Monday, March 3, 2014

अरे देवा! अजून एक??!!!

कधी नव्हे ते मला टीव्हीचा रीमोट हातात मिळाला म्हटलं बघावं जरा मराठी चॅनेलवर काय सुरू आहे. बघितलं तर फक्त लग्न, लग्नाच्या आधीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन - प्रत्येक मालिकेचा हा एकच विषय!

अरे काय चाललय काय!!!

एका लग्नाची दुसरी गोष्ट त्यानंतर आता तिसरी गोष्ट ह्यानंतर माहित नाही अजून कितव्या क्रमांकापर्यंत ह्या गोष्टी जातील!

होणार सून मी ह्या घरची,बे दुणे दहा आणि आता नविन येऊ घातलेली 'जावई विकत घेणे आहे!'

अरे काय आहे हे सगळं!! कंटाळा कसा येत नाही फक्त एकाच विषयावरच्या सिरीयल्स बनवायला! आपल्या रोजच्या आयुष्यामधे जे घडतं तेच परत परत वेगवेगळ्या प्लास्टीक चेह-याच्या कलाकारांसमवेत बघायला कसा रस येऊ शकतो एखाद्याला?

हं आता तुम्ही म्हणाल की जर हा विषय सोडला तर मग कशावर बनवायची मालिका ते सांग पाहू...अरे आपल्या मराठी भाषेमधे इतका समृध्द ग्रंथभांडार आहे त्यातली एखादी चांगली कथा घेऊन त्यावर मालिका का नाही बनू शकत?

म्हणजे मग परत एखादी ऐतिहासिक किंवा देवावरची मालिकाच बनवायची ना? किंवा मग एखादा क्रांतिकारक किंवा देशभक्त??

ह्या वर्गवारीपेक्षाही काहीतरी वेगळं नक्कीच सापडेल हं आपल्या साहित्यात पण अर्थात ती मेहनत घेतली गेली पाहिजे..

जाऊ देत! माहित नाही हो मला, अजून कोणत्या विषयावर मालिका बनू शकते ते पण, इतकं मात्र कळतंय की सध्या चालू असलेल्या सगळ्या मालिका एकसुरी आहेत!! ह्यापेक्षा काहितरी चांगलं बघायला,ऐकायला मिळायला हवं!!

अर्थात लहानपणी बघितलेल्या मालिका इथे आठवणं साहजिक आहे.महाश्वेता किंवा दामिनी आठवतात, त्या दोन्ही मालिका टायटल साँग्समुळे जास्त लक्षात राहिल्या बाकी हिंदी मधल्या ब्योंमकेश बक्षी किंवा सुरभी..असं काही सुरू आहे का हो सध्या?

Sunday, February 23, 2014

हायवे...एक भन्नाट प्रवास



इम्तियाज अली हे नाव हिंदी चित्रपटसॄष्टीमधे आता सुपरिचित आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'हायवे'. ह्या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वी ट्रेलर्समुळे आणि ए.आर.रेहमान ने बनविलेल्या गाण्यांमुळे जास्त झाली.

विशेष सुचना: अगदी टीपीकल लव्ह स्टोरी किंवा मनोरंजनात्मक चित्रपट नाहीये हा!

चित्रपटाची कथा म्ह्टलं तर फक्त एका ओळीची आहे. पण, प्रत्येक वेळेस काहितरी कथा असलीच पाहिजे का?

फक्त एक कल्पना,रोजच्या धकाधकीच्या पण आरामदायी तरीही कृत्रिम वातावरणापासून कुठेतरी दूर निसर्गाच्या जवळ जायचं..तिथली स्वच्छ हवा, रोजचाच उगवणारा पण वेगळा दिसणारा सूर्य..मधेच कडाक्याची थंडी-बर्फ..खळाळणारी नदी आणि नजर पोहोचणारही नाही इतक्या उंचीवरची हिमाच्छादित शिखरं..बस्स!

चित्रपटामधे जे निसर्गाचं चित्रीकरण केलं आहे ते लाजवाब आहे.. डोंगरातून जाणारा वळणावळणाचा रस्ता..उत्फुल्लपणे धावणारी पण जवळ गेल्यावर जिवाचा थरकाप होईल इतका वेग असणारी नदी..व्वॉव अर्थात मी त्या भागामधे प्रत्यक्ष गेले नाही म्हणून मलातरी असं वाटलं.

चित्रपट वेगवेगळ्या शहरांच्या रस्त्यावरून आपल्याला फिरवत फिरवत 'वीरा' आणि 'अबिराम भाटी' ह्या दोघांची एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणारी कहानी सांगतो.वीरा एका अतीश्रीमंत घरातली 'प्रोटेक्टेड' वातावरणात वाढलेली मुलगी.घरामधल्या 'सेफ' पण तरीही अनसेफ वातावरणाचा तिला उबग आलेला असतो.पण तरीही, ती, जे सगळं सुरू आहे ते निमूटपणे सहन करत पुढे जात असते.


अचानक लग्नाच्या आदल्या रात्री ती आपल्या होणा-या नव-याला 'हायवे'वरून फिरून येऊ असा आग्रह धरते आणि सगळं नाट्य सुरू होतं...

रणदीप हुडा ला विशेष काही अदाकारी दाखवायची आवश्यकता नव्हती पण आलिया भट्ट ने चांगलं काम केलं आहे, ह्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे पण तिचं वय ह्या रोलला अगदी सुटेबल आहे म्हणून कदाचित तिची निवड झाली असावी.अर्थात तिला बघतांना कुठेतरी पुजा भट्टची आठवण येत राहते.


बाकी कोणताच ओळखिचा चेहरा चित्रपटामधे वापरलेला नाही.ए.आर.रेहमान यांचं संगीत बहुतकरून ग्रामीण संगीताचा साज ल्यालेलं आहे त्यामुळे गाणी लक्षात राहतात.