भारतामधे लाॅकडाऊन आहे पण किराणा-भाजी या गोष्टी मिळत आहेत.या गोष्टी घ्यायला काही ठिकाणी झुंबड उडाली आहे तरीही अशा परिस्थितीत ते जमिनीवर रकाने आखून अंतर ठेवायची कल्पना ज्याने कोणी काढली ती भारीच😁
पण भाजी किंवा जीवनावश्यक सामान मिळत आहे नं मग चला, असं म्हणून काही नग रोजच घराबाहेर पडतात 🤦😣 त्यांना परिस्थितीचं गांभीर्य अतिउशीर होण्याआधी कळो म्हणजे झालं!!
हां तर इथे आमच्या गावामधे फक्त सुपरमार्केट्स आणि फार्मसी चालू आहेत. इथे दूधवाला नाही नं आणि online सामान फक्त जे ७०वयोगटाच्या वरचे आहेत किंवा आजारी आहेत अशाच लोकांना मिळत आहे. त्यामुळे आम्ही काल सामान आणायला अक्षरशः जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडलो.क्वचितच एखादी गाडी रस्त्याने जातांना दिसत होती.
फार्मसी मधे जर तुम्हांला online prescription द्वारे डाॅक्टरांनी औषध लिहून दिलं असेल तर ते घ्यायला फक्त आतमधे जायला परवानगी देत होते, जेणेकरून लोक गर्दी करणार नाहीत.
सुपरमार्केटच्या दारात दोन गार्डस उभे होते सर्वांना विनंती करुन कुटुंबातल्या फक्त एकाच माणसाला आत जाऊ देत होते.आत गेल्यावर सगळ्या वस्तू अगदीच नेहमी इतक्या नाही पण माणशी एक तरी मिळेल इतपत रचून ठेवलेल्या दिसल्या.तुरळक गर्दी होती त्यामुळे दर काही मिनिटांनी लाऊडस्पीकर वर सुचना दिल्या जात होत्या,'कोणतीही वस्तू जास्तीत जास्त तीन नग घेऊ शकता, कृपया दुस-याचा पण विचार करा आणि खरेदी करा'.
करोनाविरोधी लढ्यामधे प्रत्येक देश आपापल्या परीने निकराचे प्रयत्न करत आहे.पण फक्त राजकारणी किंवा डाॅक्टर्स,नर्सिंग स्टाफ यांची जबाबदारी नाहीए तर आपली प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपण स्वतःला या रोगापासून वाचवायला हवं!!
थोडे तरी स्वार्थी व्हा आणि घरातच रहा!
No comments:
Post a Comment