Thursday, November 12, 2020

गुरूद्वादशी : नृसिंहवाडी उत्सव

  आज गुरूद्वादशी, नृसिंहवाडी/ नरसिंहवाडीला खूप मोठा उत्सव असतो. यावर्षी करोना मुळे कदाचित नसावा.
तर माझ्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींमधे प्रमुख आठवण ही नरसिंहवाडीच्या उत्सवाची आहे.
सुट्टी चालू झाली की मामाच्या गावाला किंवा आजोळी जाण्याच्या ऐवजी आम्ही नृसिंहवाडीला जायचो.
औ'बादहून पुण्याला शिवाजी नगर स्थानकाला जायचं तिथून पुढे स्वारगेट स्थानकावर कोल्हापूर किंवा त्यापुढे जाणारी लालपरी पकडायची आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे रात्री १०-११वा. आम्ही नरसिंहवाडीला पोहोचायचो.
तिथे एका गुरुजींच्या घरी आमची राहायची सोय केलेली असायची. बसमधूम उतरल्यावर चालत त्यांच्या घरी जाईपर्यंतच थंडीने हुडहुडी भरायची.
गुरुजींकडे गेल्यावर एकमेकांची विचारपूस करत दुस-या दिवशी पूजा किती वाजता करायची आहे, इतर कार्यक्रमांची रूपरेषा काय आहे हे सगळं ठरवून, 'पहाटे लवकर उठून नदीवर आंघोळीला जायचं आहे', या सूचनेसकट पांघरूणात दडी मारावी लागायची.
पहाटे उठून आमचे आई-बाबा नदीवर आंघोळीला जायचे पण, आमची कधी इतक्या थंडीत पाण्यात पाय ठेवायची हिम्मत नाही झाली. त्यामुळे अगदीच उशीरा नाही पण ७-८वा आम्ही घरुन तयार होऊन जायचो. नदी मधे आंघोळ करणे हा एकूणच किळसवाणा प्रकार वाटत असल्याने मी विशेष कधी प्रयत्न आणि हिम्मत केली नाही. शास्त्र म्हणून दोन थेंब स्वतःवर शिंपडायचे आणि पवित्र व्हायचं असा शाॅटकट मारलेला चालायचा 😜
मंदिराकडे जातांना दुतर्फा दुकानांची रांग आहे. पुजेचं साहित्य, मिठाई, खेळण्या अशा विविध वस्तू मिळणारी ही दुकानं बहुतांश लोकांच्या घराच्या समोरच्या भागात वसवलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला नारायणस्वामींचं मंदिर आहे आणि त्यामागे धर्मशाळा. थोडं पुढे जाऊन डाव्या हाताला वळालं की कृष्णामाईचं विस्तीर्ण पात्र दिसतं आणि ते बघत बघतच आपण पाय-या उतरून कधी नदीपात्रात उतरतो कळतच नाही.
नदीच्या पाण्यात हात खळखळत तिला नमस्कार करुन, चार पाय-या चढून मुख्य मंदिराकडे जायला वळायचं. मुख्य मंदिर नदिपात्राच्या अगदी लगत आहे. पण हे मंदिर इतर मंदिरांसारखं नसून एक माणूस जेमतेम डोकाऊ शकतो इतकं छोटुसं आहे.तिथे नृसिंहसरस्वती महाराजांच्या 'मनोहारी पादुका' आहेत आणि त्यावर सावली धरुन औदुंबराचा विशाल वृक्ष वर्षानुवर्षे उभा आहे.
कृष्णामाईच्या या नेत्रदीपक पात्राला शोभेल असा सुंदर घाट आणि मंदिराभोवती गोलाकार विशाल सभामंडप आहे.
नदीपात्राच्या एका बाजूला नृसिंहवाडी आहे तर दुस-या बाजूला अमरेश्वर म्हणून एक श्री दत्तमहाराजांचं अजून एक मंदिर आहे. नृसिंहवाडीला जितकी भाविकांची गर्दी असते त्यामानाने अमरेश्वरला बरीच शांतता असते. कृष्णामाईच्या पात्रातून बोटीने त्या बाजूला जाता येतं किंवा मुख्य रस्त्याने गाडीने पण जाता येतं.
नृसिंहवाडीला मुख्य मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसून पादुकांवर अभिषेक करुन पूजा करायची व्यवस्था केलेली आहे. त्यानुसार आमचे आई-बाबा पुजेला बसायचे आणि आम्ही त्यांच्या अलीकडे-पलिकडे बसून पूजा कशी करतात हे उत्सुकतेने बघत बसायचो. एकदा पूजा झाली की मुख्य आरती होईपर्यंत मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या किंवा मग मुख्य दारापाशी असणाऱ्या दुकांनाकडे फेरफटका मारायचा असा माझा कार्यक्रम असायचा.
मंदिरामधे पूजा चालू असतांना मंत्रोच्चारांचा होणारा आवाज दूरवर ऐकू यायचा.एका विशिष्ट लयीत म्हटल्या जाणाऱ्या त्या वेगवेगळ्या स्तोत्रांमुळे सगळं वातावरण इतकं प्रसन्न वाटायचं ना 😊 मला आजही तो आवाज कानात घुमल्यासारखा वाटतो.
मंदिर परिसारामधे दगडी रस्ता आहे. त्यावरून चालतांना होणारा गार स्पर्श मला फार मजेशीर वाटायचा. प्रवेशद्वारापासून बाहेर गावात जाणारा रस्ता तेंव्हा मातीचा होता, त्यावरुन चालतांना पण मऊशार मातीचा स्पर्श झाला की गुदगुल्या होतात असं वाटायचं 😄
हां तर प्रवेशद्वारापाशी ना २-३ दुकानं होती, तिथे गोष्टीची पुस्तकं मिळायची. मी तासनतास् उभी राहून ठरवत बसायचे की हे पुस्तक घेऊ की ते घेऊ. मागच्या वर्षी घेतलेलं पुस्तक परत नाही घेतलं जात ना, हे आठवून मग एकाच छानश्या पुस्तकाची निवड मी करायचे आणि बाबांनी घेऊन दिलं की लगेच वाचायला सुरूवात करायचे 😊
पुस्तकांच्या दुकानांमधे खेळणी तर असायचीच त्यातही मला ती पाण्यावर फिरणारी 'टर्र' आवाज करणारी होडी घ्यायची विशेष आवड होती 😜
जशी पुस्तकं-खेळणी घ्यायची उत्सुकता असायची तसंच तिथे मिळणाऱ्या विशेष मिठाईचं सुद्धा आकर्षण असायचं. कंदी पेढे,कवठाची बर्फी आणि भरपूर खोबरं-काजु-किसमिस-खसखस-डिंक-कमी साखर घालून बनवलेली बर्फी(माय फेव्हरेट). ही बर्फी इतकी स्वादिष्ट लागते मी कितीही खाऊ शकते. माझ्या मोठ्या बहिणीला मात्र कवठाची बर्फी जास्त आवडायची. अशा आमच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार + इतरांना प्रसाद द्यायला म्हणून, प्रत्येक जिन्नस किलोभर तरी घ्यावा लागायचा आईला 😄
दुसरं एक आकर्षण वाटायचं ते घरोघरी बनवलेल्या एक से एक सुंदर मातीच्या किल्ल्यांचं!
आम्ही ज्या गुरुजींच्या घरी राहायचो त्यांची मुलं तर दरवेळेस इतका सुंदर किल्ला बनवायचे नं की बघतच रहावं.आणि एका वर्षी तर गुरुजींच्या मुलाने महादेवाच्या जटेतून गंगा अवतरली असा देखावा केला होता. छोटी मोटर लाऊन खरंच महादेवाच्या जटेतून पाण्याचा फवारा तयार केला होता, असलं भारी वाटलेलं मला ते सगळं बघून 😁
मंदिरामधे दुपारच्या आरतीला हजेरी लावून झाली की आम्ही घरी येऊन सुग्रास जेवणावर ताव मारायचो आणि ताणून द्यायचो 😄
संध्याकाळ होत आली की पटकन आवरून परत मंदिरामधे जायचो. सकाळच्या पुजेपेक्षा मला संध्याकाळच्या पालखीची जास्त उत्सुकता असायची. जितकी पालखी खास तितकीच त्याआधीची तयारीही खास.
नारायणस्वामी मंदिरामधे उत्सवमूर्तींच्या मुखवट्याची सजावट केली जाते. काजळ-चंदन आणि फुलांची सजावट करुन उत्सवमूर्तींना सजवलं जातं. तो सजावट सोहळा बघणं फार आनंददायी आणि डोळे तृप्त करणारा असतो. अतिशय नाजूकपणे आणि निगुतीने केलेली ती सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींच्या मुखवट्याला सोन्याची झळाळी प्राप्त होते. वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत माझे खरंतर, इतकं, डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य असतं ते 😍 एकदा सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींना फुलांची आरास केलेल्या पालखीमधे ठेवलं जातं आणि 'अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त' म्हणत मुख्य मंदिरासमोर पालखी आणली जाते. देवाची आरती करुन पालखी प्रदक्षिणेसाठी सज्ज होते.
हातात दिवटी घेऊन पुढे एकजण उभा राहतो, पालखीला सांभाळत चार जण असतात. सगळे गुरुजी एका सुरात आणि अतिशय खणखणीत आवाजामधे पंचपदी म्हणायला सुरूवात करतात आणि पालखी प्रदक्षिणा आरंभ करते. कधी ३ तर कधी ५ प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा करतांना प्रत्येक दिशेला पालखी थांबवून भाविकांना दर्शन घ्यायची संधी दिली जाते. मंदिराभोवती पालखीसोबत प्रदक्षिणा घालायला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय गोळा झालेला असतो. प्रत्येकजण कानात प्राण एकवटून दत्तमहाराजांची स्तुतिपर कवनं ऐकण्यात गुंगून गेलेला असतो. कृष्णामाईचा काठ, संध्याकाळचा हवेतला गारवा, धुपा-दिपाचा सुगंध आणि ब्रम्हवृंदांचा धीरगंभीर आवाज यामुळे एकूणच मंतरलेलं वातावरण असतं आणि तन-मन एका भारावलेल्या पण सुखद अनुभवाची प्रचिती घेत असतं, फार फार मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे ह्या पालखी सोहळ्याचा. प्रदक्षिणा झाली की शेजारती होते आणि मंदीर बंद केलं जातं.
दुस-या दिवशी म्हणजे गुरुद्वादशीला खूप मोठा उत्सव असतो.
पहाटेपासूनच पूजेला प्रारंभ करतात, असंख्य भाविक दर्शनासाठी रांगा लावून महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत, सोहळ्याचा अनुभव मनात साठवून तृप्त होत असतात. मुख्य पुजा-आरती झाली की महाप्रसादाची लगबग सुरु होते. त्या दिवशी नरसिंहवाडीमधे राहणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जातो. गावामधे असणाऱ्या सगळ्या धर्मशाळा, शाळा, पटांगणं अशा ठिकाणी एकाच वेळी पंगती बसवल्या जातात. हजारोंनी भाविक त्या अमृतासमान चविष्ट प्रसादाचा आस्वाद घेतात. प्रसाद म्हणून दोनच पदार्थ पानात वाढतात - गव्हाची गुळ घालून बनवलेली गरमागरम खीर आणि वांग्याची खमंग भाजी - हा प्रसाद इतका चविष्ट असतो की पोट भरलं तरी मनाची भूक काही भागत नाही 😄
महाप्रसाद घेऊन झाला की आमची घरी परतायची लगबग चालू व्हायची. मिळेल त्या गाडीने पुण्याला येऊन लगोलग औ'बादला पोहोचून दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचा मुहूर्त गाठायचा असायचा!
गुरुद्वादशीचा मंत्रमुग्ध करणारा सोहळा मनभरुन बघितला नं की दिवाळीची सुरूवात अतिशय मंगलमय व्हायची 😊🙏
गेल्या काही वर्षात मात्र आम्हांला नरसिंहवाडीला जायचा योग फारसा आला नाही पण, लहानपणीच्या या सुखद आठवणी दर दिवाळीला मनात रुंजी मात्र नक्कीच घालतात 😌

No comments:

Post a Comment