Monday, September 30, 2013

'नवरा' एक खोज - भाग १० ( अंतिम )

सहा महिन्यांचा परदेशदौरा करून घरी आले आणि बाबांनी भलीमोठी यादी माझ्यासमोर ठेवली. यादी कसली विचारा, हं बरोब्बर! ती यादी होती 'यंदा कर्तव्य असणा-या मुलांची'! मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला Fool आणि स्वतःला आठवण करून दिली की हम्म अजून आपला नवरा शोधायचा

राहिला आहे,मी विसरलेच होते Blush

हूह! तर मी ती यादी हातात घेतली आणि लॅपटॉप उघडून एकेका मुलाचं प्रोफाईल बघायला सुरूवात केली.जे जे ठीक वाटले त्यांच्या नावावर टीक करून यादी निकालात काढली.

प्रत्येकवेळेस जे तंत्र वापरतो ते यावेळेस नको हा एक विचार मनात आला आणि मी सगळ्यात आधी ऑनलाईन प्रोफाईल मधे टाकलेला माझा 'टीपीकल' फोटो बदलून मला चांगला वाटलेला साडीतला एकच फोटो लावला Smile

त्यानंतर ठरवलं की डोळे बंद करून कुठल्यातरी एका प्रोफाईलवर क्लीक करायचं आणि त्यालाच फक्त मेल पाठवायचं.पण पूर्वानुभवानुसार जर उत्तर आलंच नाही तर किती वेळ थांबायचं, म्हणून जास्तीत जास्त ३आठवडे वाट बघायची आणि पुढच्या मुलाच्या प्रोफाईलकडे वळायचं असं ठरवलं.

मग ठरवल्याप्रमाणे मी एक प्रोफाईल सलेक्ट केला आणि त्याला मेल पाठवून दिलं.

दोन दिवसातच त्या मुलाच्या वडीलांचा घरी फोन आला.त्यांनी माझी पत्रिका अमूक गुण जुळते असं सांगितलं आणि पुढचा काय विचार आहे असं विचारलं.

बाबांना सांगितलेलं असल्यामुळे बाबांनी,'मुलांना एक-दोनदा भेटू द्या म्हणजे कळेल आपल्याला',असं सुचवलं.मुलाचे वडील लगेच तयार झाले.मुलाचा फोन नंबर घेऊन बाबांनी मला त्याच्याशी संपर्क करायला सांगितला.

मी परत एकदा शुक्रवारची निवड केली आणि मुलाला संपर्क करून कुठे भेटायचं,किती वाजता भेटायचं ते ठरवलं.ह्या मुलाने कोणत्याही अंतराचं मोजमाप न-देता,आढेवेढे न-घेता ठरलेल्या वेळेला भेटायचं कबूल केलं.मला थोडं आश्चर्य वाटलं पण हायसंही वाटलं Smile

संध्याकाळी ६वाजताची वेळ ठरली होती आणि मला ५.५५वा. त्या मुलाचा मेसेज आला की,मी ठरलेल्या ठिकाणी आलो आहे तू आल्यावर फोन कर.

मी वेळेत पोहोचले आणि त्याला फोन केला.आमची भेट झाल्यावर मॉलमधे असणा-या एका कॉफीशॉपमधे आम्ही जाऊन बसलो.

कॉफीशॉपमधे गेल्यावर मेन्यू कार्ड समोर आलं.

त्याने मला विचारलं की इथे कोणती कॉफी चांगली मिळते? मी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे माहित नाही.
मला ते ऐकून थोडी मजा वाटली.मी मेन्यू कार्ड हातात घेऊन माझ्या माहितीतली कोणती कॉफी दिसते का ते बघितलं पण मलाही सापडेना तेंव्हा कॉफीशॉप च्या माणसानेच मदत केली Biggrin

आमच्या गप्पा सुरू झाल्या एकामधून दुसरा, दुस-यातून तिसरा असे विषय निघत गेले आणि फक्त 'अर्धा तास भेटूया' असं ठरवून आलेली मी दीडतासाने फोन वाजल्यावर भानावर आले!
एकमेकांना बाय करून,घरच्यांशी बोलून निर्णय कळवूयात असं म्हणून आम्ही निघालो.

मी स्वतःशीच विचार करत होते की काय झालं आज Shok दीड तास वेळ कसा निघून गेला कळालंच नाही Smile

खूप दिवसांनंतर दोन मित्र भेटल्यावर जशा मनमोकळ्या अगदी मनापासून गप्पा होतात तसं काहीसं वाटलं.
आज पहिल्यांदा मी ह्या मुलाला भेटले आणि तरी इतक्या गप्पा का कराव्याश्या वाटल्या आणि तेही कोणत्याच आडकाठीशिवाय? आजपर्यंत इतक्या मुलांना भेटले पण असं कधीच झालं नाही मग आजच का?

कदाचित तो पण खूप गप्पा मारतो म्हणून झालं असेल का? पण माझं मन इतकं आनंदाने का फुलून गेलं आहे, काय असं वेगळं घडलं? मला तो आवडला आहे का? ओह गॉड Blush

पण परत विचार आला की इतक्या घाईघाईने मी निर्णयाप्रत नको पोहोचायला.घरी जाऊन विचार करू, ताईशी बोलू मग खरं उत्तर कळेल.

घरी आले आणि आधी ताईला फोन केला.आम्ही भेटलो तेंव्हापासून ते आम्ही काय अन कशाकशावर चर्चा केली ते सगळं इत्थंभूत सांगितलं.
ताई शांतपणे ऐकत होती, शेवटी तिने फक्त एकच विचारलं,तुझं अ‍ॅनालिसीस काय आहे त्या मुलाबद्दल? आणि मी सहजपणे बोलून गेले,'ताई, इतक्या निर्मळ मनाचा आणि निरागस मुलगा मला पहिल्यांदाच भेटला आहे'.

ताई अगदी मनापासून हसली आणि म्हटली,'तेरी तो घंटी बज गयी बेटाssss, आय थिंक ज्या सहजतेने तुम्ही आज गप्पा केल्या त्यावरून तुम्हांला दोघांनाही पुढे जायला हरकत नाही'.
मी तर उडालेच ते ऐकून Shok
मी परत एकदा तिला विचारलं,'खरंच तुला असं वाटतंय?'

ताई म्हटली, 'घाई नाही आपल्याला. तुम्ही हवं तर अजून दोन-तीन वेळेस भेटा. जर, तुझं मत आता सांगितल्या पेक्षा वेगळं झालं तर परत आपण विचार करू, हम्म Smile

मी ताईशी बोलून फोन ठेवला पण का कोण जाणे मनामधे असाही विचार आला की,कदाचित तो मुलगा असंच सगळ्या मुलींशी वागत असेल.त्यामुळे जरी मला तो आवडला तरी त्याचं मत काय असेल? तो म्हटला की घरी गेल्यावर कळवेन पण जर त्याने नकार दिला तर? परत माझंच मन मला जागं करत म्हटलं,अगं तो स्वतः म्हटला ना की त्याला अजून एक-दोन वेळेस भेटायला आवडेल म्हणून.

मग परत वाटलं, आता त्याचा फोन येईपर्यंत नकोच विचार करायला.

असं ठरवलं खरं पण माझं मन काही त्याचा विषय सोडायला तयार होईना.रात्रीसुध्दा दोन मिनीटामधे झोपणारी मी संध्याकाळच्या भेटीचा प्रसंग आळवत पडले होते ..रात्री कधी झोप लागली ते कळालं नाही पण दुस-या दिवशी आईने उठवलं तेंव्हा सकाळचे ११ वाजले होते!! Mosking

आईने उठवलं आणि माझ्या चेह-यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हटली,'त्या मुलाचा थोड्यावेळापूर्वी फोन आला होता.त्याला आणि त्याच्या घरच्यांना सगळं आवडलं आहे.त्याने परत एकदा भेटायला हरकत नाही असं सांगितलं.'
मी तर एकदम खाड्कन जागीच झाले ते ऐकून Biggrin  आणि आईकडे बघतच राहिले. मी स्वप्न तर बघत नाही ना म्हणून स्वतःला चिमटा पण काढून बघितला. पण हो आई खरंच माझ्यासमोर बसली होती आणि अगदी कौतुकाने हसत होती Smile

मी लगेच ताईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली.आम्ही परत भेटल्यावर काय बोलायला हवं ह्याची चर्चा केली आणि तासाभराने त्या मुलाला रविवारी भेटायची वेळ ठरवायला फोन केला.

...पुढे आम्ही दोन-तीन वेळेस भेटलो. खूप खूप गप्पा मारल्या. नोकरी,पगार, एकमेकांची स्वप्नं,स्थायिक होण्याचं शहर, आई-बाबा-कुटुंब,नविन नातं आणि अजून भरपूर काही.

भेटीनंतर प्रत्येक वेळेस मी माझं मत तपासून बघत होते पण ते बदललं नाही.

मग काय एके दिवशी आई-बाबा आणि मी त्या मुलाच्या घरी गेलो लग्नाची बोलणी करायला आणि

फायनली माझं लग्न ठरलं  Blush Mosking Clapping Dance 4 Yahoo

तर अशी ही साठा-उत्तरांची 'नवराखोज' कहाणी पाचा-उत्तरी सफळ संपूर्ण झाली Biggrin

समाप्त

Tuesday, September 24, 2013

'नवरा' एक खोज - भाग ९

चार दिवसात एका प्रोफाईलच्या वडीलांनी घरी फोन केला.आईने सगळी माहिती विचारली आणि दोन दिवसांत कळवतो म्हणून सांगितलं.मी संध्याकाळी घरी आल्यावर आईने मला त्या मुलाचं प्रोफाईल चेक करायला सांगितलं.फोटो व्यवस्थित होता,द्वीपदवीधर होता,घरच्यांबद्दल-स्वतःबद्दलपण नीट माहिती दिली होती.मला सगळं ठीक वाटलं,मी ठीक आहे म्हटलं.

पण, मला तर परदेशी जायचं होतं मग ह्या मुलाला आत्ता भेटणं ठीक राहील का अशी शंका मी उपस्थित केली.त्यावर सगळ्यांचं म्हणणं झालं की जाण्याआधी एकदा भेटून बघ, जर ठीक वाटत असेल तर पाहता येईल पुढचं कसं करायचं ते.मी तयार झाले पण माझी एक अट होती की,मी एकटीच जाऊन ह्या मुलाला एखाद्या कॉफीशॉपमधे भेटेन उगाच कंटाळवाणा,टाईमपास कांदा-पोहे प्रोग्रॅम मला नकोय! वेळेचं गणित बघता आई-बाबा पण तयार झाले.

त्या मुलाच्या घरी बाबांनी फोन केला आणि सांगितलं की,मुलांना बाहेर भेटून घेऊ देत मग सगळं ठीक वाटलं तर आपण भेटू.पण त्या मंडळींनी गळ घातली की तुम्ही घरीच या,घर पण बघणं होईल आणि आपल्या गप्पा पण होतील.पण बाबांनी ते आग्रहाचं निमंत्रण टाळून निग्रहाने 'बाहेर भेटून घेऊ द्या' हे सांगितलं.मुलाकडची मंडळी म्हटली ठीक आहे आम्ही कळवतो.

दुस-या दिवशी सकाळी त्या मुलाच्या वडीलांनी 'आम्हाला हरकत नाही'चं सर्टीफिकेट दिलं आणि मुलीला स्थळ-काळ-वेळ ठरवण्यासाठी फोन करायला सांगा असा निरोपही दिला.

त्या दिवशी मला ऑफिसमधे काम कमी होतं आणि शुक्रवारचा दिवस होता म्हणून मी त्या मुलाला फोन केला.
आज संध्याकाळी ७वाजता अमूक ठिकाणी भेटूया का असा मी प्रस्ताव मांडला, तो म्हटला मी माझं शेड्यूल चेक करून अर्ध्या तासामधे तुला कळवतो.
बरोबर अर्ध्या तासाने त्याचा फोन आला.
पण त्याचं म्हणणं झालं की,
तो: तू सांगितलेली जागा माझ्या ऑफिसपासून १६किमी वर आहे म्हणून आपण १०किमी वर असलेल्या कॉफीशॉप मधे भेटूया का?
मी: पण मला ती जागा माहीत नाही. त्यापेक्षा आपण तमुक ठिकाणी भेटलं तर चालेल का?
तो: पण तिथे सीसीडी आहे का?
मी: मला माहीत नाही पण असायला हवं,ते जर नसेल तर दूसरं कॉफीशॉप चालेल का?
तो: हो ठीक आहे.मग भेटू आपण आज संध्याकाळी ७वाजता.
मी: हो ठीक आहे.

मी ऑफिसचं काम आटोपून ६.५५वा. ठरलेल्या जागी येऊन थांबले.
दहा मिनीटे झाली तरी त्याचा फोन नाही म्हणून मी त्याला फोन केला.पहिल्या वेळेस त्याने उचलला नाही म्हणून मी त्याला मेसेज केला मी तिथे पोहोचल्याचा पण तरी काही रिप्लाय नाही आला Sad

दहा मिनीटाने त्याचा फोन आला की,७.३०वा. भेटायचं ठरलं होतं आपलं तू इतक्या लवकर का आली आहेस तिथे??
मी म्हटलं ७वा. भेटायचं ठरलं होतं!!
तर तो म्हटला पण मी तर आत्ता निघालो आहे ऑफिसमधून त्यामुळे अजून दहा मिनीटांमधे पोहोचेन.मी म्हटलं ठीक आहे आता इतका उशीर तर झालाचं आहे अजून दहा मिनीटे थांबूया Boredom
मी गाणे ऐकत त्याच्या फोनची वाट बघत तिथेच बसून राहीले.

दहा मिनीटांनी त्याचा फोन.तू सांगितलेली जागा कुठे आहे,मला सापडत नाहीये गूगल मॅप्सवर, प्लीज मला गाईड कर.मग मी त्याला रस्त्याचं मार्गदर्शन करत शेवटी जिथे ती जागा आहे तिथवर घेऊन आले,हूह!!

बाईक पार्क करून तो मला हाय म्हटला आणि सीसीडी च्या ऐवजी बरिस्ताचं कॉफीशॉप बघून म्हटला इथे सीसीडी का नाही?? मी म्हटलं कारण इथे बरिस्ता आहे  Blum 3
थोडं घुश्श्यातच त्याने माझ्याकडे बघितलं आणि आम्ही आत गेलो.समोर दिसलेल्या टेबलापाशी जाऊन बसलो.त्याने मला काय घेणार म्हणून विचारलं,मी तिथे असलेल्या मेन्यूपैकी एक शितपेय सांगितलं.पैसे आणि ऑर्डर देऊन तो येऊन बसला आणि..५..१०..१५मिनीटे झाली तरी एकही शब्द बोलला नाही  Shok
मी विचार करत बसले की ह्याला झालंय तरी काय हा बोलत का नाही?पण मी वाट बघून इतकी वैतागले होते की म्हटलं जाऊ देत बोलेल तेंव्हा बोलेल.

तितक्यात आमच्यासमोर शितपेयं आली,त्याने पहिला घोट घेतला आणि ओरडतचं बोलायला सुरूवात केली
तो: ७.३०वा. भेटायचं ठरलं होतं ना मग तू ७वा. का आलीस??
मी: (माझा आवाज शांत ठेउन)अरे पण आपण दुपारी फोनवर जेंव्हा बोललो तेंव्हा वेळ ७ ची ठरली होती.
तो: शक्यच नाही.मला चांगलं आठवतंय आपण ७.३०ला भेटूया असं बोललो होतो!
मी: ठीके! तू ठरवलं होतंस त्याप्रमाणे तू त्याच वेळेला आलास आणि मी माझ्या वेळेला!!

इतक्यात त्याचा फोन वाजला.अगदी हळू आवाजात त्याने,'हो पोहोचलो मी,भेटलो तिला,झालं की कळवतो हं' असं पलिकडच्या माणसाला सांगितलं आणि फोन ठेवला.

तो माझ्यावर असा ओरडेल असं मला अपेक्षितच नव्हतं त्यातही माझी काही चूक नव्हती तरीपण तो मला असं बोलला त्यामुळे मी पण चिडले होते,पण शक्यतो शांत रहावं म्हणून मी नकोच काही बोलायला असं ठरवलं आणि शितपेयं सीप करत बसले.

तो: (इंग्लीशमधे) तुझे ऑफिस अवर्स कधी संपतात.
मी: (मराठीमधे) कामावर अवलंबून आहे तरीपण माझी शिफ्ट ११ ते ८ असते.
तो: (इंग्लीशमधे) तुझं ऑफिस कुठे आहे, टेक्नॉलॉजी काय आहे तुझी
मी: (मराठीमधे) ....
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
मी मराठीमधून बोलत असूनही तो सारखा इंग्लीशमधूनच बोलतोय म्हटल्यावर मी पण इंग्लीश स्रुरू केलं.
तो: तुला ऑस्ट्रेलिया आवडतं का? मी तिकडे शिफ्ट होणार आहे.लोक वेड्यासारखे यू.एस. आणि यू.के.च्या मागे लागतात पण त्यांना माहीत नाही की ऑस्ट्रेलियामधे किती स्कोप आहे.मला माझ्या गाईडने सांगितल्याप्रमाणे मी व्हिसासाठीची सगळी प्रोसिजर सुरू केली.त्यामधे इंग्लिशची टेस्ट असते,मग अ‍ॅप्टी असते,मग हे असतं...ते असतं...

मी त्याच्याकडे फक्त बघत बसले होते.त्याच्या इंग्लीशमधे बोलण्याचं कारण मला आत्ता कळालं होतं त्यामुळे मी म्हटलं संपव बाबा तू तुझं 'ऑस्ट्रेलिया पुराण' मग मी बोलेन Mosking

थोड्या वेळाने त्याने थोडा पॉझ घेतला आणि माझ्याकडे बघितलं.मी एक क्षण ब्लँक झाले,आता काय बोलू?
मग तोच म्हटला,तुला काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे जायला.
मी: पण मला माहीत नाही माझी कंपनी तिकडे ऑपरेट करते की नाही आणि प्रोजेक्ट नसेल तर कसं मिळेल जायला.
तो: अगं मी तर नोकरी सोडून जाणार आहे तिकडे.तिथे गेल्यावर आरामात नोकरी मिळेल माझा गाईड म्हटला आहे मला.
मी: मी एकदम जागीच झाले त्याचं ते वाक्य ऐकून!मी सरळ सांगितलं मी हातातली नोकरी सोडून अशी नाही जाऊ शकत.
तो: पण मला ऑस्ट्रेलियाला जायचंच आहे.
मी: ठीक आहे. पण जर दोघांनी हातातली नोकरी सोडून तिथे जाऊन नव्याने सगळं सुरू करायचा विचार केला तर तिथे राहणार कुठे आणि खाणार काय? तिथे उपयोगी येईल इतका पैसा कसा मॅनेज कसा करणार आहेस तू?
तो: मी आतापर्यंत जितका पैसा कमावला आहे तितका सगळा मी तिकडे नेणार आहे म्हणजे मग नोकरी लागेपर्यंत व्यवस्था होऊ शकते आणि राहायचं म्हटलं तर माझा गाईड त्याची व्यवस्था लावणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करायची गरज नाही Smile
मी: हम्म.पण तरी मला नाही पटत.एनीवे तुला अजून काही विचारायचं आहे का?
तो: तुला काय वाटतं एकत्र कुटुंबाबद्दल? तुला चालेल का? तू अ‍ॅडजेस्ट करू शकशील का?
मी: हो मला काही हरकत नाही.फक्त एकच आहे की,मी लग्नानंतर सुध्दा नोकरी करणार आहे तर कदाचित बाकीच्यांना माझ्यावेळेसोबत अ‍ॅडजेस्ट करावं लागेल.
तो: तुला काय वाटतं फॅमिली कितपत इम्पॉर्टंट आहे?
मी: फॅमिली महत्त्वाची आहेच पण त्याहीपेक्षा ज्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतित करायचं तो जास्त महत्त्वाचा आहे.
तो: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की फॅमिली सेकंडरी आहे?
मी: अर्थातच.
तो: नाही मला नाही पटत! फॅमिली सगळ्यात पहिले आणि मग इंडिव्ह्युज्युअल.
मी: सॉरी माझ्यासाठी तरी माझ्या पार्टनरचा स्वभाव आणि त्याचं माझ्या आयुष्यातलं स्थान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग त्याचं कुटुंब.
तो: आय थिंक मग आम्हांला चुकीची माहिती मिळाली तुझ्याबद्दल.
मी: काय? माझ्याबद्दल तुला माहित आहे Shok
तो: हो. तुझ्या आईसोबत माझ्या मामाची मुलगी शिकली आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हांला तुझ्याबद्दल कळालं.पण आम्हांला असं सांगितलं गेलं की मुलगी खूप चांगली आहे, शिकलेली आहे आणि मोठ्यांचा आदर करते.पण जर तुझ्यासाठी कुटूंब सेकंडरी असेल तर मग मला नाही पटणार.

त्याचं सगळं ऐकून मी शॉक झाले पण, माझे विचार किंवा मी कोण अन कशी आहे ही गोष्ट मला त्याला अजून पटवून द्यायची काहीच गरज वाटली नाही.डोक्यातला राग थोपवत मी फक्त म्हटलं,

मी: ठीक आहे. धन्यवाद आपण इथे भेटलात पण परत कधीच भेटू नका,बाय!

कॉफीशॉपमधून बाहेर पडल्या पडल्या मी आईला फोन करून सांगितलं,'असल्या भांडकूदळ आणि चुकीचं असलं तरी स्वतःचंच घोडं दामटणा-या आणि दुस-याचं म्हणणं नीट ऐकून समजावून न-घेणा-या माणसाशी मला लग्न करायचं नाही!!'