Thursday, October 31, 2013

फुकाडे

ह्या पृथ्वीवर जितकी म्हणून जनता,स्त्री-पुरूष कोणीही जे बिडी, सिगारेट किंवा सिगार फुकतात ते सगळे फुकाडे!
ही सगळी फुकाड्यांची जमात एकजात निर्बुध्द आहे!
निसर्गाने दिलेली बुद्धी चालवायला ह्यांना असल्या फालतू गोष्टीची गरज पडते हे बघून खरंच कीव येते ह्या लोकांची आणि जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून किंवा बसून किंवा कारमधे, रिक्षामधे किंवा वाट्टेल तिथे हे लोक फुकू शकतात हे बघून अगदी संताप होतो माझा!!

आमच्या ऑफिसच्या बाहेर तर मोठा सिग्नल आहे त्यामुळे कायम रहदारी. त्यातच दाटीवाटीने 'दावणगिरी डोसा', 'शिव वडापाव' असल्या टप-या उभ्या असतात, तिथेही सदानकदा खाणा-यांनी ट्रॅफीक जॅम केलेला असतो आणि ह्यामधेच डझनावारी फुकाडे तिन्ही-त्रिकाळ 'फिक्र ला धुवे में उडवत' असतात. माझ्यासारखे 'नॉन स्मोकर्स' तिथून अगदी नाक मुठीत घेऊन जरी गेले तरी तो दुस-यांच्या 'फिक्र चा धुवा' कुठूनतरी नाकात शिरतोच आणि माझ्या मस्तकात तिडीक उठते.

तुम्ही फुका हो पण तुमच्यामुळे आमच्यासारख्या निष्पाप लोकांना का म्हणून त्याची शिक्षा?? आता ह्यावर तुम्ही म्हणाल की तुमचा हात कोणी धरला आहे का, तुम्हीपण फुका ना!
बरोबर आहे तुम्ही असंच म्हणणार, कारण स्वतःचं अधःपतन झालेलं आहेच आता दुस-याचं पण करा. तुमच्याकडून ह्याउपर अधिक काय अपेक्षा करणार!

रस्त्यावरून चालत-चालत काही लोकांना फुकायची सवय असते. हे करत असतांना मागे-पुढे कोणी दुसरी व्यक्ती चालत आहे तिला तुमच्या हातातल्या शिलगावलेल्या सिगारेटचा चटका लागू शकतो हा विचार येतंच नाही का डोक्यात?

सिग्नल ला गाडी उभी करून चालक सिगारेटचे झुरके घेतो आणि त्याशेजारी उभ्या असलेल्या आमच्यासारख्यांना ना पुढे जाता येते ना मागे! मग इतर वाहनांच्या धुरासोबत हाही आयता धूर प्यावाच लागतो.

सगळ्यात घाणेरडा प्रकार काय असतो तर फुकणं झाल्यावर लोक 'मिन्टॉस' खातात आणि तो एकूणच सगळा सिगारेट + मिन्टॉस मिश्रीत वास अंगावर लेऊन लिफ्टमधे चढतात, आई गं!! असह्य असह्य होतं ते २ मिनीटंसुध्दा त्या लिफ्टमधे उभं राहणं! अशावेळेस वाटतं समोर उभ्या असलेल्या माणसाला चांगलं फोडून काढावं!!

पण काय करणार आपल्या न्यायव्यवस्थेमधे असल्या प्रकारांसाठी कोणताही गुन्हा आणि त्यासाठीची कठोर अशी शिक्षा अजून तरी बनवली नाहीये त्यामुळे तक्रार करणार कोणाकडे??

मुळात काय आहे हे लोक निर्बुध्दच असल्यामुळे त्यांच्याकडून व्यवस्थित वागण्याची अपेक्षा करणार तरी कशी! पण असं आहे ना, त्रास होतो तो कुठेतरी बाहेर काढायला हवा डोक्यातून म्हणून हा लेखनप्रपंच बाकी काही नाही...

No comments:

Post a Comment