Tuesday, September 24, 2013

'नवरा' एक खोज - भाग ९

चार दिवसात एका प्रोफाईलच्या वडीलांनी घरी फोन केला.आईने सगळी माहिती विचारली आणि दोन दिवसांत कळवतो म्हणून सांगितलं.मी संध्याकाळी घरी आल्यावर आईने मला त्या मुलाचं प्रोफाईल चेक करायला सांगितलं.फोटो व्यवस्थित होता,द्वीपदवीधर होता,घरच्यांबद्दल-स्वतःबद्दलपण नीट माहिती दिली होती.मला सगळं ठीक वाटलं,मी ठीक आहे म्हटलं.

पण, मला तर परदेशी जायचं होतं मग ह्या मुलाला आत्ता भेटणं ठीक राहील का अशी शंका मी उपस्थित केली.त्यावर सगळ्यांचं म्हणणं झालं की जाण्याआधी एकदा भेटून बघ, जर ठीक वाटत असेल तर पाहता येईल पुढचं कसं करायचं ते.मी तयार झाले पण माझी एक अट होती की,मी एकटीच जाऊन ह्या मुलाला एखाद्या कॉफीशॉपमधे भेटेन उगाच कंटाळवाणा,टाईमपास कांदा-पोहे प्रोग्रॅम मला नकोय! वेळेचं गणित बघता आई-बाबा पण तयार झाले.

त्या मुलाच्या घरी बाबांनी फोन केला आणि सांगितलं की,मुलांना बाहेर भेटून घेऊ देत मग सगळं ठीक वाटलं तर आपण भेटू.पण त्या मंडळींनी गळ घातली की तुम्ही घरीच या,घर पण बघणं होईल आणि आपल्या गप्पा पण होतील.पण बाबांनी ते आग्रहाचं निमंत्रण टाळून निग्रहाने 'बाहेर भेटून घेऊ द्या' हे सांगितलं.मुलाकडची मंडळी म्हटली ठीक आहे आम्ही कळवतो.

दुस-या दिवशी सकाळी त्या मुलाच्या वडीलांनी 'आम्हाला हरकत नाही'चं सर्टीफिकेट दिलं आणि मुलीला स्थळ-काळ-वेळ ठरवण्यासाठी फोन करायला सांगा असा निरोपही दिला.

त्या दिवशी मला ऑफिसमधे काम कमी होतं आणि शुक्रवारचा दिवस होता म्हणून मी त्या मुलाला फोन केला.
आज संध्याकाळी ७वाजता अमूक ठिकाणी भेटूया का असा मी प्रस्ताव मांडला, तो म्हटला मी माझं शेड्यूल चेक करून अर्ध्या तासामधे तुला कळवतो.
बरोबर अर्ध्या तासाने त्याचा फोन आला.
पण त्याचं म्हणणं झालं की,
तो: तू सांगितलेली जागा माझ्या ऑफिसपासून १६किमी वर आहे म्हणून आपण १०किमी वर असलेल्या कॉफीशॉप मधे भेटूया का?
मी: पण मला ती जागा माहीत नाही. त्यापेक्षा आपण तमुक ठिकाणी भेटलं तर चालेल का?
तो: पण तिथे सीसीडी आहे का?
मी: मला माहीत नाही पण असायला हवं,ते जर नसेल तर दूसरं कॉफीशॉप चालेल का?
तो: हो ठीक आहे.मग भेटू आपण आज संध्याकाळी ७वाजता.
मी: हो ठीक आहे.

मी ऑफिसचं काम आटोपून ६.५५वा. ठरलेल्या जागी येऊन थांबले.
दहा मिनीटे झाली तरी त्याचा फोन नाही म्हणून मी त्याला फोन केला.पहिल्या वेळेस त्याने उचलला नाही म्हणून मी त्याला मेसेज केला मी तिथे पोहोचल्याचा पण तरी काही रिप्लाय नाही आला Sad

दहा मिनीटाने त्याचा फोन आला की,७.३०वा. भेटायचं ठरलं होतं आपलं तू इतक्या लवकर का आली आहेस तिथे??
मी म्हटलं ७वा. भेटायचं ठरलं होतं!!
तर तो म्हटला पण मी तर आत्ता निघालो आहे ऑफिसमधून त्यामुळे अजून दहा मिनीटांमधे पोहोचेन.मी म्हटलं ठीक आहे आता इतका उशीर तर झालाचं आहे अजून दहा मिनीटे थांबूया Boredom
मी गाणे ऐकत त्याच्या फोनची वाट बघत तिथेच बसून राहीले.

दहा मिनीटांनी त्याचा फोन.तू सांगितलेली जागा कुठे आहे,मला सापडत नाहीये गूगल मॅप्सवर, प्लीज मला गाईड कर.मग मी त्याला रस्त्याचं मार्गदर्शन करत शेवटी जिथे ती जागा आहे तिथवर घेऊन आले,हूह!!

बाईक पार्क करून तो मला हाय म्हटला आणि सीसीडी च्या ऐवजी बरिस्ताचं कॉफीशॉप बघून म्हटला इथे सीसीडी का नाही?? मी म्हटलं कारण इथे बरिस्ता आहे  Blum 3
थोडं घुश्श्यातच त्याने माझ्याकडे बघितलं आणि आम्ही आत गेलो.समोर दिसलेल्या टेबलापाशी जाऊन बसलो.त्याने मला काय घेणार म्हणून विचारलं,मी तिथे असलेल्या मेन्यूपैकी एक शितपेय सांगितलं.पैसे आणि ऑर्डर देऊन तो येऊन बसला आणि..५..१०..१५मिनीटे झाली तरी एकही शब्द बोलला नाही  Shok
मी विचार करत बसले की ह्याला झालंय तरी काय हा बोलत का नाही?पण मी वाट बघून इतकी वैतागले होते की म्हटलं जाऊ देत बोलेल तेंव्हा बोलेल.

तितक्यात आमच्यासमोर शितपेयं आली,त्याने पहिला घोट घेतला आणि ओरडतचं बोलायला सुरूवात केली
तो: ७.३०वा. भेटायचं ठरलं होतं ना मग तू ७वा. का आलीस??
मी: (माझा आवाज शांत ठेउन)अरे पण आपण दुपारी फोनवर जेंव्हा बोललो तेंव्हा वेळ ७ ची ठरली होती.
तो: शक्यच नाही.मला चांगलं आठवतंय आपण ७.३०ला भेटूया असं बोललो होतो!
मी: ठीके! तू ठरवलं होतंस त्याप्रमाणे तू त्याच वेळेला आलास आणि मी माझ्या वेळेला!!

इतक्यात त्याचा फोन वाजला.अगदी हळू आवाजात त्याने,'हो पोहोचलो मी,भेटलो तिला,झालं की कळवतो हं' असं पलिकडच्या माणसाला सांगितलं आणि फोन ठेवला.

तो माझ्यावर असा ओरडेल असं मला अपेक्षितच नव्हतं त्यातही माझी काही चूक नव्हती तरीपण तो मला असं बोलला त्यामुळे मी पण चिडले होते,पण शक्यतो शांत रहावं म्हणून मी नकोच काही बोलायला असं ठरवलं आणि शितपेयं सीप करत बसले.

तो: (इंग्लीशमधे) तुझे ऑफिस अवर्स कधी संपतात.
मी: (मराठीमधे) कामावर अवलंबून आहे तरीपण माझी शिफ्ट ११ ते ८ असते.
तो: (इंग्लीशमधे) तुझं ऑफिस कुठे आहे, टेक्नॉलॉजी काय आहे तुझी
मी: (मराठीमधे) ....
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
मी मराठीमधून बोलत असूनही तो सारखा इंग्लीशमधूनच बोलतोय म्हटल्यावर मी पण इंग्लीश स्रुरू केलं.
तो: तुला ऑस्ट्रेलिया आवडतं का? मी तिकडे शिफ्ट होणार आहे.लोक वेड्यासारखे यू.एस. आणि यू.के.च्या मागे लागतात पण त्यांना माहीत नाही की ऑस्ट्रेलियामधे किती स्कोप आहे.मला माझ्या गाईडने सांगितल्याप्रमाणे मी व्हिसासाठीची सगळी प्रोसिजर सुरू केली.त्यामधे इंग्लिशची टेस्ट असते,मग अ‍ॅप्टी असते,मग हे असतं...ते असतं...

मी त्याच्याकडे फक्त बघत बसले होते.त्याच्या इंग्लीशमधे बोलण्याचं कारण मला आत्ता कळालं होतं त्यामुळे मी म्हटलं संपव बाबा तू तुझं 'ऑस्ट्रेलिया पुराण' मग मी बोलेन Mosking

थोड्या वेळाने त्याने थोडा पॉझ घेतला आणि माझ्याकडे बघितलं.मी एक क्षण ब्लँक झाले,आता काय बोलू?
मग तोच म्हटला,तुला काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे जायला.
मी: पण मला माहीत नाही माझी कंपनी तिकडे ऑपरेट करते की नाही आणि प्रोजेक्ट नसेल तर कसं मिळेल जायला.
तो: अगं मी तर नोकरी सोडून जाणार आहे तिकडे.तिथे गेल्यावर आरामात नोकरी मिळेल माझा गाईड म्हटला आहे मला.
मी: मी एकदम जागीच झाले त्याचं ते वाक्य ऐकून!मी सरळ सांगितलं मी हातातली नोकरी सोडून अशी नाही जाऊ शकत.
तो: पण मला ऑस्ट्रेलियाला जायचंच आहे.
मी: ठीक आहे. पण जर दोघांनी हातातली नोकरी सोडून तिथे जाऊन नव्याने सगळं सुरू करायचा विचार केला तर तिथे राहणार कुठे आणि खाणार काय? तिथे उपयोगी येईल इतका पैसा कसा मॅनेज कसा करणार आहेस तू?
तो: मी आतापर्यंत जितका पैसा कमावला आहे तितका सगळा मी तिकडे नेणार आहे म्हणजे मग नोकरी लागेपर्यंत व्यवस्था होऊ शकते आणि राहायचं म्हटलं तर माझा गाईड त्याची व्यवस्था लावणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करायची गरज नाही Smile
मी: हम्म.पण तरी मला नाही पटत.एनीवे तुला अजून काही विचारायचं आहे का?
तो: तुला काय वाटतं एकत्र कुटुंबाबद्दल? तुला चालेल का? तू अ‍ॅडजेस्ट करू शकशील का?
मी: हो मला काही हरकत नाही.फक्त एकच आहे की,मी लग्नानंतर सुध्दा नोकरी करणार आहे तर कदाचित बाकीच्यांना माझ्यावेळेसोबत अ‍ॅडजेस्ट करावं लागेल.
तो: तुला काय वाटतं फॅमिली कितपत इम्पॉर्टंट आहे?
मी: फॅमिली महत्त्वाची आहेच पण त्याहीपेक्षा ज्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतित करायचं तो जास्त महत्त्वाचा आहे.
तो: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की फॅमिली सेकंडरी आहे?
मी: अर्थातच.
तो: नाही मला नाही पटत! फॅमिली सगळ्यात पहिले आणि मग इंडिव्ह्युज्युअल.
मी: सॉरी माझ्यासाठी तरी माझ्या पार्टनरचा स्वभाव आणि त्याचं माझ्या आयुष्यातलं स्थान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग त्याचं कुटुंब.
तो: आय थिंक मग आम्हांला चुकीची माहिती मिळाली तुझ्याबद्दल.
मी: काय? माझ्याबद्दल तुला माहित आहे Shok
तो: हो. तुझ्या आईसोबत माझ्या मामाची मुलगी शिकली आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हांला तुझ्याबद्दल कळालं.पण आम्हांला असं सांगितलं गेलं की मुलगी खूप चांगली आहे, शिकलेली आहे आणि मोठ्यांचा आदर करते.पण जर तुझ्यासाठी कुटूंब सेकंडरी असेल तर मग मला नाही पटणार.

त्याचं सगळं ऐकून मी शॉक झाले पण, माझे विचार किंवा मी कोण अन कशी आहे ही गोष्ट मला त्याला अजून पटवून द्यायची काहीच गरज वाटली नाही.डोक्यातला राग थोपवत मी फक्त म्हटलं,

मी: ठीक आहे. धन्यवाद आपण इथे भेटलात पण परत कधीच भेटू नका,बाय!

कॉफीशॉपमधून बाहेर पडल्या पडल्या मी आईला फोन करून सांगितलं,'असल्या भांडकूदळ आणि चुकीचं असलं तरी स्वतःचंच घोडं दामटणा-या आणि दुस-याचं म्हणणं नीट ऐकून समजावून न-घेणा-या माणसाशी मला लग्न करायचं नाही!!'

No comments:

Post a Comment