Wednesday, September 18, 2019

almost सुफळ संपूर्ण

मी आजवर क्वचितच एखादी मराठी मालिका नियमितपणे बघितली असेल.पण यूके ला आल्यापासून दिवसाचा सगळा शीण घालवण्याकरता थोडा विरंगुळा म्हणून 'झी५' अॅप टाकलं आणि 'चला हवा' चे काही भाग बघायला सुरूवात केली, अशातच मला 'almost सुफळ संपूर्ण' ह्या मालिकेबद्दल कळालं.

माझा लहानपणीचा मित्र आणि आजच्या घडीचा प्रतिथयश दिग्दर्शक/लेखक/कलाकार 'शार्दूल सराफ' ह्याची संकल्पना/पटकथा असलेली ही मालिका 'नाव असं का दिलं असावं बरं?' ह्या उत्सुकतेने बघायला सुरुवात केली आणि पहिल्या भागापासूनच ही मालिका माझ्यासाठी best stress buster ठरली!!

ह्या मालिकेमधे 'केतकर कुटुंबीय' आहेत जे फक्त मातृभाषेतच संभाषण करतात आणि स्वदेशी गोष्टींचे नुसते आग्रही नाही तर कटाक्षाने पालन करणारे आहेत.एकत्र नांदणाऱ्या या कुटुंबाचे प्रमुख 'आप्पा केतकर' यांना बाहेरचे लोक 'स्वदेशी केतकर' या टोपणनावाने खिजवत असतात यातच त्यांच्या विक्षिप्त पण गमतीदार स्वभावाचा अंदाज येतो.

या कुटुंबामधे दोन कर्तबगार मुलगे त्यांच्या पत्नी, प्रत्येकी एक अपत्य आणि आज्जी ही इतर मंडळी आहेत.प्रत्येकाचे स्वभाव हा एक स्वतंत्र विषय आहे पण एकूण सुखवस्तू अशा कुटुंबामधे अचानक एके दिवशी वेगळीच घटना घडते!

एक परदेशी मुलगा त्यांच्या शेजारच्या बंगल्यामधे राहायला येतो आणि तिथपासून सगळी मज्जाच मज्जा चालू होते. अर्थातच अप्पा केतकरांना 'परदेशी' लोकांचा प्रचंड राग येत असतो आणि त्या परदेशी मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या मुंबईतल्या वास्तव्याच्या पहिल्या क्षणापासूनच त्याचं आणि आप्पांचं भांडण चालू होतं!!

ह्या मालिकेमधे आपल्या मराठी भाषेचा केलेला वापर इतका सहज-सुंदर वाटतो नं मला.खरंतर सलग एक वाक्य मराठीतून बोलणं गेल्या काही वर्षात मलाच जमत नाही आणि यूके ला आल्यापासून तर मराठीतून बोलणंसुद्धा दुर्मिळ होत चाललं आहे, त्यामुळे असेल कदाचित पण ही मालिका बघायला मला प्रचंड आवडतं😊 😊

ह्या मालिकेमधले सगळेच कलाकार अगदी नैसर्गिक अभिनय करतात,व्यक्तीरेखेला साजेसं आणि स्वतःच्या घरात आपण जसे वागू तसं वागणं आहे प्रत्येकाचं!

नचिकेत देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारणा-या कलाकाराने एखादा परदेशी माणूस मराठी कशाप्रकारे बोलेल याचा अभिनय योग्यरित्या वठवला आहे.

ह्या परदेशी पाहुण्याला मराठी खाद्य संस्कृती बद्दलची माहिती देणारा एक माहितीपट बनवायचा असतो. त्यासाठी केतकर कुटुंबीय त्याला कशाप्रकारे मदत करतात आणि त्यावेळी काय एकेक दिव्य प्रसंग घडतात ह्याचा निखळ आनंद तुम्हांला मालिका बघतांना मिळतो.

आपली भाषा किती सुंदर आहे आणि तितकीच लवचिक पण वैविध्यपूर्ण आहे ते या कलाकारांच्या विशेषतः आप्पांच्या संवादातून शब्दागणिक जाणवतं.

ह्या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकाराच्या संवाद आणि रोजच्या भागासाठी असणाऱ्या प्रसंगांसोबतच फ्रेममधे दिसणाऱ्या इतर गोष्टींचाही अगदी बारकाईने विचार केलेला आढळतो. जसं की घरामधे अगदी जुन्या पद्धतीचं दूरध्वनी यंत्र ठेवलेलं आहे, स्वयंपाक घरामधे मिक्सर नाही तर पाटा-वरवंटा आणि खलबत्ता आहे, जेवायला सगळेजण जमिनीवर व्यवस्थित मांडी घालून बसतात, बोन-चायनाचे कप नाही तर स्टीलच्या भांड्यातून चहा पितात.

एक अजून छानशी गोष्ट म्हणजे एक फळा टांगलेला आहे त्यावर रोज नवा सूचक सुविचार लिहिलेला दिसतो. प्रसंगानुरूप जे संगीतसंयोजन केलं आहे तेही योग्य आहे.तर अशा एक ना अनेक बाबींचा लक्षपूर्वक विचार केलेला यातून आपल्याला दिसतो.

रोजच्या भागामधे आप्पा केतकर आणि नचिकेत देशपांडे यांच्या मधलं 'Tom & Jerry' सारखं युध्द बघायला भन्नाट वाटतं. केतकरांच्या पत्नी यादेखील केतकरांना tough fight देतांना बघितल्यावर तर मला अगदी माझ्या आजी-आजोबांचा संवाद आठवतो 😄 😄 😄

एकूण काय तर रोजच्या आयुष्यातल्या कटकटी, इमोशनल ड्रामे, बाहेरख्याली नवरा किंवा कट-कारस्थानं रचून एकमेकांना हैराण करणाऱ्या सासू-सुना या तद्दन फालतू विषयांवर वर्षानुवर्षे चालणाऱ्या मराठी मालिकांपेक्षा 'almost सुफळ संपूर्ण' ही मालिका अतिशय हलकी-फुलकी आणि मनोरंजनपूर्ण वाटते मला.

अजून एकही भाग बघितला नसेल तर नक्की बघा!!
#almostसुफळसंपूर्ण

No comments:

Post a Comment