Saturday, September 7, 2019

#मुक्कामपोस्टUK : महालक्ष्मी

सध्या सगळ्यांच्या घरी अगदी थाटामाटात साज-या होणा-या महालक्ष्म्यांचे फोटोज बघून खूप म्हणजे खूप आनंद होत आहे 😊 😊 माझा सगळ्यात आवडता, लाडका सण आहे हा 😊 😊 हा सण आवडायचं एक कारण हेही आहे की अख्खं कुटुंब ह्या सणाच्या तयारीमधे गुंगलेलं असतं, फक्त 'बायकांचा सण' नसतो हा!

माझ्या माहेरी आणि सासरी पण अतीव उत्साहात आणि साग्रसंगीत पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो.

आम्ही सख्खी चार भावंडं त्यामुळे लहानपणी महालक्ष्मी समोर कोणती खेळणी मांडायची याबद्दल चढाओढ असायची. गणपती बाप्पाचं आगमन झालं की महालक्ष्मींचे वेध लागायचे. माझ्या बाबांनी एक भली-मोठी ट्रंक आणली होती ज्यामधे महालक्ष्मीच्या सणाचं सगळं सामान आम्ही ठेवलेलं असायचं. ती ट्रंक खाली काढून एकेक वस्तू त्यातून सावकाशपणे बाहेर काढायच्या आणि एकेकाने एकेका गोष्टीची जबाबदारी घ्यायची किंवा आई-बाबांना मदत करायची. मग कोणी मुखवटे स्वच्छ करायचे कोणी महालक्ष्म्यांचे धड/कोठी पुसून त्यात गहू, तांदूळ भरायचे,अर्ध्यापर्यंत भरलं की पोटात दोन लाडू असलेली पुरचुंडी ठेवायची. मग त्याला हात खोचायचे. कधी जुन्या बांगड्या काढून नविन भरायच्या. दुसरीकडे आमचे बाबा मखर किंवा आम्ही घर म्हणतो महालक्ष्मीचं ते बनवायला घ्यायचे. बाबांनी एक चौकोनी आकाराचं लोखंडी सळयांचं पोर्टेबल स्टँड बनवून घेतलं होतं. त्याचे सगळे राॅड्स एकमेकांना व्यवस्थित लावायचे मग त्याच्या तीन बाजू झाकल्या जातील असे पडदे टाकायचे. हे एक मोठ्ठं काम झालं की मग त्यामधे एक टेबल ठेऊन त्यावर महालक्ष्म्यांचे धड ठेवायचे आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे महालक्ष्म्यांना साडी नेसवणे ह्याची तयारी चालू व्हायची! माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींकडे मुख्यत्वे ही जबाबदारी असायची आणि मी त्यांच्या हाताखाली मदतनीस. सेफ्टी पिन्स देणं, साड्यांच्या नि-या व्यवस्थित करणं आणि भारावून ती सगळी गम्मत बघणं ही माझी मदत! कित्येकदा अगदी रात्री उशीरापर्यंत साड्या नेसवायचा कार्यक्रम चालायचा.जोवर अगदी मनाला पटत नाही अशी साडी नेसवून व्हायची नाही तोवर आम्ही कोणीच झोपायचो नाही!!

एकदा ते काम झालं की मग ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघींचे साज, दागिने चढवले जायचे.

दुस-या दिवशी मखरामधे बाकी सजावट करणं चालूच असायचं. आम्हा चौघांच्या आवडीच्या काही ठरावीक खेळण्या असायच्या त्या सगळ्या छान मांडल्या की झालं!!!

माझ्या माहेरी तिन्हीसांजेला महालक्ष्म्यांना मिरवून घरामधे आणतात. त्याआधी सगळ्या घरामधे पावलं काढायची असतात. त्याला पण एका विशिष्ठ पद्धतीने म्हणजे दारातून घरामधे मग तुळशीपाशी, आमची बॅल्कनीमधे असायची कुंडी किंवा ज्याच्या घरी जिथे असेल तिथे.त्यानंतर पावलांचे ठसे घरातल्या सगळ्या खोल्यांमधे काढायचे आणि शेवटी मखराकडे. म्हणजे महालक्ष्मी सगळ्या घरामधे फिरुन मग मखरामधे विराजमान होते. कित्ती कित्ती सुंदर कल्पना आहे नं ही 😊 😊 मिरवतांना सुद्धा आम्ही आईच्या मागे उभे राहून हाताने पळी-भांडं वाजवत विचारायचो, कोण आलं? आई म्हणायची 'सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली' 😊 😊

एकदा महालक्ष्म्यांना स्थापन केलं की मग बाबा पूजा करायचे, नैवेद्य दाखवून आरत्या सुरु व्हायच्या. त्यानंतर देवीची स्तोत्र वगैरे म्हणून पहिल्या दिवसाची सांगता व्हायची.

महालक्ष्मी एकदा मखरात बसल्या नं की त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न स्मितहास्य अगदी मंत्रमुग्ध करणारं वाटतं मला, मी कितीही वेळ बघत बसू शकते त्यांच्याकडे 😍 😍 अगदी दरवर्षी हेच होतं, एकदा महालक्ष्म्या विराजमान झाल्या की मी तासन्तास त्यांच्याकडे बघत बसते आणि मोबाईल मधे जमेल तितक्या अँगल्सने फोटो काढून ठेवते 😄 😄

दुस-या दिवशी मुख्य पूजा आणि पुरणा - वरणाचा महानैवेद्य असतो त्याची लगबग असते. आई सोवळं नेसून सगळा स्वयंपाक करते. संध्याकाळ झाली की बाबा धीर-गंभीर आवाजात पूजेचे मंत्र म्हणायला सुरुवात करतात.त्यावेळेस घरामधे धूप,उदबत्तीचा प्रफुल्लित करणारा तसंच फुलांचा मंद सुगंध आणि नैवेद्याचा स्वादिष्ट वास एकत्र भरून उरलेला असतो, अगदी वेगळंच भारावलेलं वातावरण असतं ☺️☺️☺️

जितकं महालक्ष्म्याचं येणं, सजणं-विराजमान होणं अगदी झोकात असतं तितकाच समृद्ध असतो त्यांच्यासाठी बनवलेला महानैवेद्य-१६ प्रकारच्या भाज्या एकत्र करुन बनवलेली फळभाजी,अळूची अांबट-गोड पातळ भाजी,पुरणपोळी,दाळीची चटणी,कोशिंबीर,पंचामृत,दाण्याची तिखट-कोरडी चटणी,भजे-कुरडया,भाताची मुद त्यावर साधं वरण, साजूक तुपाची धार,कटाची आमटी,कढी आणि खीर..अहाहा

ताट भरून जेंव्हा देवीला नैवेद्य दाखवतो तेंव्हा ऊर अगदी समाधानाने भरून येतो लाडक्या महालक्ष्मीला इतके चविष्ट पदार्थ खाऊ घालत आहे म्हणून 😊 😊
ह्या सणाबद्दलच्या एक ना अनेक अशा सगळ्याच गोष्टींचं मला फार फार कौतुक वाटतं आणि हा सण यथाशक्ती साजरा करुन दरवर्षी अतीव आनंद मिळतो.
महालक्ष्म्या आपल्या घरी येतात, यथोचित पाहुणचार करवून घेतात आणि भरभरून आपल्याला आशिर्वाद देतात, यापेक्षा वेगळं अजून काय हवं ना..

No comments:

Post a Comment