’अरे वा :-) आज मोबाईलचा गजर इतका गोड आवाजात कसा काय गातो आहे?’ असं म्हणून डोळे किलकिले करत मोबाईल हातात घेतला तर तो तर अगदी निपचित पडलेला होता आणि रोजची गजराची वेळ तर अजुन झालीच नव्हती मग तो गोड आवाज येतोय कुठुन ह्या कुतुहलाने मी इकडे तिकडे बघितलं तर खिडकीसमोरच तारेवर बसलेले हे महाशय दिसले
रेड व्हेन्टेड बुलबुल
इतक्या सुमधुर आवाजात तो गात होता की मी बेडवरून अगदी टुनकन उठुन खिडकीत आले अन बघत उभी राहिले, त्याची समाधी लागलीये हे बघून मी पटकन कॅमेरा काढला आणि त्याचं छायाचित्र टिपून घेतलं. थोडयावेळाने त्याचा साथीदार आला अन दोघे उडून गेले तशी मी आत वळले.आज रोजच्या पेक्षा खुपच लवकर मी जागी झाले होते, घडयाळ बघितलं आणि वाटलं अजुन वेळ आहे तर एक डुलकी काढावी पण पुन्हा वाटलं नकोच, आज इतकी छान सुरूवात झाली आहे दिवसाची तर आता पटापट आवरावं आणि एखादी प्रभातफेरी मारावी. मग काय,मी लगेचच सगळं आवरून बाहेर पडले.
पाय-या उतरून खाली आले तसं हवेत सुखद गारवा जाणवला अन अगदी प्रसन्न वाटलं पुढे गेटमधून बाहेर पडले तर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे आमच्या अपार्टमेंटच्या तिथे असलेलं दुकान उघडलेलं होतं (पुण्य़ात इतक्या लवकर दुकान उघडू शकतं?, असो ) दुधाची गाडी उभी होती आणि १-२ गि-हाईकं काही-बाही घेत होती.त्या गाडीला वळसा घालून मी पुढे मुख्य रस्त्यावर आले अन समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाले!! आजपर्यंत मी ह्या बाजूचा रस्ता कधी बघितलाच नव्हता!! पूर्ण रस्ता अगदी हिरव्याकंच झाडांनी बहरलेला
मी तशाच विस्फारलेल्या डोळ्यांनी ते सौंदर्य न्याहाळत पुढे निघाले.
चौकात आल्यावर उजवीकडे बघितलं तिथेसुध्दा हिरव्या सुंदर झाडांची रांग दिसली अन आश्चर्य करत मी स्वतःला झापलं की इतके दिवस झाले आपण इथे राहतोय पण आतापर्यंत एकदाही आपल्याला ह्या सृष्टीसौंदर्याची पुसटशी कल्पनापण नाही आली,श्या!
पुढे मी वॉक करायला सुरूवात केली तसं लक्षात आलं की रस्त्यावर अगदीच तुरळक गाडया धावत होत्या आणि बहुसंख्य जनता मॉर्निंग वॉक करत होती, मला जरा बरं वाटलं म्हटलं चला आज आपण पण ह्यांच्यासोबत सामील व्हावं.
मी एक-एक गोष्ट न्याहाळत पुढे जात होते, थोडयाच अंतरावर एक बस स्टॉप दिसला तिथे तिन-चार आजी मस्त हसत-खेळत गप्पा मारतांना दिसल्या.त्यांचा उत्साह बघून त्यांना आजी म्हणणं खरंतर चुकीचं आहे,असो.पुढे एक मुलगा त्याच्या क्युट डॉगीला फिरवायला म्हणून घराबाहेर पडला अन त्या डॉगीने जे धूम ठोकली की कोण कोणाला जॉगिंग करवतय हे कळेचना. हे दृश्य बघत असतांनाच मला अचानक विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला कानोसा घेत मी इकडे-तिकडे शोधलं तर दिसलं रस्त्याच्या डाव्या हाताला एका गल्लीत एका बागेमधे काही मंडळी हात वर करकरून चित्रविचित्र पध्दतीने हसत होती,तो हास्यक्लब होता. :-D
ह्या रस्त्यावर मारोतीचं आणि गणपतीचं मंदीरही मला दिसलं म्हणजे लक्षात आलं कारण बरीच मंडळी जाता-येता एक क्षण तिकडे बघून हात जोडत काहीतरी पुटपुटत जातांना दिसली.
रस्त्यावर प्रभातफेरी करणारी बहुसंख्य जनता ही साधारण चाळीशी किंवा त्यापेक्षा वयाने मोठी वाटत होती.बरेच आजोबा त्यांच्या ग्रुपसोबत मस्त चर्चा झोडत होते तर काहीजण तिथल्याच बाकावर हातात देवाचं छोटं पुस्तक घेऊन वाचत बसले होते.एक आजोबा मात्र अगदी सुरा-तालात गाणं म्हणत होते, अगदी तल्लीन होऊन ते स्वतःच स्वत:चं गाणं एंजॉय करत होते.त्यांच्या चेह-यावरचे हावभाव बघून मला इतकं मस्त वाटलं,विचार आला असं असायला हवं माणसाने,आजूबाजूला कोणी बघतंय, हसतंय वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा आपल्या धुंदीतच मस्त जगायचं :-)
थोडया वेळाने काही माझ्यासारखे यंगस्टर्सपण धावतांना दिसले पण ते बिचारे ऑफिसची बॅग सांभाळत बस पकडण्यासाठी धावत होते. मला फार बरं वाटलं माझं ऑफिस दुपारचं आहे म्हणून :-)
जशी माणसं मजेदार दिसत होती तशीच रस्त्यालगत असलेली घ्ररंपण अगदी वेगळेपण जपणारी दिसली.एक-दोन अपार्टमेंटस सोडले तर बाकी जवळपास सगळे बंगलेच आहेत प्रत्येकाला अगदी छान अर्थपूर्ण नाव असलेले.प्रत्येकाच्या बंगल्यात छोटी बाग दिसली त्यात मोगरा,चाफा,कन्हेर,बकुळ अशी विविध फुलझाडं तसंच कोणाकोणाकडे आंब्याचं किंवा अशोकाचं झाड दिसलं.गेटपासून ते दारावर लावलेल्या गणपतीच्या मुर्तीपर्यंत, घराच्या रंगापासून ते बागेत ठेवलेल्या शोभेच्या वस्तूंपर्यंत सगळंच प्रत्येकाच्या बंगल्यात युनिक दिसत होतं.पुण्यातलं पब्लिक सगळ्या बाबतीत चोखंदळ आहे ह्यात काही वाद नाही.
ह्या रस्त्याच्या शेवटी एक मोठी टेकडी आहे, बरीच मंडळी तिकडेही फिरायला जातांना दिसली मग मी पण तिकडे वळले.पहिल्याच क्षणी मला एका घरात खुप मोठठं आंब्याचं झाड दिसलं मस्त कै-यांनी लगडलेलं बघताक्षणी तोंडाला पाणीच सुटलं.
त्या झाडाकडे बघतांना माझा अचानक धक्का कोणाला तरी लागला, बघितलं तर एक आजी हातात काठी घेऊन तरातरा समोर जातांना दिसल्या,निरखून बघितलं तर त्या चाफ्याच्या झाडाची फुलं घ्यायला धावतांना दिसल्या ;-)
त्यांच्यासारखीच अजुन एक-दोन लोकं हातात पिशव्या घेऊन कंपाऊंड मधून बाहेर डोकावणा-या प्राजक्त, तगर ह्या झाडांची फुलं तोडतांना दिसली, मॉर्निंग वॉकचा हाही एक उपयोग ;-)
असो, पुढे मी टेकडीच्या पायथ्याशी आले तसे मला बरेच लोक आपापल्या कुत्र्यांना फिरवायला आलेले दिसले आणि त्या गर्दीमधेच एक छोटा मुलगा मस्त झुपझुप स्केटींग करतांना दिसला,इतकं वेगवेगळं बघायला मिळत होतं प्रत्येक वळणावर मला तर आश्चर्यच वाटत होतं :-)
ह्याच विचारांमधे मी टेकडी चढायला सुरूवात केली,तिथेपण जागोजागी लोक व्यायाम करतांना,योगासनं करतांना दिसत होती. मी थोडंच अंतर चढून गेले असेन पण मला धाप लागायला लागली :-( माझ्यापेक्षा वयाने मोठी मंडळी पण भराभर टेकडी चढत होती न मी धापा टाकत होते. मी आत्ता ह्याच वयात 'आयटी' च्या कृपेमुळे म्हातारी झाले होते! माझे खाडकन डोळे उघडले मी त्याच क्षणी मनाशी पक्क ठरवलं, आता नियमीतपणे व्यायाम करायचा,आळस अजिबात करायचा नाही!! त्या विचाराने मला थोडं बळ आलं आणि मी नेटाने चढायचा प्रयत्न करू लागले.
टेकडीवर जास्त हिरवी झाडं नाहीत पण जी तुरळक झाडी आहेत त्यावर मात्र विविध पक्षी अगदी आनंदात नव्या दिवसाचं गाण गात होती.मधेच कुठे साळुंक्यांचा आवाज येत होता तर कुठे पारव्याचा.मधेच एखादा कोकीळ पावसाची चाहूल लागलीये हे सांगत होता तर मधेच काही चिमण्या चिवचिवत होत्या :-) सगळं वातावरण त्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने अगदी प्रसन्न झालं होतं.
हे बॅकग्राउंड म्युझिक एंजॉय करत मी एकदाची टेकडीवर पोहोचले! तिथे एका सपाट जागेवर काही आजोबा लोक काम करतांना दिसले,पुढे जाऊन बघितलं तर ते लोक तिथे असणा-या झाडांना पाणी घालत होते.तसंच अजुन काही आजोबा मारोतीच्या मुर्तीसमोर उभे राहून आरती करत होते.आजूबाजूला बरेचसे दगड लावून त्यांनी ती जागा अगदी छान सुशोभित केली होती.
त्या टेकडीवरून जवळपास अर्ध्या पुण्याचं दर्शन होतं.तसंच ही टेकडी अगदी दूरपर्यंत पसरलेली आहे.टेकडीच्या मागे चांदणीचौक आहे आणि समोर आर्मीलँड.टेकडीवर मी एक फेरफटका मारून खाली जायला सुरूवात केली.सकाळी येतांना जितकी दमछाक झालेली त्यामानाने खाली यायला काहीच वेळ लागला नाही पण आता सूर्य व्यवस्थित वर आलेला होता आणि ऊन चमकत होतं.खाली येतांना अजुन एक गम्मत बघायला मिळाली :) वरती आकाशातून सुखोई विमान जातांना दिसलं :-D :-D वो देखके मेरा दिल तो एकदम गार्डन गार्डन हो गया :-) लहानपणी विमान दिसलं की ते दिसेपर्यंत त्याच्याकडे एकटक बघायची न शक्य असेल तर त्याच्यासोबत धावायची सवय होती मला आणि आत्ता सुखोई बघून मी तेच केलं मी धावत सुटले अगदी ते नजरेआड होईपर्यंत.
थोडयावेळाने माझा वेडेपणा लक्षात आल्यावर मी इकडे-तिकडे बघितलं पण कोणाचच लक्ष नव्हतं माझ्याकडे मग काय मी अगदी काही झालंच नाही ह्या आविर्भावात पुन्हा चालायला लागले :-)
चालतांना समोर दोन काकू विरूध्द दिशेने चालतांना दिसल्या.मला गंमत वाटली,विचार आला इथे लोकांना धड सरळ चालता येत नाही हल्ली रस्त्यावरून आणि ह्या दोघी रोडवर उतारावरून इतक्या सहजतेने उलट कसं काय चालत आहेत? गंमतच वाटली मला :-D
अशाच गमती-जमती बघत मी घरी परतले. खुपच सुखद अनुभव होता प्रसन्न सकाळच्या ह्या प्रभातफेरीचा :-)
मी तर आता रोज असंच सकाळी फिरायला जाणार आहे, वूड यू लाईक टू जॉईन?
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
खुप छान ,, आणि चांगली सवय आहे सकाळी फ़िरण्याची...
ReplyDelete{मी तर आता रोज असंच सकाळी फिरायला जाणार आहे, वूड यू लाईक टू जॉईन?}
हो नक्किच ,,
मी सकाळी कोल्हापूरहून सातारा पर्यंत येतो फ़िरायला उद्यापासून पुण्याला येईन ओके ??????????????????
हो नक्की ये पण फक्त वेळेत पोहोच,मला लेट लतीफ आवडत नाही ;-)
Delete