Thursday, June 24, 2021

अगतिकता

  मोठ्या कष्टाने एक एक पाऊल उचलावं लागतं..

मनाची अवस्था फार बिकट झालेली असते, एकदा वाटतं जाऊया पुढे पण.. परत पाय अडखळतात..😢

कसला तरी आधार मिळावा असं सतत वाटत राहतं पण, हातांना मिळणारा तो तात्पुरता आधारही स्वतःचा तोल सांभाळायला पुरेसा नसतो 😩

क्षणोक्षणी अगतिकता जाणवत असते पण काहीच करता येत नाही, शरीर जणू गोठून गेलंय असं वाटत राहतं!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
खरं सांगा, दोन महिन्यांच्या अंतराने किंवा खूप दिवसांनी जर खास पायांचा व्यायाम केलात किंवा lower body workout केलंत तर हाच अनुभव येतो ना 😜 विशेषतः Lunges & Suqats चे दोन-दोन सेट्स केले की मग उठता-बसता 'देवच' आठवतात, होना 😁

हं, आता परत पहिल्या ओळीपासून वाचा बरं, म्हणजे गम्मत कळेल 😄

Wednesday, June 23, 2021

#मुक्कामपोस्टUK - मीटिंग इन्व्हाईट

  परदेशात राहण्याचे किती अन काय तोटे असू शकतात याचा अंदाज काही चिवित्र अनुभव आल्यावरच येतो!

आमच्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर एक आजी राहते. सध्या उन्हाळा सुरु आहे, हो म्हणजे पाऊस नाही पडत त्या दिवसाला 'समर' म्हणायचं असतं हं इथे! तर त्या आजीने घरातला सगळा पसारा गार्डन मधे ठेवला आहे आणि रोज जमेल तसा तो लाकडी पसारा तुकडे करुन बंबात जाळत बसते!

भकाभक धूर येतो नुसता आणि इच्छा असूनही खिडक्या घट्ट बंद ठेवाव्या लागतात 😒

असं जर कोणी पुण्यात माझ्या घराच्या खाली किंवा समोर केलं असतं नं, तर मी जाऊन चांगली कानउघाडणी केली असती! अर्थात आपल्या तिथे असलं सामान 'भंगारात' देण्याचा पर्याय असतोच. पण! इथे प्रत्येक गोष्टीला नियम आहेत!!

असे सगळेच नियम काही आम्हांला माहित नाहीत म्हणून मी आधी गुगलबाबाचा सल्ला घेत असते, त्यानुसार आत्ताच मला कळालं की असा टाकाऊ कचरा गार्डन मधे जाळायची (आणि दुस-याला त्रास द्यायची) मुभा सरकारने दिलेली आहे! फारच जर त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला मीटिंग इन्व्हाईट पाठवून रीतसर चर्चा करुन तोडगा काढा!

कर्म माझं!!🤦

आता 'शेजारच्याला'च फक्त मीटिंग इन्व्हाईट पाठवायचा राहिला आयुष्यात!!😤

#मुक्कामपोस्टUK_गंमतजंमत

Saturday, June 19, 2021

#मुक्कामपोस्टUK - मराठी ईबुक्स अॅप

  युके मधे आहे तोवर नविन मराठी पुस्तक हातात घेऊन वाचायला मिळणं माझ्यासाठी तरी 'अशक्य', 'दुर्मिळ', 'दुरापास्त' होऊन बसलं आहे पुष्कळ प्रयत्न करूनही!

शेवटी दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून मी किंडल ला जवळ केलं, थोड्या दिवसांत 'बुकगंगा'चा ई-बुक प्लॅटफॉर्म सापडला आणि नुकतंच 'राजहंस'च्या मोबाईल अॅपचा अनुभव आला. या तीनही कंपन्यांच्या अॅपवर पुस्तक वाचनाचा जो अनुभव मला आला, तो तुमच्या समोर मांडणार आहे. जर तुम्हांला या अॅप्समधले काही वेगळे पर्याय सापडले असतील, तर ते मला नक्की सांगा जेणेकरून मला ते वापरता येतील आणि ई-बुक वाचन जरा सुसह्य करता येईल!

अॅमेझाॅन किंडल अॅप
फायदे : पुष्कळ मराठी ई-पुस्तकं उपलब्ध आहेत. सहज डाउनलोड करुन चाळू शकता. विकत घ्यायची इच्छा झाली तर एका क्लिकवर विकत घ्या, लगेचच ते तुमच्या लायब्ररी सेक्शन मधे दाखल होतं. वाचायला सुरूवात केल्यावर तुम्हांला जर फाॅन्ट मधे बदल करायचा असेल तर पर्याय आहे. तसेच, पुस्तकाचं पान काळ्या, पिवळसर, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगाचं करूनही वाचन सुखावह करु शकता.
जर तुम्हांला पुस्तकाच्या पानाचा आकार बदलायचा असेल, अक्षरं लहान-मोठी करायची असतील तर तेही सहज करता येतं. आणि हे सगळे बदल सेव्ह करुन टेंपलेट बनवून वापरता येतात. वाचतांना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लाईट अॅडजेस्ट करायचा पर्याय पण आहे.
या सर्वांपेक्षा महत्वाचा पर्याय म्हणजे, ज्या पानावर तुम्ही वाचन थांबवून अॅप बंद केलंत किंवा दुस-या पुस्तकाकडे वळलात तर पुढच्या वेळेस त्याच पानावर ते उघडतं. बुकमार्क करायची कटकट नाही की शेवटचं पान कोणतं वाचलं बरं मी? म्हणून पानं उलटंत बसायची भानगड नाही!!
तोटे : पुष्कळ मराठी शब्द नीट छापलेले नाहीत, त्यामुळे रसभंग होतो आणि जेवतांना दाताखाली खडा आल्याने जसा त्रास होतो ना तसं वाटायला लागतं! मराठी ई-बुक्स कै च्या कैच महाग आहेत!!!

बुकगंगा अॅप
फायदे : लायब्ररी मधे पुस्तक डाऊनलोड केलं की ते अगदी छान रांगेत कपाटात जाऊन बसतं. मग हवं ते पुस्तक उघडायचं आणि वाचायचं. बुकमार्क करायची सोय आहे. स्वच्छ प्रकाशात हातात घेऊन पुस्तक वाचते आहे असा अनुभव येतो. एकही शब्द चुकीचा छापलेला सापडला नाही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमधे! ई-बुक्सची किंमत अॅमेझाॅन पेक्षा कैक पटीने कमी आणि सवलती भरपूर!
तोटे : बुकगंगाचं पुस्तक चाळायला किंवा शोधायला वेगळं अॅप वापरावं लागतं आणि पुस्तक वाचायला वेगळं. एकाच अॅप मधे हे काम केलं असतं तर मी १००/१०० गुण दिले असते! अर्थात त्यांच्या वेबसाईट वरुन पुस्तक विकत घेऊन, मग तुम्ही लायब्ररी अॅप मधे डाऊनलोड करून पण वाचू शकता.

राजहंस प्रकाशन मोबाईल अॅप
तोटे : बुकमार्कचा कोणताच पर्याय नाही त्यामुळे पुस्तक बंद करतांना कोणत्या क्रमांकाच्या पानावर आहोत ते लक्षात ठेवावं लागतं. जरी लक्षात ठेवलं तरी पुढच्या वेळेस ते पान शोधायला बरेच कष्ट/पानं उलटत/स्वाईप राईट करत बसावे लागतात. अॅमेझाॅन सारखंच बरेचसे शब्द विचित्र छापलेले आहेत, मागचा पुढचा शब्द वाचून आपल्याला अंदाज बांधावा लागतो, पण विचका होतोच! खूप कमी पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध केले आहेत, विशेषतः जुन्या प्रसिद्ध पुस्तकांच्या ई-बुक्स आवृत्ती नाहीतच! नविन पुस्तकांसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
फायदे : अॅमेझाॅन सारखंच एकाच अॅपमधे पुस्तक बघून लगेच विकत घ्यायची सोय आहे. सवलती पण ठीकठाक असतात.

पण मोबाईल अॅपचा सगळ्यात मोठ्ठा तोटा हा आहे की, नव्या-को-या पुस्तकाचा जो सुगंध विशेषतः राजहंस प्रकाशनाचं पुस्तक असेल तर अहाहा! घेता येत नाही 😭😭😭😭😭😭 म्हणूनही मला छापील पुस्तकं हवी आहेत हातात घेऊन वाचायला, अनुभवायला आणि छातीशी कवटाळून पहुडायला 😍 😍

तर, या तीनही अॅप्सपैकी मला 'बुकगंगा'चं लायब्ररी अॅप सगळ्यात जास्तं आवडलं.

अगदीच पुस्तक नाही पण निदान डोळ्यांना पुस्तकाचा भास करवणारं अॅप वाटतं, मला ते!

तुमचा या अॅप्सबद्दलचा अनुभव काय आहे मंडळी, नक्की सांगा.

#मराठी_ईबुक्स_अॅप
#मुक्कामपोस्टUK

Saturday, June 5, 2021

The Family Man - Must watch!

 

कोणत्याही वेबसिरीज चा सिक्वल चांगला किंवा पहिल्या सिझनच्या मानाने बरा असावा अशी अपेक्षा असते. त्या नियमाने 'The Family Man', चा दुसरा सिझन खरंच चांगला वाटला.
एखाद्या कलाकाराचा अपवाद वगळता, पहिल्या सिझनचे सगळे कलाकार आहेत, त्यामुळे कथानकातली सुसूत्रता कायम राहिली आहे.
या सिझनचं खास आकर्षक आहे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री 'समंथा अकिनेनी'. मनोज वाजपेयी आणि ती अगदी तोडीस-तोड आहेत👌
कमाल अभिनय केलाय तिने, अगदी भावशून्य चेहरा आणि थंड नजर पण खुनशी दिमाग! प्रसंगानुरूप तिचा उफाळून येणारा राग आणि केलेली मारधाड यांत, फक्त हातच 'सलमान खान'च्या सफाईने चालतो असं नाही, तर डोळ्यातून जळते निखारे पडत आहेत असं वाटतं, कमाल! कमाल अभिनय!!😊👏👏👏
बाकी, मनोज वाजपेयी तर ख-या आयुष्यातही हेच काम करत असावा इतका खरा वाटतो आणि वागतोही!
पहिला भाग आणि दुसरा भाग यामधे त्याचं वागणं-बोलणं-विचार करणं यात तसूभरही फरक जाणवत नाही. म्हणजे, जर दोन्ही भाग सलग बघितले तर वाटेल एखादा चित्रपट बघत आहोत आपण!
पहिल्या भागाची कथा, चित्रीकरण, सगळ्या कलाकरांचा अभिनय हे तर आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतातच पण, दुस-या भागाची कथा सुध्दा अगदी चपखल आहे आणि त्याच उत्कंठेने आपण सलग सगळे भाग बघून कधी संपवतो हे कळतंच नाही!
शेवटी 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर आधारित काही प्रसंग पेरले आहेत, सिझन ३ची नांदी असावी कदाचित, कळेलच लवकर.
Must binge watch series - The Family Man season 1 & 2

Thursday, June 3, 2021

Happy Bicycle day

  Happy Bicycle day 😃🚴 सायकल ही तुम्हां-आम्हां प्रत्येकाच्या आयुष्याचा विशेषतः लहानपणाचा अविभाज्य भाग असते, हो की नाही 😊👏👏
मला आठवतं, आम्ही राहायचो त्या भागात एक सायकलचं दुकान होतंं तिथे ५०पैसे, १रु. तास या हिशोबाने सायकल भाडेतत्वावर मिळायची.छोट्यांसाठी एकदम छोटी, त्याहून मोठ्या म्हणजे ७-८ वर्षांच्या मुलांसाठी त्याहून थोडी मोठी आणि १०वर्षांच्या मुलांसाठी अजून मोठ्ठी सायकल असायची.

ती सायकल आणली की, तासभर गल्लीमधे इकडून-तिकडून नुसत्या फे-या मारायच्या आणि एक तास वस्सूल करायचा 😝 बरं, या सायकल साठी घरातल्या भावंडासकट, गल्लीतली मंडळी पण वाटेकरी असायचीच. मग काय सायकल कोणी किती वेळा चालवली यावरून भांडणं पण व्हायचीच 😂😂

धम्माल! धम्माल नुसती!

तेंव्हापासून जी सायकलची आणि माझी गट्टी जमली, ती पुढे बरीच वर्षं अगदी लग्नानंतरही सुरु राहिली.लग्नाच्या वाढदिवसाला काय हवंय,यावर मी 'सायकल' दे म्हणाले नव-याला,यावरून तर माझं सायकलबद्दलचं प्रेम तुम्हांला लक्षात येईलच 🤭ही माझी ३री सायकल आहे.

मला शाळेत जायला सायकल तशी जरा उशीरा मिळाली म्हणजे हायस्कूल ला गेल्यावर मिळाली. पण तोवर बहिणीच्या, मैत्रिणींच्या सायकल्स दामटणे यावर मी माझी हौस भागवून घ्यायचे.

असंच एकदा, आमचा ७वी स्काॅलरशीपचा क्लास संपला आणि मी मैत्रीणीची सायकल खेळायला घेतली, तिनेही एका मित्राची सायकल घेतली आणि आमच्या घिरट्या सुरु झाल्या. कोण जास्त जोरात चालवतं या नादात कसं कुणास ठाऊक पण माझ्या सायकलचं पुढचं चाक आणि तिच्या सायकलचं मागचं चाक एकमेकांना घासले आणि धड्डाम करुन दोघीही डांबरी रस्त्यावर पडलो!!! 😖😰 मी डाव्या हातावर पडले आणि जोरदार कळ आली! नशीब मैत्रिणीला जास्त लागलं नाही पण, माझा हात मात्र गडबडला! हातावर लग्गेच सूज चढायला लागली 🤪आमच्या ट्यूशनच्या मॅडमनी ते बघितलं आणि लगोलग मला घरी सोडलं, बिचाऱ्या त्यांना पण इतकं टेन्शन आलं होतं!
घरी गेल्यावर आईने माझा टंब सुजलेला हात बघितला आणि डोक्याला हात लावला🤦
लगेच बाबांना बोलावलं आणि आम्ही सरळ दवाखान्यात. मग काय तपासणी, एक्स-रे आणि सर्जरी करुन भलं-मोठ्ठं प्लास्टर लाऊन मी डावा हात गळ्यात बांधून एकदम्म तय्यार!
खरं तर, बाबा मला त्यावर्षी वाढदिवसाला सायकल घेणारचं होते बरंका, पण आमचा उत्साह नडला आणि हात गळ्यात बांधून घेतला!!😟

यथावकाश प्लास्टर निघालं, हात बराच बरा झाला आणि काही महिन्यांतच मला माझी माझी स्वतःची पहिली रेंजर सायकल मिळाली 😊 😊 इतकी सुंदर सायकल होती नं माझी! एकदम दणकट, जाडजूड टायर्स असलेली आणि मुख्य म्हणजे खाली पडले जरी, तरी एक पाय अडकून राहिल अशी रचना असलेली! थोडक्यात काय तर 'लेडीज' सायकल नव्हती ती 😝

सायकल मिळाल्यावर तर मला आकाशच ठेंगणं झालं 😍 कोणतंही काम असेल की, मी लग्गेच सायकलला टांग मारून निघणार 🚴
शाळेत जायला-यायला, ट्युशन्स ला अर्थातच सायकल वर जायला सुरूवात केली. आई-बाबांना धाकधूक वाटायची पण नंतर माझा तसा अॅक्सिडेंट कधीच झाला नाही 😎

माझ्या रेंजरवर बसल्यावर मस्त वारा कानात शिरायचा आणि मी जोरजोरात सायकल हाणत रस्ता कापत पुढे जायचे! या नादात माझ्या हाताला घट्टे पडायला लागले होते पण ते बघून तर अजूनच चेव चढायचा 😄 😜 आई म्हणायची, काय हात झाले आहेत तुझे अगं, कोणी म्हणेल का पोरीचे हात आहेत म्हणून 😄
मी शाळेत असतांना तशीही टाॅमबाॅय सारखीच राहत होते, त्यामुळे आईने असं म्हणल्यावर तर भारीच वाटायचं 😄 😂
११-१२वीला सायन्स घेतलं, मग काय पहाटे पाच ला क्लास कर, काॅलेजचे प्रॅक्टिकल्स कर, एक ना दोन १०० गोष्टी, मग नाईलाजाने सायकल ला बाजूला करुन गाडी हाताशी घेतली. मात्र, उच्च शिक्षणाला पुण्यनगरीत पाऊल ठेवलं आणि परत माझी सखी, माझी रेंजर सायकल नव्या रुपात माझ्यासोबत हिंडायला सज्ज झाली!

पुण्यातल्या गर्दीतून सायकल चालवणं, हे काय दिव्य आहे हे लक्षात आल्यावर मात्र जरा धास्तावले, पण तरी जमवलं! फार दमछाक व्हायची हे मात्र नक्की😤
काॅलेज संपलं, मुंबईला नोकरी लागली तेंव्हा परत एकदा माझी आणि सायकलची ताटातूट झाली 😭
त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी जेंव्हा पुण्यात आले, लग्न करुन, तेंव्हा सगळ्यात आधी सायकल घेतली.
पुन्हा एकदा जुन्या मैत्रिणीशी सूर जुळवत, वा-याच्या साथीने माझं सायकल चालवणं सुरु झालं ते मग निदान ६वर्षं सुरु राहिलं!
युकेला येतांना बिचाऱ्या सायकल ला जड अंत:करणाने कसाबसा निरोप दिला😔

इथेही घेऊया का सायकल🤔 हा विचार मनांत चमकलाच पण इथली थंडी आडवी आली आणि तो विचार मी पुसूनच टाकला!

एक मात्र नक्की, जेंव्हा केंव्हा परत घरी जाईन, तेंव्हा मी पुन्हा एकदा नविन सायकल घेईन आणि 'मै और मेरी साईकल, अक्सर ये बातें करतें हैं', म्हणत वा-यासोबत गाणी गात मज्जा करायला बाहेर पडू 😍 😍