Wednesday, October 6, 2010

थोडंसं बहिरं व्हायला हवं...

सोमवार सकाळी १०.०० ची वेळ...मी माझ्या कंप्यूटर मधे डोकं घालून समोर आलेला गहन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतीये...तितक्यात बॉस येतो...आज काय काय कामं आहेत ह्याची उजळणी करून घ्यायला..त्याचं होत नाही की माझ्या टेबल वरचा फोन खणखणतो...तिकडून एका यूज़र चा आवाज..हे चालत नाहीये आणि ते सुरू नाहीये...समोर बसणार्‍या मॅनेजर्स ची वीकेंड ला काय काय केला ह्यावर जोरजोरात चर्चा सुरू आहे...इथे माझ्या प्रश्नाचं विराट रूप बघून मी आधीच वैतागलिये आणि त्यात ही आजु-बाजूची जनता नुसती गोंधळ घालतीये...वैताग आलाय मला ह्या सगळ्यांचा...पण त्यांना शांत बसवणार कसं? काश मेरे पास कोई रिमोट कंट्रोल होता!!
डोकं फुटेल आता माझं ह्या गोंगटाने एका दिवशी!!!! आणि अचानक वाटलं...थोडंसं बहिरं व्हायला हवं...

संध्याकाळी ७.३० ची वेळ...कसं बसं ऑफीस मधलं काम आटपून मी बस-स्टॉप ला आले...बस मिळाली पण खूप गर्दी होती..गर्दीतून वाट काढत 'स्त्रियांसाठी फक्त' असलेल्या आसनाजवळ पोहचले...बस जरा हळु झाल्याचं जाणवलं, बाहेर बघितलं तर दूरवर लाल दिवा दिसला आणि त्याच्या आणि माझ्या बस मधे असलेली गाड्यांची भली मोठी रांग ही...तारसप्तकात बायकांच्या गप्पा रंगात आल्या होत्या...दुस-या कोपर्‍यात एक आजोबा त्यांच्या नातवाची खुशाली फोनवरून सॉरी फोन मधे शिरून विचारात होते... मी मात्र आशेने त्या दिव्याकडे बघत होते, कधी एकदाचा हिरवा दिवा लागतो अन बस निघते कारण पोटातले कावळे बाहेरच्या गोंगाटात मिसळून गात होते...हिरवा दिवा लागला अन सगळीकडे एकच गलका प्या-पू,प्या-पू,प्रत्येकाने आपापल्या परीने समोरच्याला निघायची सूचना द्यायला सुरूवात केली...देवा..कित्ती हा आवाज...कान फुटतील माझे...कोण सांगणार ह्यांना...आणि अचानक वाटलं...थोडंसं बहिरं व्हायला हवं...

मधेच एकदा वाटलं बाहेरचा इतका सगळा आवाज सुरू आहे तर आपणच कानात काहीतरी घालावं..मग कापसाच्या बोळ्यापेक्षा थोडा बरा पर्याय मी निवडला आणि एंपी3 प्लेयर घेतला..गाणे, रेडियो ऐकण्यासाठी..रेडियो साठी 10 चॅनेल्स पण सापडले..कौतुकाने थोडे दिवस ऐकलं पण, त्यावरही गाणे कमी आणि नुसत्या जाहिराती आणि त्या आर.जे. ची बडबड...पुन्हा एकदा गोंगाट...

नको...

त्यापेक्षा थोडंसं बहिरच व्हावं असा विचार करून कानाचे दरवाजे अगदीच कामापुरते उघडे ठेवले अन आत डोकावले...माझं मलाच आश्चर्य वाटलं...खूप शांतता होती माझ्या मनात...कुठेतरी कोपर्‍यात एक पुस्तक दिसलं बर्‍याच दिवसांपासून वाचूया म्हणून ठेवलेलं..काही-बही अर्धवट खरडलेला एक कागद फडफडताना दिसला...खूप छोट्या छोट्या गोष्टींवर मनाशी बोलायचा राहून गेलय इतक्या दिवसात हे आठवलं...अन बरं वाटलं हा विचार करून की चला मला ह्या बहिरं होण्याच्या शोधामुळे एक घबाड मिळालं स्वत: ला होणार्‍या त्रासातून वाचवणारं :)

सूचना : ऑफीस मधे बॉस समोर बहिरं राहणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

2 comments: