Sunday, November 6, 2011

अपूर्ण


आजच्या युगात खालील लेखात नमूद केलेल्या काही गोष्टींचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण समूळ नष्ट झालेलं नाही.

’नवरा’ ही एन्टीटी जर स्त्रीच्या आयुष्यात नसेल तर फक्त तीच अपूर्ण राहते का? एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं नसेल तर फक्त तिच्याच आयुष्याला काहि महत्त्व नसतं का?

ठराविक वय झालं की, मुलीचे घरचे तिच्यासाठी ’योग्य’ वर शोधतात आणि ’बार’ उडवतात. त्यानंतर त्या मुलीने तिचं सगळं जग सोडून एका नव्या जगात स्वत:ला सिध्द करायची पराकाष्ठा सुरू होते. लव्ह मॅरेज असू देत नाही तर अरेन्ज मॅरेज, सून कम बायको कम बरीच अशी विशेषणं असलेली ’व्यक्ती’ घरात आली की प्रत्येकाच्या तिच्याकडून काहितरी अपेक्षा असतात पण तिच्या अपेक्षांचं काय होतं अशावेळेस?

माहेरची मंडळी म्हणतात की, सासरची मंडळीच आता तुझं घर आहे तेंव्हा तू त्यांच्या वळणाने घे, उगाच स्वत:चं डोकं चालवू नकोस, नीट रहा. पण, अशी अपेक्षा त्या मुलीची असेल तर, की, ती ज्या घरात नविन आलेली आहे त्या घरातल्या थोरामोठयांनी तिला सांभाळून घ्यायला हवं, तिला नविन वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करायला हवी, उसका क्या?

हल्ली जास्ती करून जोडपी लग्नानंतर वेगळीच राहतात(कारण कोणतंही असो). तर, अशावेळेस ’नवरा’ ह्या प्राण्याच्या देखील कधी-कधी अपेक्षा अवाजवी असतात. दुर्दैवाने आजही, आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या सवयींमुळे, मुलगा झाला की, त्याला कोणतंच काम करायची सवय लावली जात नाही, तो पुढे जाउन घराचा कर्ता पुरूष होणार आहे म्हणूनच त्याच्या छोटयातल्या छोटया चुकांपासून ते शुद्ध मूर्खासारख्या वागण्याला झाकलं जातं, त्यामुळे लहानपणापासूनच एक गोड गैरसमजूत त्याच्या मनात रूजवली जाते की, तो जे करतो तेच बरोबर, तोच एक शहाणा वगैरे वगैरे. तर, ह्या सवयीचा पुढे परिणाम आणि अर्थात प्रयोग कम जबरदस्ती बायकोवर सुद्धा होतो ते ही       शे-यांसहित-’उगाच वेंधळ्यासारखं वागू नकोस’,’उगाच शहाणपणा करू नकोस, मी सांगितलेलच बरोबर आहे’. म्हणजे, त्या बाईच्या शिक्षणाचा, तिला असलेल्या बुध्दीचा जणू तिने वापर फक्त आज भाजी कोणती करायची आणि येणा-या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं यासाठीच करायचा का??

स्त्रीला निसर्गाने उपजतच ’मॅनेजमेंट’चं स्कील बहाल केलेले आहे त्यामुळे डिग्री न-घेताही ती घर-दार, व्यवसाय, मुलं-बाळं ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते पण, म्हणून घरातल्या सगळ्याच्या सगळ्या जबाबदा-या फक्त तिच्यावर सोपवणं ही सर्वस्वी चुकीची गोष्ट आहे.

हल्ली स्त्री-पुरूष समानता, स्त्री वर्गाला ५०% आरक्षण ह्या गोष्टी पुढे येत आहेत हे अतिशय चांगलं प्रतिक आहे समाजात होणा-या बदलाचं, पण, तरीहि अजुनही सगळया घराची ही अपेक्षा असते की, बाईने नोकरी करून आल्यावर, घरातली सगळी कामं करावी.पुन्हा सकाळी उठुन सगळी कामं करून घराबाहेर पडावं!! ही आणखीन एक अवाजवी अपेक्षा!!! स्त्री म्हणजे पण एक माणूस आहे, त्यालाही विश्रांतीची गरज असते हा विचार कुठे केलाचं जात नाही. बरं, हे झालं नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी, पण, घरात बसणा-या बायकांचे तर हाल ह्याहीपेक्षा जास्त असतात. त्या एक तर घरी राहुन सगळं घर सांभाळतात + घराबाहेरची जी काहि छोटी-मोठी कामं असतात बॅंकेची वगैरे ती करतात + संध्याकाळी नवरा घरी येण्याच्या वेळेला त्याला प्रसन्न वाटावं म्हणून घर सज्ज ठेवतात आणि जर कधी तिने संध्याकाळी बाहेर जायची इच्छा व्यक्त केली तर आलाच नव-याचा शेरा,’तुला काय काम असतं दिवसभर, मी ऑफिसमधून थकुन आलोय अन लगेच तुला बाहेर जायचयं’!!

घ्या!! म्हणजे, ती बिचारी घरी दिवसभर मरमर करून इतकं सगळं करत असते आणि त्याचं फळ काय तर इतका छान डायलॉग!! उलट,
नव-यांना हे कळायला हवं की, ती सकाळपासून घरातच होती म्हणूनच तिला आता तुमच्यासोबत बाहेर जायचं असतं. पण, इतकी साधी गोष्ट कळेल ते नवरे कसले!!

पण, एक मात्र आहे, पुरूष वर्ग एका बाबतीत फारच हुशार आहे असं म्हणायला हवं, त्यांच्या सगळ्या अपेक्षा विनासायास पूर्ण करण्यासाठी ते कधी-कधी ’कौतुक’ ह्या गोष्टीचा आधार घेतात आणि आपलं काम करून घेतात. ह्या त्यांच्या कौतुकसोहळ्यासाठी पुरूष वर्गातील लेखकांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. स्त्री ला त्यांनी अनंत काळची माता ही पदवी बहाल केली आहे तसंच सहनशील, संयमी, संसाराचा रथ समर्थपणे सांभाळणारी या आणि अशा ब-याच उपमा देउ केल्या आहेत, जेणेकरून, स्त्री वर्ग निसर्गत:च दिलेल्या हळव्या मनामुळे विरघळतात आणि कितीही कष्ट पडत असले तरीहि सगळ्या अपेक्षा पूर्ण करतात. आणि पुरूष वर्ग स्वत:च्या तल्लख बुध्दीवर खुष होतो!!

तुम्हांला वाटत असेल मी कोणी स्त्रीवादी चळवळीची कार्यकर्ती आहे की काय, पण असं अजिबात नाहीये. वर मांडलेले हे विचार माझ्या आजुबाजूला घडणा-या गोष्टींच्या निरीक्षणातून आलेले आहेत.

कदाचित पुरूष वर्गाला हे वाचून वाटत असेल की, तुम्ही काहीही बोला आमच्याबद्दल, पण निसर्गानेच आम्हांला निर्माण केलं आहे तुम्हांला पूर्णत्व बहाल करण्याकरता (आणि हा विचार वाचून ते पुरूषअसण्याच्या अहंकाराने सुखावतही असतील)

पण, मला इथे कोण कितपत पूर्ण किंवा अपूर्ण आहे हे नाही मांडायचं, मला फक्त हे म्हणायचं आहे की, जशी स्त्री अपूर्ण आहे पुरूषाशिवाय तसाच पुरूषही अपूर्ण आहे स्त्रीशिवाय. निसर्गाने फक्त पुरूषालाच सगळी शक्ती + बुध्दी बहाल केलेली नाहिये. काहीही झालं तरी नवनिर्मिती हे एकटया स्त्री किंवा पुरूषाला शक्य नाहिये. कदाचित कोणी एकाने उगाच दुस-यावर वर्चस्व गाजवू नये म्हणूनच की काय, निसर्गाने दोघांनाही अपूर्णत्व बहाल केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करून दोघांनीही ते आचरणात आणणं अपेक्षित आहे.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


 


1 comment:

  1. I appreciate you observation... and u written both the side …but now people are changing…

    I Like ur Blog..keep Bloging...
    Thanks

    ReplyDelete