Monday, January 2, 2012

सा.सू. - भाग २

सा.सू. - भाग १


१ तारीख उजाडली आणि मी, माझी मैत्रीण सामान घेउन सकाळी ७ वाजताच घरी हजर झालो. थोडं भितभितच आत गेलो कारण तो कुत्रा पुन्हा ओरडण्याची भिती होती. काकूंनी आमचं स्वागत केलं आणि खोलीत सामान ठेवायला सांगितलं. मी त्यांच्याशी दुपारच्या जेवणाबद्द्ल बोलले आणि आम्ही कॉलेजला निघून गेलो. मी दुपारी १.३० वाजता घरी आले जेवायला तर दार बंद दिसलं, मी बेल वाजवली तसं काकांनी दार उघडलं आणि काकू पलंगावर झोपलेल्या दिसल्या! मला वाटलं बरं नाही की काय, तसं विचारलं तर त्या म्हणाल्या की (१)जेवायची वेळ दुपारी १ पर्यंतचीच आहे, त्यानंतर मी झोपते. तू आज पहिल्यांदा आली आहेस म्हणून जेवायला वाढते पण उद्यापासून हे चालणार नाही. मला हे ऎकून आईची अगदी मनातून खुप खूप आठवण झाली, ती बिचारी आम्ही म्हणू तेंव्हा जेवायला वाढायची, पण आता मी घराबाहेर पडले होते ना, इथे आई नव्हती हवे तसे लाड करायला. काकूंची हाक आली तशी मी माझ्या विचारांमधून जागी झाले आणि निमूटपणे जेवायला आत गेले.पहिला घास खाल्ला आणि खुप बरं वाटलं, जेवण खुप चवदार होतं. आईच्या हातची सर नसली तरी अगदीच सुमार चव नव्हती. मी पटापट जेवले आणि बाहेर पडणार तेवढयात काकू म्हणाल्या की, ’(२)तू ४ वाजेपर्यंत घरी येउ नकोस आणि तुझ्या मैत्रिणीला सुध्दा सांग.मी दुपारी १-४ ह्या वेळेत झोपते आणि (३)मला कोणीही डिस्टर्ब केलेलं खपत नाही!’ मी ’हो’ म्हणून घराबाहेर पडले. लगेच कॉलेजमधे माझ्या मैत्रिणीला शोधून हा अतिमहत्त्वाचा निरोप दिला आणि लायब्ररीकडे पळ काढला.

लायब्ररीमधे जाउन मी डोकं धरून विचार करत होते की रोज दुपारी १-४ ह्या वेळेत करायचं तरी काय?? अभ्यास करायचा म्हटलं तर ठीक आहे पण कधी जर काही अडचण आली, कधी झोपायची इच्छा झाली तर शेवटचं लेक्चर बंक करून घरी जाउन जेवण करून घ्यावं लागेल नाहीतर उपाशीच ४ वाजेपर्यंत घराबाहेर बसावं लागेल!

नविन कॉलेज, नविन जागा ह्या सगळ्या गोष्टींचं नवल काही राहीलचं नाही, घराबाहेर पडले आणि चटके बसायला सुरूवात झाली. श्याss मी कधीच विचार केला नव्हता असं असेल घराबाहेर पडल्यावरचं लाईफ म्हणून!! जाउ देत आता काही करू शकत नाही..आलिया भोगासी असावे सादर!!

संध्याकाळी मी घरी पोहोचले तेंव्हा काकूंनी घरातल्या बाकी लोकांची ओळख करून दिली. घरात काका-काकू, त्यांचा मुलगा आणि ब्राउनी म्हणजे तो तिखट कुत्रा असं चौकोनी कुटुंब होतं आणि आता आम्ही दोघीपण त्यात अ‍ॅड झालो होतो. मला त्या कुत्र्याचं नाव खुप आवडलं, तो गावठी होता पण एकदम शार्प होता. तो जरी बाकी सर्वांसाठी फक्त पाळीव प्राणी असला तरी काकूंचा मात्र जीव की प्राण होता. स्वत:च्या मुलापेक्षा जास्त त्या ब्राउनीचच कौतुक करत होत्या ;-)

ओळखीचा समारंभ संपला तसं आम्ही जेवायला बसलो.काकूंनी लगेच सांगितलं की (४)रोज ८.३० ला जेवायला हजर राहायचं, उशीर चालणार नाही.आम्ही ’हो’ म्हणालो आणि जेवायला बसलो.जेवणं आटोपली आणि माझ्या बाबांचा फोन आला, शिफ्टींगची चौकशी करून बाबांनी फोन ठेवला आणि काकू म्हणाल्या, ’तुझा फोनचा वार ठरला आता!’ मी ’बरं’ म्हणाले आणि आत निघून गेले.

सकाळपासून खुप दगदग झाली होती त्यामुळे आम्ही दोघी लवकर झोपी गेलो.

दुस-या दिवशी काकूंनी ६ वाजताच दार वाजवलं, मी कशीबशी उठले आणि दार उघडलं, काकूंनी गर्जना केली, उठुन दोघीपण आवरून घ्या कारण (५) माझ्या मुलाला पुन्हा त्याच्या वेळेला कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही! मी ’ठीके’ म्हणाले आणि माझ्या मैत्रिणीच्या बेडवर जाउन कोसळले. पुन्हा काकूंनी हाक मारली की, गरम पाणी काढून ठेवलं आहे,माझ्या डोळ्यासमोर एकदम लख्ख प्रकाश पडला आणि नियम क्र.७ आठवलं. त्यानंतर आम्ही दोघींनी पटापट आवरलं आणि घरातून पळ काढला.

१ ला आठवडा असाच सगळ्या सुचना आणि नियम समजावून घेण्यात गेला.रविवारचा दिवस जवळ आला :-) रात्री झोपतानाच मी देवाला प्रार्थना केली, ’देवा, प्लीज उद्या तरी काकूंनी ६ वाजता नको उठवायला!’ आणि आमचं नशीब थोडंस चांगलं निघालं. काकूंनी आम्हांला ६ ऎवजी ७.३० ला उठवलं आणि नेहमीची गर्जना केली, आवरून घ्या!

मग मी उठले, आता रविवारचा दिवस म्हणजे आठवडयाचे कपडे धुणे कार्यक्रम असणारच ना म्हणून मी २,४ कपडे घेउन जात होते आणि काकू म्हणाल्या, ’(६) रविवारी दुपारी जेवण झाल्यावर कपडे धुवायचे!’ मी त्याच पावली परत रूममधे गेले आणि कपडे दिले फेकुन! बेडवर फतकल मांडलं तशी माझी रूमी म्हणाली, ’क्या हुआ?’ मी काय डोंबल सांगणार तिला, मला तर त्या क्षणी तिथून पळून जायची इच्छा झाली होती. काय हे (सा)रख्या (सू)चना, (सा)रख्या (सू)चना! आणि मी त्या सगळ्या ऎकतीये हेही एक नवल! माझा संडेचा सगळा मूडच गेला होता!

ह्या सगळ्या सूचनांच्या राज्यात एक महिना कसाबसा पार पडला. लकीली कॉलेजमधे सगळं सुरळीत होतं त्यामुळे मी दुपारी तरी बिझी झाले.काही दिवसातच आमची परिक्षा आली.रोज रात्री आम्ही दोघी १२-१ वाजेपर्यंत अभ्यास करत होतो.परिक्षा पार पडली आणि त्याच दिवशी संध्याकाळी काकूंनी आम्हांला दोघींना सांगितलं की, रात्री उशीरापर्यंत जागून अभ्यास करण्यापेक्षा दिवसा सगळा अभ्यास करून ठेवत जा. मला आधी काही कळालच नाही त्या असं का म्हणत आहे ते, माझी रूमी म्हणाली की, ’मुझे रातको पढनेकी ही आदत है तो, थोडी देर तो मै पढूंगी.’ काकू एकदम रागावल्याच, म्हणाल्या ’आदत-वादत कुछ नही होता, यहां रेहना है तो मेरा सुनना ही पडेगा!’ मग आम्ही काय बोलणार, मुकाटयाने आत निघून गेलो!

थोडया वेळाने माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि नियम क्र.५ आठवला, अच्छा तर विजबील वाढेल म्हणून आम्ही रात्री अभ्यास नाही करायचा का! मग मी ठरवलं की पुढच्या वेळेस ह्यांचा लाईटच नाही वापरायचा अभ्यास करायला, मग बघू काय म्हणतात ते!

क्रमश:



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


No comments:

Post a Comment