Wednesday, December 26, 2012

चंद्र...



किती छान वाटतं ना चंद्राकडे बघितलं की..

खाली इतक्या गाडया धावत आहेत, माणसं इकडून-तिकडे जात आहेत पण त्यातल्या किती लोकांना माहित आहे की आज आकाशामधे चंद्र इतका सुंदर दिसतोय ते,तुझ्या-माझ्यासारखा क्वचित एखादाच असेल..त्या चंद्राला पण खालून धावणा-या यंत्र आणि यंत्रवत झालेल्या माणसांशी काही घेणं-देणं नाहीये! तो त्याच्या त्याच्या आनंदात रोज उमलतो पाकळी-पाकळीने अन एका दिवशी असं पूर्णरूप धारण करतो...

तुम्ही त्याच्या रूपाचं कौतुक करावं अशी त्याची अपेक्षा नाहीये की तुम्ही त्याला बघितलंच नाही आज म्हणून त्याची तक्रार नाहीये..तो स्वत:च्याच धुंदीत आपल्या सख्या-तारकांसहित नभोमंडलात प्रवेश करतो, रात्रभर आकाशाच्या अंगणात रासक्रिडा करत पहाटे सगळ्यांना घेऊन लुप्त होतो..

पुन्हा दुस-या दिवशी संध्याकाळी दुधाळ-मधाळ चंद्रप्रकाश पसरविण्याकरता तो हजर असतो अगदी कसलीच अपेक्षा न-करता...निसर्ग किती निरिच्छ-निरपेक्षपणे आपल्यावर प्रेमाची पखरण करत असतो ह्याचं अगदी नेमकं उदाहरण म्हणजे हा चंद्र..छोटयांचा चांदोमामा, भाऊबिजेच्या दिवशी दूरदेशी असणा-या भावाचा प्रतिनिधी अन प्रेमात धुंद असणा-याचा प्रियकर...

Friday, December 21, 2012

कशाला उगाच..जाऊ देत!


सदर लेखामधे सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, ह्यामधून कोणत्याही एका व्यक्तीला किंवा समुहाला दुखावण्याचा हेतू नाही.


भारताच्या राजधानीत बसमधे झालेला गँगरेप, दादरला गर्दीच्या रस्त्यावर कोयत्याने केलेले क्रूर वार, दिवसाढवळ्या घरामधे घुसून अंगावर जंतूनाशक टाकून पेटवून देणं, दिवसागणिक असंख्य अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार आणि बाहेरच्या दुनियेबरोबरच घरामधे देखील वाढत जाणारी असुरक्षितता! रोजची वर्तमानपत्रं, टीव्हीवाले ह्या आणि अशाच प्रकारच्या बातम्या सगळीकडे सांगत एकच प्रश्न विचारत आहेत आपली मुलगी, बायको, वहिनी आणि कोणतीही ’स्त्री’ आज आपल्या देशातल्या कोणत्याच घरात, मोहल्ल्यात, शहरात ’सुरक्षित’ का नाहीये??!!

गर्दीची जागा असू देत नाहीतर शांत-सामसूम रस्ता, पहाट-दिवस-संध्याकाळ असू देत नाहीतर रात्र, एकटयाने बाहेर पडलेली स्त्री असू देत नाहीतर कोणासोबत असू देत..कोणत्याही परिस्थितीमधे तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकी भयानक वेळ आता आली आहे.

किती आणि कशाप्रकारे स्त्रीने स्वत:चं रक्षण करायचं? मिरची-पूड ठेवली, कराटेचं प्रशिक्षण घेतलं, अगदी शरीराचा एकही भाग दिसणार नाही असे कपडे केले, सर्वतोपरी काळजी घेतली तरीही तिच्यावरचे हल्ले कमी झाले नाहीत. बाहेर जाणं बंद केलं तर घरातल्यांनी सुध्दा मोकळा श्वास घेऊ दिला नाही. जगायचं तरी कसं तिने!

ही झाली नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजू काय म्हणते तर ’मुलगी वाचवा’!
तुम्ही बघितलं / ऐकलं असेल गेल्या काही महिन्यांपासून ’लेक / मुलगी वाचवा, तिला ह्या जगात येऊ द्या’ म्हणून सगळीकडे जोरदार शेरेबाजीवजा प्रयत्न सुरू आहेत म्हणजे टीव्हीवर, वेगवेगळ्या प्रभागाच्या नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर वगैरे दिसून येत आहे. सुरूवातीला आमिर खानच्या सत्यमेव जयतेचा परिणाम म्हणून लिंगनिदान करून गर्भपात करवून देणा-या भरपूर दवाखान्यांवर छापे घातले गेले, डॉक्टर्सवर कार्यवाही केली गेली वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांमधे थोडी जागरूकता आली पण खरंच कितपत मुली जन्म घेऊ शकल्या देवालाचा ठाऊक!

खरं तर कशाला जन्माला घालायचं मुलींना सांगा पाहू! तिला जन्माला घालायचं, शिकवायचं, निसर्गाचक्रानुसार ती वयात आली की तिच्या होणा-या शारीरीक-मानसिक त्रासांवर जमेल तशी फुंकर घालत, घरातल्या-आजूबाजूच्यांच्या वखवखलेल्या नजरांपासून पदोपदी तिची जपणूक करत तिला वाढवायचं-मोठं करायचं आणि एक दिवस समाजरूढी म्हणून तिचं लग्न लाउन द्यायचं. तिचं जर नशीब चांगलं असेल तर तिच्या सासरकडची मंडळी चांगली असतील नाहीतर तिथे तिचा मानसिक-शारीरीक छळ सुरू होणार! लग्न होण्याआधी कितीही कर्तुत्ववान असणारी स्त्री सासरी गेल्यावर सगळं कर्तुत्व चुलीत घालून घरच्यांसाठी राबणार पण त्याचा मोबदला म्हणून तिला कौतुकाची थाप मिळेल की नाही ही शंकाच आहे. नवरा जर तिला समजावून घेऊन तिला मदत करणारा असेल तरच ती स्त्री आयुष्य ख-या अर्थाने जगू शकते नाहीतर तिची मानसिक कुचंबना सुरूच राहते अगदी मरेपर्यंत!

आश्चर्य हे आहे की आजही, अजुनही एखाद्या स्त्रीला तिच्या स्वत:च्या घरामधेच मान-सन्मान दिला जात नाही. आपला समाजही असाच आहे की ज्याने ’स्त्रीयांचं काय कौतुक करायचं, तेच तर त्यांचं काम आहे’ असं म्हणून पिढयानपिढया हा कित्ता गिरविला आहे आणि स्त्री-पुरूष हे समान आहेत हे सत्य जणू पुसून टाकलं आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे हेच पुरूषांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे, जात आहे. नैसर्गिकरित्या स्त्री आणि पुरूष दोघांनाही एकमेकांची तितकीच गरज आहे पण ही गोष्ट दुर्लक्षित करून फक्त पुरूषाला जेंव्हा गरज आहे तेंव्हा तो स्त्रीचा वापर करू शकतो हे समीकरण पक्क झालं आहे! तसं बघितलं तर पुरूष अगदी जन्म घेण्यासाठीसुध्दा स्त्रीवरच अवलंबून आहे पण एकदा ह्या जगात आल्यावर त्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो अन जिच्याशिवाय आपलं पानदेखील हलू शकत नाही अशा स्त्रीवरच कुरघोडी करत मर्दुमकी गाजवत राहतो.

पण मग स्त्रीने तिच्यावर होणा-या प्रत्येक अत्याचाराला वाचा फोडायला हवी पण दुर्दैव तिथेही तिचाच घात करतं कारण न्यायनिवाडा करणारी बहुसंख्य मंडळी हीसुध्दा पुरूषच असतात! ज्यांच्याकडे दाद मागायची तेच लोकं तिच्या अब्रूचे धिंडवडे काढायला बघतात. बलात्कार झालेल्या अर्ध्याअधिक तरूणी पोलिसामधे जाऊन तक्रार नोंदवत नाहीत कारण कोर्टात केस गेल्यावर तिच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगापेक्षा तो प्रसंग कथन करण्याच्या मरणयातना जास्त असतात. एखादीने नेटाने अशी केस लढवली तरी गुन्हेगाराला अगदी क्षुल्लक शिक्षा होते, तो शिक्षा भोगून पुन्हा एकदा निधडया छातीने समाजात वावरतो पण ती मुलगी मात्र समाजाच्या तिरस्कारीत नजरांनी आयुष्यभर घायाळ होत राहते.

म्हणूनच वाटतं, कशाला उगाच मुलगी जन्माला घालायची. ती म्हातारी मंडळी म्हणतात तेच बरोबर आहे, मुलगी होऊच द्यायची नाही म्हणजे पुढच्या गोष्टी आपोआपच टळतात!

जाऊ देत, लेट दिस वर्ल्ड बी ऑफ मेन ओन्ली...      

Monday, December 17, 2012

स्वच्छंदी



टेकडीवर मॉर्निंग वॉक करून झाल्यावर तिथेच असलेल्या एका ब-यापैकी मोठ्या दगडावर मी विसावले..पुण्यात आता थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी ब-यापैकी गारही होतं आज पण नुकतंच सूर्यनारायणाचं आगमन झाल्यामुळे कोवळं ऊन अगदी आल्हाददायक वाटत होतं. ह्या टेकडीचा अर्धा भाग वनविभागाकडे आणि अर्धा आर्मीकडे आहे अन त्या दोन्हीच्या मधे जी थोडी जागा आहे त्यात हा नॅचरल जॉगींग ट्रॅक बनला आहे.

मी दगडावर बसून उबदार उन्हाचा अन गार वा-याच्या झुळकेचा आनंद लुटत असतांना समोरच्या झाडावर एक छोटीशी काळ्या रंगाची चिमणी येउन बसली.काही क्षण तिने पंख फडफडवले अन ती लगेच दुस-या झाडावर कुठेतरी उंच जाऊन बसली.मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेतरी गुडूप झाली.

तितक्यात थोडया दूरवर असणा-या एका झाडावरून खूप सा-या साळुंक्यांच्या हसण्याचा आवाज आला, हो अहो, अगदी आपण १० माणसं हसल्यावर जसा अन जितका मोठा आवाज येईल तसाच आवाज होता तो! त्या किती साळुंक्या असतील म्हणून बघायला गेले तोवर त्यांची मैफल संपवून त्या कुठेतरी दुस-या झाडाकडे निघाल्या होत्या.

तिथेच खाली भारव्दाज पक्ष्याचं एक जोडपं खेळतांना दिसलं.त्यातला एक भारव्दाज उडया मारत मारत जमीनीवरून झाडावर जाऊन बसला ( ती कदाचित मादी असावी ) अन दुसरा भारव्दाज त्याच्या मागे मागे येत होता.मग पुन्हा झाडावरच्या भारव्दाजाने उडत दुस-या झाडाकडे कूच केली अन खाली असणारा भारव्दाज त्या झाडाकडे पळाला  ;-)

असंख्य पक्षी ह्या टेकडीवर खेळतांना-बागडतांना-मुक्तपणे विहार करतांना दिसतात.कधी-मधी एखाद्या कोप-यातून मोराचे सुध्दा आवाज येतात ह्या टेकडीवर  :-D पहाटे आलात तर त्यांचं दर्शन होऊ शकतं असं बरेच जण म्हणतात सुध्दा..

कित्ती छान लाईफ आहे नं ह्या सगळ्या पक्ष्यांचं! जेंव्हा हवं तेंव्हा, हवं तिथे ते पोहोचू शकतात.वेळेचं बंधन नाही की कुठे ऑफिसला लेटमार्क लागून हाफ डे वाया जाण्याचा प्रश्न नाही  :-D

पुन्हा कुठेही जायचं फक्त मनात आलं की पंख पसरायचे अन मोकळ्या आकाशात भरारी मारायची, वाव कित्ती मस्त ना :-) नाहीतर आपल्याला बस,रिक्षा-रिक्षावाल्यांच्या कटकटी,स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोलची होणारी सारखी दरवाढ ह्यामुळे रोजचा किंवा कधीतरी केलेला विशेष असा प्रवास शांतपणे करणंसुध्दा अवघड झालंय हल्ली :-(

पक्ष्यांसाठी ही पण एक चांगली गोष्ट आहे की त्यांना कपडे घालण्याचा त्रास नाही, नाहीतर आपलं बघा!
महिन्याचा अर्धा पगार तर वीकमधे ऑफिसला घालण्याचे, वीकांताला भटकायला लागणारे, लग्न-कार्य आलं. तर कुठे सण-समारंभ आले ह्यासाठी कपडे घेण्यातच जातो!!

अजुन एक अगदी महत्त्वाचं म्हणजे त्यांना लग्नाचं टेन्शन नसतं..जो आवडेल तो, जी मादी भाव देईल तिच्या/त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय करायचं..उगाच कांदे-पोहे प्रोग्रॅम करायची गरज नाही की विधीवत लग्न करायची..पुन्हा लव्ह मॅरेज / अरेन्ज मॅरेज केल्यावर भांडणं झाली तरी लगेच वेगळं होऊ शकतात अन पोर-टोरं असले तरी त्यांचे ते समर्थ असतात त्यामुळे एकुण काय तर नो टेन्शन अ‍ॅट ऑल्ल्ल्ल्ल  :-D !!

खाण्या-पिण्याचे चोचले नाही त्यामुळे जो काही दाणा-पाणी मिळेल त्यावर गुजराण करायची. सटर-फटर जंक फूड खाण्यामुळे होणा-या त्रासापासून आपोआपच सुटका :) बरं कधी कुठे लागलं-खुपलं,मोठा अ‍ॅक्सीडेंट झाला तरी निसर्गासारखा धन्वंतरी काळजी घ्यायला असल्यामुळे त्याचंपण टेन्शन नाही  :-P

आयुष्याचा कालावधी कमी किंवा प्रमाणात म्हणता येईल, असल्यामुळे म्हातारं जर्जर होऊन घरच्यांसाठी ओझं होण्याचा त्रास नाही!

कश्शा कशाचं म्हणून टेन्शन नाही ह्या पाखरांना..ना कुठे भावनिक गुंतागुंत ना कुठे पैसे कमी पडण्याचा त्रास फक्त निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदी जगायचं..मस्त मनात येईल तिथे बागडायचं,विहार करायचा..घरटं असेल तर घरट्यात नाही तर कुठेतरी झाडाच्या फांदीवर राहायचं..सकाळ झाली की चिवचिवाट करून जगाला जागं करत आकाशात भरारी घेत नव्या दिवसाचा आनंद लुटायचा..

देवा मलासुध्दा पुढच्या जन्मी असाच एखादा चिमणी किंवा खंडयासारखा पक्षी बनव प्लीज

जावेद अख्तरने एका गाण्यामधे म्हटलंय ना,'पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके | सरहद इन्सानों के लिए है...'

Sunday, December 9, 2012

हूssह..प्रेम!!



सुधीर गाडगीळ यांच्या ’मुद्रा’ पुस्तकातील ’मैत्र जीवाचे’ हा लेख वाचला अन शेवटच्या वाक्यावर विचार सुरू झाले..

ह्या लेखामधे गाडगीळ यांनी दिग्गज लोकांच्या जिवलग प्राण्यांबद्दलचे किस्से सांगितले आहेत आणि शेवटी नमूद केलं आहे की जितकं प्रेम ही मंडळी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर करतात तसं त्यांच्या आसपासच्या माणसांवर का करत नाहीत!

प्रेम..नितांत सुंदर अन सगळ्या नात्यांमधली एक प्रमुख भावना. नात्यांपरत्वे प्रेमाची रूपं निरनिराळी आहेत पण भावना एकच..त्या व्यक्तीबद्दल वाटणारा जिव्हाळा, काळजी, त्यासोबत आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी चवीनं जगणं, आशा-निराशेच्या काळात आधार देणं, समजून घेणं...ते तर एकमेकांवर प्रेम करणा-या व्यक्तींमधे असतं ना, पण तरीही लेखकाने असा प्रश्न का केला?  

नातं कुठलंही असू देत, प्रेम करणारी व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करत असते पण त्याबरोबरच असं प्रेम करणारी व्यक्ती तसंच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव ह्यांची अपेक्षा समोरच्या माणसाकडून ठेवते. तसं बघायला गेलं तर ह्यात वावगं काहीच नाहीये पण अशी अपेक्षा ठेवल्यावर जर समोरची व्यक्ती ती अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर कदाचित प्रेमाचा आवेग कमी होऊ शकतो..प्रेम ही सर्वोच्च भावना असली तरी अशावेळेस अपेक्षा वरचढ होते. समोरच्या व्यक्तीसाठी केलेली तगमग दुर्लक्षित केली जातीये ही भावना टोचायला लागते. जितका आदरभाव समोरच्या माणसाबद्दल असतो तो हळूहळू कमी होऊन कदाचित व्देषाची भावना जम धरू लागते. मग ह्यातूनच कधी टोकाची भूमिका घेऊन जोरजबरदस्तीने प्रेम मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो!
खरं तर ते असं मिळविणं हे प्रेम नसतं तर तो फक्त माझा पण तुझ्यावर हक्क आहे ह्याची जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. अशाने काही साध्य होत नाही उलट नात्यांमधे दुरावा निर्माण होतो, कधीतरी दुरावा इतका वाढतो की ती व्यक्ती एक माणूस म्हणून सुद्धा आपल्या मनातून उतरते!

पण ह्यामधे चूक कोणाची? प्रेम करणा-या व्यक्तीची की ते प्रेम समजून त्याची परतफेड न-करू शकणा-याची? कदाचित कोणाचीच नाही अन दोघांचीपण आहे. प्रेम करणा-या व्यक्तीची चूक ह्यामुळे की त्याने निरपेक्ष प्रेम केलं नाही..प्रेम केलं आहे तर तसंच प्रेम समोरच्या व्यक्तीकडून मिळेल ही अपेक्षा चुकीची आहे. जर अपेक्षा ठेवली नसती तर अपेक्षाभंग झाला नसता आणि त्रासही वाचला असता! पण, एखादाही माणूस अपेक्षांशिवाय जगू शकतो? तुम्ही समोरच्या माणसाची काळजी घेत आहात त्याला समजून घेऊन त्याला रूचेल, आवडेल असं वागायचा प्रयत्न करत आहात तर तसंच समोरची व्यक्ती का नाही वागू शकत? त्याने असं वागावं ही साधी अपेक्षा का नाही ठेवू शकत? ज्या माणसावर प्रेम केलं तो सुध्दा माझ्यासारखाच माणूस आहे त्यालापण भावना आहेत अन दुस-याच्या भावना त्याला कळत असूनही ती व्यक्ती तसं का नाही वागू शकत??

प्रेमाची परतफेड न-करू शकणा-या व्यक्तीची चूक कशी? तर,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, आपली काळजी करतंय, त्याच्यासोबत आपण आयुष्यामधे चार घटका चांगल्याप्रकारे अनुभवू शकतो ही सुंदर भावना जाणवत असून देखील ती व्यक्ती तसं नाही वागू शकत, का? कदाचित त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली असेल पण आपणही त्यात काहीतरी देणं लागतो ही जाणीवच नसेल किंवा त्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करता येत नसेल किंवा हे नातं त्याच्यावर अप्रत्यक्षपणे लादलं गेलं असेल किंवा सुरूवातीला जी अपेक्षा ह्या व्यक्तीने ठेवली तितकी समोरच्याने पूर्ण केली नाही अन ह्याच व्यक्तीचा अपेक्षाभंग झाला. नाहीतर असंही असू शकेल की भौतिक गरजांची पूर्तता करण्यापेक्षा मोठी असणारी भावनिक गरज पूर्ण करणं ही जबाबदारी त्या व्यक्तीला पेलवत नसेल!

कारणं खूप असू शकतात पण ह्यामुळे होतं असं की दोघांनाही प्रेम मिळत नाही..सुरूवातीला कदाचित वाद अन नंतर मना-मनामधे पडलेलं कायमचं अंतर!

श्या..विचारांचा नुसता गोंधळ आहे हा!! अखेरला वाटतं प्रेम वगैरे काही नाहीये फक्त माणूस दुस-याकडून अपेक्षा करत राहतो त्याने किंवा तिने कसं वागावं ह्याची, त्यात तो कुठेतरी हे मात्र विसरतो की जशा त्याच्या दुस-याकडून अपेक्षा आहेत तशा दुस-यांच्यासुध्दा त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत!!

आणि मला उत्तर सापडलं गाडगीळांच्या प्रश्नाचं!

पाळीव प्राणी तुमच्यावर खरंखुरं प्रेम करतात, अगदी निरपेक्ष! तुम्ही सकाळी घराबाहेर पडतांना त्याला घरात बंद करून जा पण संध्याकाळी तो तुमच्या जवळ येईलच. कधी तुम्ही त्याला बाहेर फिरायला नेलं नाहीतर ते तुमच्यावर नाराज होऊन खेळणं बंद नाही करणार उलट तुमचा थकवा घालवण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही त्याला कधी झिडकारलत तरी ते तुम्हांला कधी सोडून नाही जाणार, कधीच तुम्हांला एकटं असल्याचं जाणवू नाही देणार. तुमच्याकडून कसलीच अपेक्षा न-ठेवता तुमच्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करत राहणार. कदाचित ह्यामुळेच माणूस, माणसापेक्षा एखाद्या प्राण्यावर जास्त प्रेम करू शकतो..