीव्र इच्छा झाली की ह्या गारठ्यामधे गरमा-गरम ईडली-सांबार, वडा-सांबार किंवा बटाटे वडा खायला मिळाला तर 😍 😍 अहाहा नुसत्या विचारांनीच तोंडाला पाणी सुटलं आणि वाडेश्वर,रूपाली,वैशाली आणि पुण्यातल्या असंख्य ठिकाणी मिळणारी वाफाळलेली ईडली-सांबार डोळ्यासमोर तरळून गेले 😁 😌🤤
पण पण आणि प ण च!!
काय करणार इथे स्टेशनला ना असे स्टाॅल्स असतात ना इथले लोक असं काही गरमा-गरम खाणं पसंत करतात. बघावं तेंव्हा गारढोण सँडविचेस नाहीतर सॅलड किंवा केक्स वगैरे खातांना दिसतात आणि त्यासोबत 'चिल्डssss' पाणी/एनर्जी ड्रिंक/कोक/पेप्सी पितात 😳 😳 मी तर उन्हाळ्यात सुद्धा कधी असं गारेगार पाणी प्यायची हिंमत नाही करु शकले पण इथल्या खाण्याच्या पद्धती म्हणजे 🙏
#मुक्कामपोस्टUK

Wednesday, September 18, 2019

almost सुफळ संपूर्ण

मी आजवर क्वचितच एखादी मराठी मालिका नियमितपणे बघितली असेल.पण यूके ला आल्यापासून दिवसाचा सगळा शीण घालवण्याकरता थोडा विरंगुळा म्हणून 'झी५' अॅप टाकलं आणि 'चला हवा' चे काही भाग बघायला सुरूवात केली, अशातच मला 'almost सुफळ संपूर्ण' ह्या मालिकेबद्दल कळालं.

माझा लहानपणीचा मित्र आणि आजच्या घडीचा प्रतिथयश दिग्दर्शक/लेखक/कलाकार 'शार्दूल सराफ' ह्याची संकल्पना/पटकथा असलेली ही मालिका 'नाव असं का दिलं असावं बरं?' ह्या उत्सुकतेने बघायला सुरुवात केली आणि पहिल्या भागापासूनच ही मालिका माझ्यासाठी best stress buster ठरली!!

ह्या मालिकेमधे 'केतकर कुटुंबीय' आहेत जे फक्त मातृभाषेतच संभाषण करतात आणि स्वदेशी गोष्टींचे नुसते आग्रही नाही तर कटाक्षाने पालन करणारे आहेत.एकत्र नांदणाऱ्या या कुटुंबाचे प्रमुख 'आप्पा केतकर' यांना बाहेरचे लोक 'स्वदेशी केतकर' या टोपणनावाने खिजवत असतात यातच त्यांच्या विक्षिप्त पण गमतीदार स्वभावाचा अंदाज येतो.

या कुटुंबामधे दोन कर्तबगार मुलगे त्यांच्या पत्नी, प्रत्येकी एक अपत्य आणि आज्जी ही इतर मंडळी आहेत.प्रत्येकाचे स्वभाव हा एक स्वतंत्र विषय आहे पण एकूण सुखवस्तू अशा कुटुंबामधे अचानक एके दिवशी वेगळीच घटना घडते!

एक परदेशी मुलगा त्यांच्या शेजारच्या बंगल्यामधे राहायला येतो आणि तिथपासून सगळी मज्जाच मज्जा चालू होते. अर्थातच अप्पा केतकरांना 'परदेशी' लोकांचा प्रचंड राग येत असतो आणि त्या परदेशी मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या मुंबईतल्या वास्तव्याच्या पहिल्या क्षणापासूनच त्याचं आणि आप्पांचं भांडण चालू होतं!!

ह्या मालिकेमधे आपल्या मराठी भाषेचा केलेला वापर इतका सहज-सुंदर वाटतो नं मला.खरंतर सलग एक वाक्य मराठीतून बोलणं गेल्या काही वर्षात मलाच जमत नाही आणि यूके ला आल्यापासून तर मराठीतून बोलणंसुद्धा दुर्मिळ होत चाललं आहे, त्यामुळे असेल कदाचित पण ही मालिका बघायला मला प्रचंड आवडतं😊 😊

ह्या मालिकेमधले सगळेच कलाकार अगदी नैसर्गिक अभिनय करतात,व्यक्तीरेखेला साजेसं आणि स्वतःच्या घरात आपण जसे वागू तसं वागणं आहे प्रत्येकाचं!

नचिकेत देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारणा-या कलाकाराने एखादा परदेशी माणूस मराठी कशाप्रकारे बोलेल याचा अभिनय योग्यरित्या वठवला आहे.

ह्या परदेशी पाहुण्याला मराठी खाद्य संस्कृती बद्दलची माहिती देणारा एक माहितीपट बनवायचा असतो. त्यासाठी केतकर कुटुंबीय त्याला कशाप्रकारे मदत करतात आणि त्यावेळी काय एकेक दिव्य प्रसंग घडतात ह्याचा निखळ आनंद तुम्हांला मालिका बघतांना मिळतो.

आपली भाषा किती सुंदर आहे आणि तितकीच लवचिक पण वैविध्यपूर्ण आहे ते या कलाकारांच्या विशेषतः आप्पांच्या संवादातून शब्दागणिक जाणवतं.

ह्या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकाराच्या संवाद आणि रोजच्या भागासाठी असणाऱ्या प्रसंगांसोबतच फ्रेममधे दिसणाऱ्या इतर गोष्टींचाही अगदी बारकाईने विचार केलेला आढळतो. जसं की घरामधे अगदी जुन्या पद्धतीचं दूरध्वनी यंत्र ठेवलेलं आहे, स्वयंपाक घरामधे मिक्सर नाही तर पाटा-वरवंटा आणि खलबत्ता आहे, जेवायला सगळेजण जमिनीवर व्यवस्थित मांडी घालून बसतात, बोन-चायनाचे कप नाही तर स्टीलच्या भांड्यातून चहा पितात.

एक अजून छानशी गोष्ट म्हणजे एक फळा टांगलेला आहे त्यावर रोज नवा सूचक सुविचार लिहिलेला दिसतो. प्रसंगानुरूप जे संगीतसंयोजन केलं आहे तेही योग्य आहे.तर अशा एक ना अनेक बाबींचा लक्षपूर्वक विचार केलेला यातून आपल्याला दिसतो.

रोजच्या भागामधे आप्पा केतकर आणि नचिकेत देशपांडे यांच्या मधलं 'Tom & Jerry' सारखं युध्द बघायला भन्नाट वाटतं. केतकरांच्या पत्नी यादेखील केतकरांना tough fight देतांना बघितल्यावर तर मला अगदी माझ्या आजी-आजोबांचा संवाद आठवतो 😄 😄 😄

एकूण काय तर रोजच्या आयुष्यातल्या कटकटी, इमोशनल ड्रामे, बाहेरख्याली नवरा किंवा कट-कारस्थानं रचून एकमेकांना हैराण करणाऱ्या सासू-सुना या तद्दन फालतू विषयांवर वर्षानुवर्षे चालणाऱ्या मराठी मालिकांपेक्षा 'almost सुफळ संपूर्ण' ही मालिका अतिशय हलकी-फुलकी आणि मनोरंजनपूर्ण वाटते मला.

अजून एकही भाग बघितला नसेल तर नक्की बघा!!
#almostसुफळसंपूर्ण

Saturday, September 7, 2019

#मुक्कामपोस्टUK : महालक्ष्मी

सध्या सगळ्यांच्या घरी अगदी थाटामाटात साज-या होणा-या महालक्ष्म्यांचे फोटोज बघून खूप म्हणजे खूप आनंद होत आहे 😊 😊 माझा सगळ्यात आवडता, लाडका सण आहे हा 😊 😊 हा सण आवडायचं एक कारण हेही आहे की अख्खं कुटुंब ह्या सणाच्या तयारीमधे गुंगलेलं असतं, फक्त 'बायकांचा सण' नसतो हा!

माझ्या माहेरी आणि सासरी पण अतीव उत्साहात आणि साग्रसंगीत पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो.

आम्ही सख्खी चार भावंडं त्यामुळे लहानपणी महालक्ष्मी समोर कोणती खेळणी मांडायची याबद्दल चढाओढ असायची. गणपती बाप्पाचं आगमन झालं की महालक्ष्मींचे वेध लागायचे. माझ्या बाबांनी एक भली-मोठी ट्रंक आणली होती ज्यामधे महालक्ष्मीच्या सणाचं सगळं सामान आम्ही ठेवलेलं असायचं. ती ट्रंक खाली काढून एकेक वस्तू त्यातून सावकाशपणे बाहेर काढायच्या आणि एकेकाने एकेका गोष्टीची जबाबदारी घ्यायची किंवा आई-बाबांना मदत करायची. मग कोणी मुखवटे स्वच्छ करायचे कोणी महालक्ष्म्यांचे धड/कोठी पुसून त्यात गहू, तांदूळ भरायचे,अर्ध्यापर्यंत भरलं की पोटात दोन लाडू असलेली पुरचुंडी ठेवायची. मग त्याला हात खोचायचे. कधी जुन्या बांगड्या काढून नविन भरायच्या. दुसरीकडे आमचे बाबा मखर किंवा आम्ही घर म्हणतो महालक्ष्मीचं ते बनवायला घ्यायचे. बाबांनी एक चौकोनी आकाराचं लोखंडी सळयांचं पोर्टेबल स्टँड बनवून घेतलं होतं. त्याचे सगळे राॅड्स एकमेकांना व्यवस्थित लावायचे मग त्याच्या तीन बाजू झाकल्या जातील असे पडदे टाकायचे. हे एक मोठ्ठं काम झालं की मग त्यामधे एक टेबल ठेऊन त्यावर महालक्ष्म्यांचे धड ठेवायचे आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे महालक्ष्म्यांना साडी नेसवणे ह्याची तयारी चालू व्हायची! माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींकडे मुख्यत्वे ही जबाबदारी असायची आणि मी त्यांच्या हाताखाली मदतनीस. सेफ्टी पिन्स देणं, साड्यांच्या नि-या व्यवस्थित करणं आणि भारावून ती सगळी गम्मत बघणं ही माझी मदत! कित्येकदा अगदी रात्री उशीरापर्यंत साड्या नेसवायचा कार्यक्रम चालायचा.जोवर अगदी मनाला पटत नाही अशी साडी नेसवून व्हायची नाही तोवर आम्ही कोणीच झोपायचो नाही!!

एकदा ते काम झालं की मग ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघींचे साज, दागिने चढवले जायचे.

दुस-या दिवशी मखरामधे बाकी सजावट करणं चालूच असायचं. आम्हा चौघांच्या आवडीच्या काही ठरावीक खेळण्या असायच्या त्या सगळ्या छान मांडल्या की झालं!!!

माझ्या माहेरी तिन्हीसांजेला महालक्ष्म्यांना मिरवून घरामधे आणतात. त्याआधी सगळ्या घरामधे पावलं काढायची असतात. त्याला पण एका विशिष्ठ पद्धतीने म्हणजे दारातून घरामधे मग तुळशीपाशी, आमची बॅल्कनीमधे असायची कुंडी किंवा ज्याच्या घरी जिथे असेल तिथे.त्यानंतर पावलांचे ठसे घरातल्या सगळ्या खोल्यांमधे काढायचे आणि शेवटी मखराकडे. म्हणजे महालक्ष्मी सगळ्या घरामधे फिरुन मग मखरामधे विराजमान होते. कित्ती कित्ती सुंदर कल्पना आहे नं ही 😊 😊 मिरवतांना सुद्धा आम्ही आईच्या मागे उभे राहून हाताने पळी-भांडं वाजवत विचारायचो, कोण आलं? आई म्हणायची 'सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली' 😊 😊

एकदा महालक्ष्म्यांना स्थापन केलं की मग बाबा पूजा करायचे, नैवेद्य दाखवून आरत्या सुरु व्हायच्या. त्यानंतर देवीची स्तोत्र वगैरे म्हणून पहिल्या दिवसाची सांगता व्हायची.

महालक्ष्मी एकदा मखरात बसल्या नं की त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न स्मितहास्य अगदी मंत्रमुग्ध करणारं वाटतं मला, मी कितीही वेळ बघत बसू शकते त्यांच्याकडे 😍 😍 अगदी दरवर्षी हेच होतं, एकदा महालक्ष्म्या विराजमान झाल्या की मी तासन्तास त्यांच्याकडे बघत बसते आणि मोबाईल मधे जमेल तितक्या अँगल्सने फोटो काढून ठेवते 😄 😄

दुस-या दिवशी मुख्य पूजा आणि पुरणा - वरणाचा महानैवेद्य असतो त्याची लगबग असते. आई सोवळं नेसून सगळा स्वयंपाक करते. संध्याकाळ झाली की बाबा धीर-गंभीर आवाजात पूजेचे मंत्र म्हणायला सुरुवात करतात.त्यावेळेस घरामधे धूप,उदबत्तीचा प्रफुल्लित करणारा तसंच फुलांचा मंद सुगंध आणि नैवेद्याचा स्वादिष्ट वास एकत्र भरून उरलेला असतो, अगदी वेगळंच भारावलेलं वातावरण असतं ☺️☺️☺️

जितकं महालक्ष्म्याचं येणं, सजणं-विराजमान होणं अगदी झोकात असतं तितकाच समृद्ध असतो त्यांच्यासाठी बनवलेला महानैवेद्य-१६ प्रकारच्या भाज्या एकत्र करुन बनवलेली फळभाजी,अळूची अांबट-गोड पातळ भाजी,पुरणपोळी,दाळीची चटणी,कोशिंबीर,पंचामृत,दाण्याची तिखट-कोरडी चटणी,भजे-कुरडया,भाताची मुद त्यावर साधं वरण, साजूक तुपाची धार,कटाची आमटी,कढी आणि खीर..अहाहा

ताट भरून जेंव्हा देवीला नैवेद्य दाखवतो तेंव्हा ऊर अगदी समाधानाने भरून येतो लाडक्या महालक्ष्मीला इतके चविष्ट पदार्थ खाऊ घालत आहे म्हणून 😊 😊
ह्या सणाबद्दलच्या एक ना अनेक अशा सगळ्याच गोष्टींचं मला फार फार कौतुक वाटतं आणि हा सण यथाशक्ती साजरा करुन दरवर्षी अतीव आनंद मिळतो.
महालक्ष्म्या आपल्या घरी येतात, यथोचित पाहुणचार करवून घेतात आणि भरभरून आपल्याला आशिर्वाद देतात, यापेक्षा वेगळं अजून काय हवं ना..