सुट्टीनंतर खरं तर कॉलेजला परत येण्याची उत्सुकता खुप जास्त होती पण, पुन्हा काकूंकडेच राहावा लागणार ह्या विचाराने उत्साह सगळा मावळला पण पर्याय नव्हता सो वी बोथ केम बॅक टू द जेल.
घरी आलो तसं अगदी वेगळंच चित्र दिसलं, घरात कसली तरी तयारी सुरू होती.मी भितभितच (हो, दिवाळीची सुट्टी झाली म्हणून काकूंचा राग शांत झाला असेल असा गैरसमज मला करून घ्यायचा नव्हता.) काकूंना विचारलं की तयारी कसली सुरू आहे? तशा त्या अगदी हसून(?? काकूंना हसता सुद्धा येतं? :-) ) म्हणाल्या की, ’अगं, प्रद्दुम्न (बायदवे, हे काकूंच्या मुलाचं नाव) ला नविन जॉब मिळाला आहे आणि तो बाहेरगावी जाणार आहे म्हणून त्याची सगळी तयारी करून देतीये.पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर जाणार आहे अगं, मला तर इतकी काळजी वाटतीये ना!’. मी वरकरणी थोडंसं स्मित करत म्हटलं,’काळजी वाटणं साहजिक आहे पण, तुम्ही टेन्शन घेउ नका, तो जिथे जातोय तिथे आपल्यासारखं एखादं घर बघून पेईंग गेस्ट म्हणून राहायचं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही येणार!’ आणि मनात म्हटलं
’काकू काळजी कशाला करताय, तो तर सुटला तुमच्या तावडीतून, अगदी उडया मारीत जाईल तो, आमचंच नशीब ग्रेट आहे जे अजुन ५ महिने इथे काढावॆ लागणार आहेत!’
घरी ही लगीनघाई सुरू होती आणि आमच्या कॉलेजमधे गॅदरिंगचे वारे वाहू लागले.काकू बिझी असल्यामुळे आम्ही बिनधास्तपणे गॅदरिंगच्या तयारीला लागलो.कॉलेजमधे फुल मस्ती करून घरी येउन अगदी सुखात झोपू लागलो.
फायनली प्रद्दुम्नच्या जाण्याचा दिवस उगवला,आम्हांला सगळ्यांना बाय करून तो निघून गेला आणि काकू इकडे जोरजोरात रडायला लागल्या अगदी लहान मुलासारख्या, मी आणि रूमी चाटच पडलो, हे काय होतंय?? काकू रडत आहेत? आमच्यासाठी नविनच शोध होता तो! आता आपण काही करायचं असतं का असं आम्ही एकमेकींकडे बघितलं आणि आत निघून गेलो..थोडया वेळाने काकू शांत झाल्या..तो दिवस पूर्ण त्या गप्पच होत्या..जेंव्हा रात्री त्यांच्या मुलाचा फोन आला तेंव्हाच त्यांची कळी खुलली आणि त्या नॉर्मल झाल्या :-)
मी, माझ्या दोन मोठया बहिणी आम्ही सगळ्याजणी शिक्षणानिमित्त घराबाहेर पडलो होतो, आईला मी नेहमी भरलेल्या डोळ्याने निरोप देतांना बघितलं होतं पण, आम्ही घराबाहेर पडल्यावर तिची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना आज मला काकूंना बघून आली, खरंच आईचा जीव तिच्या पिलांमधेच असतो..
आमच्या गॅदरिंगचा दिवस जवळ आला, आम्हां सगळ्या मुलींना साडी घालायची होती. आम्हां दोघींकडे पण साडया नव्हत्या मग आम्ही काकूंना रिक्वेस्ट केली, त्या अगदी आनंदून गेल्या,त्यांनी सगळा खजिनाच आमच्या समोर खुला केला :-) मला तर कोणती साडी घालावी काही कळत नव्हतं मग काकूंनीच मला एक साडी सलेक्ट करून दिली आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी आमच्या मापाच्या वगैरे पण करून दिल्या.त्या इतक्या खुश दिसत होत्या ना, अगदी स्वत:च्या मुलींना तयार केल्यासारखं त्यांनी आम्हांला तयार करून दिलं.दागिने पण घालायला दिले पण आम्ही दोघींनी उगाच रिस्क नको म्हणून तो आग्रह टाळला. घरून अगदी पहिल्यांदाच आम्ही इतक्या खुश होउन बाहेर पडत होतो :-) पण....
तो दिवस खुप म्हणजे खुप धावपळीचा निघाला, सगळे कामं करत, साडी सांभाळून धिंगाणा करत अगदी दमून-थकून आम्ही दोघी रात्री ११ वाजता घरी आलो.दिवसभराच्या गोंधळात आम्ही सपशेल विसरलो होतो की घरी जायची डेडलाइन क्रॉस होतीये, बरं, हे तरी लक्षात यावं ना की उशीर होणार हे काकूंना कळवावं पण त्या दिवशी आमचे ग्रह फिरलेच होते त्यामुळे आता काय होणार हा विचार करतच आम्ही दार वाजवलं.पहिल्यांदा कोणीच दार नाही उघडलं, आम्ही पुन्हा नॉक केलं, काकूंना हाक मारली पण नो रिप्लाय! आता थोडं टेन्शन यायला लागलं, एकतर दिवसभर काही धड खाल्लं नव्हतं त्यामुळे सडकून भूक लागली होती त्यातच साडी घातलेली त्यामुळे पण इरीटेट होत होतं, बरं तेंव्हा दोघींकडे मोबाईल पण नव्हते कोणा दुस-या मैत्रीणिला विचारून तिच्याकडॆ जावं म्हटलं तर, आता काय करायचं? पुन्हा एकदा हिय्या केला आणि जोरात दार वाजवलं, मग लगेच दार उघडल्या गेलं, आत गेलो तर काकू झोपेची तयारी करून बसल्या होत्या,मला तर त्यांच्याकडे बघायचीपण भिती वाटत होती.पण, काय करणार चूक आमची होती त्यामुळे आता घाबरून उपयोग नव्हता मग काय मी सॉरी म्हणायला सुरूवात करणार इतक्यात काकूंनी ब-याच दिवसांपासून दाबून ठेवलेला राग बाहेर काढला, एक एक वाकबाण आम्हांला घायाळ करत होते.
- ’उशीर का झाला?’
मी - ’सॉरी काकू, आज गॅदरिंग होतं त्यामुळे लक्षातच नाही राहिलं की उशीर होइल म्हणून :-( ’
- ’मग, घरी यायचं बरं लक्षात राहिलं!’
मी - ’....’ फक्त मान खाली!
- ’सुरूवातीलाच सांगितलं होतं, उशीर झालेला चालणार नाही, तसं असल्यास बाहेत व्यवस्था लाउन घ्यायची, विसरलात का??’-काकू ओरडल्या!
आम्ही ह्यावर काय बोलणार...
- ’पुढच्या वेळेस दार अजिबात उघडलं जाणार नाही,लक्षात ठेवा! आणि हो, त्या साडया धूवून, नीट इस्त्री करून आणून ठेवा!!’
आतून इतका राग येत होता आणि रडूपण येत होतं, एकतर भूक लागली होती आणि वरतून हे थर्ड डिग्री टॉर्चर सुरू होतं, पण आमचे फक्त हातच दगडाखाली नव्हते तर आम्ही पूर्णच एका खडकाखाली सापडलो होतो त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऎकण्याशिवाय पर्याय नव्हता.मग काय,आत निघून गेलो,आवरलं आणि लगेच झोपायची तयारी केली. पोटभर बोलणे खाल्ल्यावर भूक तशीही मेलीच होती आणि काकूंनी सुध्दा जेवायला हाक मारली नाही.
विचार आला, आजची सकाळ किती छान उगवली होती, कुठेही असं वाटत नव्हतं की दिवसाचा शेवट असा निघेल! त्या दिवशी मला कळालं की ह्या जगात कितीही छोटी अथवा मोठी चूक असू देत त्याची शिक्षा तुम्हांला मिळतेच, यू कॅन नॉट एस्केप फ्रॉम इट!
क्रमश:
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment