Saturday, September 15, 2012

सुशिक्षित अडाणी



आय.टी. इंडस्ट्रीमधे काम करणारी सुशिक्षित,उच्चशिक्षित मंडळी रोजच अडाण्यासारखी कशी वागू शकतात ह्याचा अनुभव हल्ली येतोय मला!!
आमच्या ऑफिसने कॅबची सोय केलेली आहे आम्हांला ऑफिसला नेण्या-आणण्याकरता.त्यामधे कधी तीन किंवा चारजण असतात रोज सकाळी.जो कॅबचा व्हेन्डर आहे त्याने सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे म्हणजे रोज सकाळी पिक-अपच्या १.५ तास आधी आम्हांला मेसेज येतो.त्यामधे ड्रायव्हरचा फोन नंबर, गाडी नंबर आणि जर काही अडचण आली तर व्हेन्डरचा नंबर दिलेला असतो.पिक-अप होण्याआधी ड्रायव्हर प्रत्येकाला फोन करून घराचा पत्ता किंवा पिक-अप पॉईंट आणि वेळ नक्की सांगतो.इतकं सगळं व्यवस्थित असतांना सुध्दा...
>> १० वाजता कॅब येऊन उभी राहिली दारात तरी लोक बाहेर येत नाहीत.
>> ड्रायव्हर फोन करतो तरी म्हणतात दोन मिनीटात आलो अन येतात १० मिनीटानंतर!!
खरं तर नियम असा आहे की कॅब ५मिनीटांपेक्षा जास्तवेळ वाट बघू शकत नाही कुठल्याही पिक-अपची पण आम्हांला घ्यायला येणारे ड्रायव्हर्स चांगले आहेत म्हणून १०-२०मिनीटे थांबतात!
जनरली तीन किंवा चार जणांचं पिक-अप असतं पण पहिल्याच माणसाने जर असा उशीर केला तर मग पुढचे सगळेजण लेट होतात अन शेवटी ऑफिसला पोहोचायला उशीर होतो त्याचा दोष कोणाला द्यायचा??
सकाळी १० वाजता पुण्यातल्या कर्वे रोड, पौड रोड, कोथरूड, हडपसर अशा मोकळ्या(??)रस्त्यांवरून गाडी हाकत चार जणांना गोळा करून हिंजेवाडीसारख्या अगदी रिकाम्या(?!!?) रस्त्याने ऑफिसला जायचं म्हटल्यावर कमीत कमी दीड तास जातो अन जर त्यात पाऊस असेल तर मग विचारायलाच नको!!
अशी परिस्थिती असतांना सुध्दा लोक किती शहाण्यासारखे वागतात ह्याचे काही नमुने खालीलप्रमाणे
>> पहिला पिक-अप घेतला,मॅडमला त्यांच्या पोराला डे-केअरला सोडायचं आहे,अगदी घराजवळच आहे ते पण मॅडम त्याला घेऊन कॅबमधे बसणार,पोराला डे-केअरला सोडणार अन मग गाडी पुढच्या माणसाला घ्यायला निघणार.
(ऑफिसची कॅब ही फक्त एम्प्लॉयीच्या घरापासून ऑफिसपर्यंत दिलेली आहे, खासगी कामांसाठी नाही तरीही!!)
हेच जर त्यांनी पोराला आधी सोडून मग कॅबमधे बसल्या असत्या तर? पण नाही आम्हाला ऑफिसने कॅब दिली आहे ना मग त्याचा वापर आम्ही कसापण करू बाकीच्यांना लेट होत असेल तरी आमचा काही संबंध नाही!!
>> रोज एका व्यक्तीचा पिक-अप पहिला असतो अन १० वाजता कॅब दारात येऊन उभी राहते पण ती व्यक्ती १०.१० च्या आधी गाडीत येऊन बसत नाही,कारण काय तर म्हणे, मला सगळ्यात आधी बसून मग तासभर पुढे बोअर व्हावं लागतं!! (म्हणजे मग यांना बोअर होऊ नये म्हणून हे उशीरा येणार अन पुढचे लोक उशीर होतोये म्हणून बोंबलत बसणार, काय बरं बोलणार ह्यावर??)
>> एक पठ्ठा मुख्य रस्त्यापासून थोडा आत राहतो,कॅब नेहमी त्याला घ्यायला अगदी आतपर्यंत जातेच पण कधी जर उशीर झालेला असेल तरीसुध्दा तो माणूस दोन पावलं चालून मुख्य रस्त्यावर येत नाही अन वेळेवर खाली येऊन थांबणं हा तर त्याला जणू अपमानच वाटतो!!
>> एकदा माझा पहिला पिक-अप झाला (स्वतःचं कौतुक म्हणून नाही पण, मी काहीही झालं तरी कॅबला वाट बघायला लावत नाही,त्यामुळे) गाडी मला बरोबर १०वाजता घेऊन पुढच्या मॅडमला घ्यायला गेलो.ड्रायव्हरने एकदा फोन केला,त्यांचा फोन बिझी.त्यांच्या पत्त्यावर पोहचून फोन केला,पुन्हा फोन बिझी.पाच मिनीटानंतर फोन केला
तरी तेच,फोन बिझी! कॅबवाल्याने मग ऑफिसमधे फोन करून सांगितलं त्या मॅडमना कॉन्टॅक्ट करायला पण त्यांनीसुध्दा फोन करून बिझी असल्याचं कळवलं अन पुढचा पिक-अप करायाला जा म्हणून सांगितलं.आम्ही तिस-या माणसाला घेतलं अन त्या बाईंचा फोन आला की कॅब आली कशी नाही अजुन?? ड्रायव्हरने त्यांना घडलेला प्रकार सांगितला पण त्या ऐकायला तयारच नाहीत म्हटल्या आत्ता जिथे आहेस तिथे थांब मी तिथे पोहोचते.
आम्हांला त्या बाईमुळे आधीच उशीर झाला होता पण आता त्या असं म्ह्टल्यामुळे थांबणं आलंच.मग दहा मिनीटांनी त्या बाई कॅबमधे येऊन बसल्या अन ड्रायव्हरला लगेच ओरडायला लागल्या,थांबता येत नाही का दोन मिनीटंसुध्दा,फोन एकदा एंगेज लागला म्हणून काय झालं असं सोडून जायची पध्दत असते का अन काय काय!
मी तर थक्कच झाले त्यांचे हे बोल ऐकून!! चोरच्या चोर अन शिरजोर! तो ड्रायव्हर काही बोलला नाही म्हणून तो वाद तिथेच थांबला अन आम्ही पुढे निघालो!
तो माणूस गाडीवानाचं काम करतोय,त्याच्या परिस्थितीमुळे काही बोलू शकत नाही म्हणजे तो खुप कमी दर्जाचा आहे अन त्याला काहीच अक्कल नाही,आपणच ह्या जगातले सगळ्यात हुशार ह्या आवीर्भावात का वागतात लोक? समोरचा माणूसपण एक व्यक्ती आहे ही जाणीव उच्चशिक्षण काढून टाकतं का त्यांच्या डोक्यातून??कसला येवढा माज करतात कोणास ठाऊक!!
>> कधी-कधी एखाद्याला काही अडचण असू शकते त्यामुळे उशीर होऊ शकतो पण ती गोष्ट जर तुम्ही कॅबवाल्याला वेळेत सांगितली तर पुढच्या लोकांचा वेळ वाया जात नाही, पण इतकी समज दाखवली तर ते शहाणे म्हणवतील ना! असाच प्रसंग एकदा आला, आम्ही शेवटचा पिक-अप घ्यायला निघालो.हायवेहून एका छोटया रस्त्याने वळसा घेत-घेत त्याच्या घरी पोहोचलो.त्या माणसाला फोन केला पण त्याने उचलला नाही,त्याच्या जागेवर पोहोचल्यावर फोन केला तर त्याने उत्तर दिलं की,'मै पुणेसे बाहर हूं,आज पिक-अप नही है!!'
आता हीच गोष्ट त्याने थोडयावेळापूर्वी सांगितली असती तर आमचा हेलपाटा वाचला असता, पण नाही..आम्ही सुशिक्षित अडाणी आहोत ना,आम्हांला ह्या साध्या गोष्टी माहित असूनही समजून घ्यायच्या नाहीत अन समजल्या तरी तसं वागायचं नाही!!
>> एक तर माणूस इतका हुशार आहे की त्याने त्याचा 'पर्मनंट अ‍ॅड्रेस' देऊन ठेवला आहे अन कॅबवाल्याने फोन केला की त्याला इंग्रजीमधून पत्ता समजावून सांगतो.कॅबवाल्याला कळालं नाही म्हणून तो हिंदीमधे विचारू लागला तर त्याने अगदी शुध्द हिंदीमधे बोलायला सुरूवात केली, आता इतकी चांगली हिंदी इथे कळते कोणाला?? शेवटी एकाने फोन घेतला अन पत्ता समजून घेतला.पण तो माणूस नविन असल्यामुळे त्याला लॅण्डमार्क धड सांगता आले नाही अन आम्ही पंधरा मिनीटे इकडे-तिकडे विचारत कसंतरी त्याला घ्यायला पोहोचलो!!
एक साधा पत्ता धड अपडेट करू नये का ह्या माणसाने? सिस्टीममधे अपडेट करायला १मिनीट पण पुरेसा आहे पण नाही...

आम्ही गर्वाने सुशिक्षित अडाणी म्हणून मिरवणार, सुधारणार नाही!!

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check




7 comments:

  1. छान जमलाय लेख !
    अनुभव नेहमीच प्रामाणिक आणि म्हणूनच जिवंत वाटतात. तुझे याआधीचेही लेख वाचलेत. पण हा अधिक आवडला. अनुभव मांडून बाकी विचार करणं वाचणार्‍यावर सोपवलसं ते भारी आहे. नो एक्स्ट्रा फंडे !! आवडलं.
    फक्त लेखाचं टायटल बदलून 'शिक्षित लोक' ठेव 'सु'शिक्षित नको!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल :-)
      कृपया आपलं नाव नोंदवा प्रतिक्रिया देतांना

      Delete
  2. नावात काय ठेवलयं!
    एक नम्र सुचना. ब्लॉगचा पार्श्वभाग काळा न ठेवता इतर कुठला तरी ठेव. काळ्यावर पांढरे वाचायला (आंतरजालावर तरी) अवघड जाते. विशेष करून ही थिम. Human eyes are more comfortable with green and its family. असो.
    हेही वाच जमलं तर. छान लिहिले आहे. अनुभवांवर आधारित. ब्लॉगची रंगसंगतीदेखिल उत्तम आहे. हिरवा भाग जास्त असल्याने ब्लॉगच्या आणि लेखाच्या मांडणीमधे वेगळाच इंम्पॅक्ट जाणवतो.
    http://arnika-saakaar.blogspot.in/2012/02/blog-post.html

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या सुचनेबद्दल :-) बदल करण्यात आलेला आहे.

      Delete
  3. ये बात !!
    छान :)

    ReplyDelete