आज दर्श ठाणवयी अमावस्या.
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते.पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.
आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं.मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून,गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे.गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून 'दिव्याची कहाणी' वाचून ह्या पूजेची सांगता होत असे.ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा.हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत.
अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment