Wednesday, September 28, 2011

My daddy strongest :-)


माझ्या आयुष्यातला पहिला हिरो आणि आयडॉल म्हणजे माझे बाबा! ’साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’, हा माझ्या बाबांचा जीवनमंत्र. त्यांची  रास सिंह आहे आणि तसचं त्यांचं व्यक्तिमत्त्व ही सिंहासारखं रूबाबदार आहे, कोणत्याही प्रसंगाला अगदी धीराने, न-डगमगता सामोरं जाण्याची त्यांच्यात ताकद आहे. कधीच उतावीळपणा, अधीरता त्यांच्या वागण्यात आम्हां भावंडांना दिसली नाही.

अगदी हालाखीचे दिवस काढूनही त्यांनी स्वबळावर शिक्षण पूर्ण केलं, शून्यातून सगळं विश्व उभं केलं, पण, या गोष्टीचा त्यांना जरा देखील गर्व नाहीये.

लहानपणी आमच्यावर सगळे संस्कार बाबांनी त्यांच्या वागणुकीतून केले. कोणतही काम असलं तरी आमचे बाबा ते काम परफेक्टच करणार. मग ते त्यांच्या ऑफिसचं काम असू दे किंवा स्वयंपाक! खरं सांगू, माझ्या आईपेक्षा बाबाच पुरणपोळी आणि भाकरी छान बनवतात ;-)

त्यांच्यामुळेच आमच्यातही व्यवस्थितपणा अगदी  लहानपणापासून रूजला. मला अजून आठवतं, शाळा सुरू झाल्यावर नविन आणलेल्या वह्या, पुस्तकांना कव्हरं घालायला बाबा आम्हांला शिकवायचे, कधी जर चूक झाली तर व्यवस्थित समजावून सांगायचे पण, ’मार’ हा प्रकार कधीच नव्हता.

माझ्या बाबांचं अक्षर अतिशय सुंदर आहे, ते उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांची देवावरही खूप श्रद्धा आहे. पण, देव आहे म्हणून तारून नेईल अशी त्यांची वृत्ती नाही, तर ते एक कर्तव्यनिष्ठ मुलगा, पती आणि पिता आहेत.

पुस्तकं वाचायची आवड मला बाबांमुळे लागली, माझ्यासोबत बुध्दिबळ खेळायला बाबाच नेहमी पार्टनर असायचे. माझ्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी सुद्धा बाबाच करून घ्यायचे, मला जेंव्हा पहिलं बक्षिस मिळालं होतं तेंव्हा बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली होती,’बक्षिस मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही आणि जर एखाद्यावेळेस नाही मिळालं तर रडायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचे, यश जरूर मिळतं’..असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत ज्यामधून बाबांनी आमचा स्वभाव घडवला.

मी कधीच त्यांना निराश झालेलं बघितलं नाही, कायम त्यांनी संकटातून अगदी धीराने स्वत:ला सावरलं, कधीच त्यांच्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहिला आणि त्यांनी आमच्या डोळ्यात येऊ नाही दिला.

असं सगळे जण म्हणतात की, आई-वडील जर काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात मिळवू नाही शकले तर त्या गोष्टी पूर्ण करण्याची अपेक्षा ते आपल्या मुलांकडून ठेवतात, पण, आमच्यावर कधीच बाबांनी त्यांच्या इच्छांचं ओझं लादलं नाही, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार शिकू दिलं.

मध्यमवर्गीय म्हटल्यावर ’बाबा’ ह्या व्यक्तीला घर आणि ऑफिस यातून आपल्या मुलांसाठी म्हणावा तितका वेळ काढता येत नाही पण, आमचे बाबा प्रत्येक वेळेस आमच्यासाठी, आमच्याजवळ होते, आहेत. कधी बोर्डाची परिक्षा असू देत अथवा कॉलेजचं अ‍ॅडमिशन, गणपतीची मिरवणूक किंवा कर्णपूरा देवीची जत्रा..

बाबांच्या संयमी स्वभावामुळे लहानपणापासून ते आजतागायत मी कधीही घरामधे कुरबूर, भांडण, रडारड असे प्रकार बघितले नाही, आम्ही सगळी भावंड अगदी खेळकर वातावरणात मोठे झालो.

आम्हां मुलींना स्वावलंबी बनविण्यात आमच्या बाबांचा खूप मोठा वाटा आहे, मी स्वत: ला अतिशय भाग्यशाली समजते मला इतके प्रेमळ, कर्तव्यदक्ष,ढाल बनून आमचं रक्षण करणारे बाबा मिळाले.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

No comments:

Post a Comment