Tuesday, September 6, 2011

सुट्टी



चला, आता फक्त एकच आठवडा राहिला गणेश चतुर्थीला, लवकरात लवकर सामानाची बांधाबांध करायला हवी, १० दिवसांच्या सुट्टीवर जायचं म्हणजे काही विसरायला नको!

घरी पार्वती आई, शंकर आण्णा, कार्तिकेय दादा सगळे कित्ती खुष होतील मला १ वर्षांनंतर बघून आणि मी सुद्धा ह्या सगळ्या मानवांपासून अगदी दूर कैलासावर शांततेत सुट्टी व्यतित करेन. मी त्या टिळकांचा अगदी मनापासून आभारी आहे त्यांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केल्यापासून, निदान एका मानवाला तरी माझी कीव आली आणि १० दिवस का होईना माझी ह्या मानवांच्या रहाटगाडग्यातून सुटका झाली!!

हल्ली सार्वजनिक गणेशत्सोव म्हणजे डोक्याला ताप होउन बसलाय! कित्ती लाउड म्युझिक असतं आणि गाणी तर अहाहा...ट ला फ जोडलं आणि नाशिक ढोल त्यात टाकला की झालं ह्यांचं गाणं तयार!! असल्या गोंगाटावर इतकं बेहोष होउन नाचता येतं हे कोडंच मला आजतागायत सुटलं नाही. कधी कधी वाटतं की, इतर देवांसारखे माझे कान जर लहान असते तर निदान कानात बोटं तरी घालून बसलो असतो पण...जाउ द्यात.

मला आणताना आणि १० दिवस संपल्यावर विसर्जनासाठीची जी मिरवणूक काढतात त्याचा फार त्रास होतो, एकतर अतिशय गर्दी असते प्रत्येक मंडळाच्या मंडळींची, त्यात खड्ड्यातले अरूंद रस्ते आणि आलाच तर रिमझिम पासून ते धो धो पडणारा पाऊस आणि हे सगळं कमी की काय म्हणून उरले सुरले ते डीजे कोकलत असतात त्या स्पिकर्स च्या भिंतींमधून! बरं ह्या सगळ्यात शिस्त वगैरे प्रकार हा कधी नसतोच, म्हणजे आपला ’लाडका’ बाप्पा येतोय किंवा आपण त्याला नेतोय ह्या एका गोष्टीमुळे सगळे नियम धाब्यावर ठेवले जातात!!

त्या बिचा-या टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हा घरातला गणपती बाहेर आणला पण, आता फक्त काही काही गणेश मंडळांमधे एक औपचारिकता म्हणून त्यांचा फोटो लावलेला असतो आणि समाजप्रबोधन म्हणजे काय हे माहित असणं तर दूरच पण हा शब्द सुध्दा अर्ध्याअधिक लोकांनी ऎकलेला नसतो.

उत्सव आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, तुम्ही मजा करा ना, माझी काही हरकत नाहीये पण, जरा काही महत्त्वाच्या गोष्टींचं भान ही ठेवा. जसं की, मिरवणुकीत तारसप्तकातली गाणी लाउन नाचत-गात रस्ता अडविण्यापेक्शा साधं हातात जरी आणलत मला तरी मी खुष होइन. उगाच तास-तास त्या मिरवणुका चालणार, रस्त्यात गर्दी होणार, रहिवाश्यांना सगळ्या गोंगाटाचा त्रास, म्हणजे ह्यात मंडळाची लोकं मजा करणार आणि बाकीच्यांचे हाल!! उगाच खंडणी वसून केल्या सारखं लोकांकडून माझ्या उत्सवाची वर्गणी गोळा करण्यापेक्षा साधा साखर-खोब-याचा नैवेद्य दाखवून एखाद्या पाटावर जरी माझी स्थापना केलीत तरी मी सगळ्यांना आशिर्वाद देइन.

खरं तर, ह्या १० दिवसात एकत्र येउन मंडळाचे कार्यकर्ते वेळ अगदी सत्कारणी लाउ शकतात पण, जेंव्हा मी काही कार्यकर्त्यांना गोळा केलेल्या वर्गणीचा दुरूपयोग करतांना बघतो तेंव्हा खुप वाईट वाटतं पण काय करणार अगदी प्रत्येकाला समजावून सांगणं अशक्य होतंय आता आणि किती किती ठिकाणी मी पुरणार आहे.

मला आणखिन एका गोष्टीचं खुप आश्चर्य वाटतं की, मी वर्षभर ह्या ना त्या मंदिरांमधे बसलेलो असतो पण, जेंव्हा गणेश उत्सव असतो तेंव्हाच ’नवस’ बोलणा-यांची इतकी गर्दी का होते? म्हणजे, मला तरी वाटतं की, त्या मंदिरातही मी तुमचं ऎकु शकतो आणि ह्या मंडळातही, असो.

एक मात्र आहे, एकीकडे महागाई वाढत असली तरीही माझ्या समोर पैसे,सोनं-चांदी ह्या गोष्टींचा होणारा ढीग काही कमी होत नाहीये, मागच्या वर्षीच्या कम्प्यारिझन मधे ह्या वेळेस तो १ल्या दिवसापासूनच वाढत चाललाय.  

मला कौतुक वाटतं ते सगळ्या मुर्तिकारांचं, कित्ती वेगवेगळ्या आणि लोभसवाण्या रूपात मला ते नटवतात, भव्य-दिव्य आकार देतात. अगदी, प्रत्येक देवाच्या साच्यात मला घडवतात.दाग-दागिने, आकर्षक रंगसंगतीने मला सजवतात.मला हे सगळं बघायला खुप आवडतं म्हणजे आवडायचं, कारण हल्ली मी ह्या १० दिवसांमधे पृथ्वीवर थांबतच नाही, आई-बाबांकडे जाउन राहतो.मला हा सगळा गोंगाट, मंडळांचा आणि त्यांच्याकरवी आपला मतलब काढणा-या राजकारण्यांचा चाललेला धिंगाणा बघवत नाही.कीव येते ती सामान्य माणसाची, तो आपला मला वर्षभर भक्तिभावाने पुजतो आणि ह्या १० दिवसांमधेही त्याच्या परीने माझी सेवा करतो, दुर्दैवाने त्याला मी माझ्या चाकोरीच्या बाहेर जाउन मदत नाही करू शकत. कुठेतरी मला सुध्दा लिमिटेशन्स आहेत हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो पण, सामान्य माणूस काही आशा लावणं सोडत नाही..खरं तर, प्रत्येक मानवामधे माझा अंश आहे, त्याला माझ्याकडे उगाच मंदिरांमधे येउन प्रार्थना करायची, काही मदत मागायची गरजच नाहीये, जर त्याने स्वत: ला एकदा विचारलं, स्वत: वर विश्वास ठेवला तर त्याला सगळं काही साध्य आहे.कधी कधी काही अडचणी येतात, कोणताच मार्ग दिसत नाही पण म्हणून त्याने हाय खाउन प्रयत्न करणं सोडायचं नाही, कारण जर तो थांबला तर मी पण त्याला काही मदत करू शकत नाही..

असो..खुप गप्पा झाल्या आज, मला कामावर जायला अहो म्हणजे मंदिरात जायला उशीर होतोय..बरंय मग, आता भेटू आपण अनंत चतुर्दशी नंतर...मोरया!

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

4 comments:

  1. वरिल लिखाण मला खूप खूप आवडले. मला आमच्या गावच्या मासिकात हे प्रशिद्ध करायचे आहे. ताई मला परवानगी दयाल का?

    ReplyDelete
  2. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. मला कृपया आपलं नाव आणि कोणत्या मासिका मधे आपण हा लेख प्रसिध्द करणार आहात याची माहिती कळवावी.

    ReplyDelete
  3. गणेश उत्सव संपला आणि बाप्पा कैलास पर्वतावर पोचले
    पार्वती मातेनी विचारलं- काय कशी झाली पृथ्वी सहल?
    गणपती: "मुझपे एक एहसान करना, कि मुझपे कूच भी एहसान मत करना!"
    ...
    पार्वती: अरे हे काय बोलतो आहेस?
    गणपती: आया रे आया बॊडीगार्ड
    रिद्धी सिद्धी: अरे काय हे????
    गणपती: १२ महिने मे १२ तरीकेसे... ढिंका चिका ढिंका चिका रे ए ए ए....
    शंकर:हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राह्य्ली..!!!

    ReplyDelete
  4. हा हा हा...धन्यवाद विक्रम :-) खुपच भारी आहे तू लिहीलेलं

    ReplyDelete