टेकडीवर मॉर्निंग वॉक करून झाल्यावर तिथेच असलेल्या एका ब-यापैकी मोठ्या दगडावर मी विसावले..पुण्यात आता थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी ब-यापैकी गारही होतं आज पण नुकतंच सूर्यनारायणाचं आगमन झाल्यामुळे कोवळं ऊन अगदी आल्हाददायक वाटत होतं. ह्या टेकडीचा अर्धा भाग वनविभागाकडे आणि अर्धा आर्मीकडे आहे अन त्या दोन्हीच्या मधे जी थोडी जागा आहे त्यात हा नॅचरल जॉगींग ट्रॅक बनला आहे.
मी दगडावर बसून उबदार उन्हाचा अन गार वा-याच्या झुळकेचा आनंद लुटत असतांना समोरच्या झाडावर एक छोटीशी काळ्या रंगाची चिमणी येउन बसली.काही क्षण तिने पंख फडफडवले अन ती लगेच दुस-या झाडावर कुठेतरी उंच जाऊन बसली.मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेतरी गुडूप झाली.
तितक्यात थोडया दूरवर असणा-या एका झाडावरून खूप सा-या साळुंक्यांच्या हसण्याचा आवाज आला, हो अहो, अगदी आपण १० माणसं हसल्यावर जसा अन जितका मोठा आवाज येईल तसाच आवाज होता तो! त्या किती साळुंक्या असतील म्हणून बघायला गेले तोवर त्यांची मैफल संपवून त्या कुठेतरी दुस-या झाडाकडे निघाल्या होत्या.
तिथेच खाली भारव्दाज पक्ष्याचं एक जोडपं खेळतांना दिसलं.त्यातला एक भारव्दाज उडया मारत मारत जमीनीवरून झाडावर जाऊन बसला ( ती कदाचित मादी असावी ) अन दुसरा भारव्दाज त्याच्या मागे मागे येत होता.मग पुन्हा झाडावरच्या भारव्दाजाने उडत दुस-या झाडाकडे कूच केली अन खाली असणारा भारव्दाज त्या झाडाकडे पळाला ;-)
असंख्य पक्षी ह्या टेकडीवर खेळतांना-बागडतांना-मुक्तपणे विहार करतांना दिसतात.कधी-मधी एखाद्या कोप-यातून मोराचे सुध्दा आवाज येतात ह्या टेकडीवर :-D पहाटे आलात तर त्यांचं दर्शन होऊ शकतं असं बरेच जण म्हणतात सुध्दा..
कित्ती छान लाईफ आहे नं ह्या सगळ्या पक्ष्यांचं! जेंव्हा हवं तेंव्हा, हवं तिथे ते पोहोचू शकतात.वेळेचं बंधन नाही की कुठे ऑफिसला लेटमार्क लागून हाफ डे वाया जाण्याचा प्रश्न नाही :-D
पुन्हा कुठेही जायचं फक्त मनात आलं की पंख पसरायचे अन मोकळ्या आकाशात भरारी मारायची, वाव कित्ती मस्त ना :-) नाहीतर आपल्याला बस,रिक्षा-रिक्षावाल्यांच्या कटकटी,स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोलची होणारी सारखी दरवाढ ह्यामुळे रोजचा किंवा कधीतरी केलेला विशेष असा प्रवास शांतपणे करणंसुध्दा अवघड झालंय हल्ली :-(
पक्ष्यांसाठी ही पण एक चांगली गोष्ट आहे की त्यांना कपडे घालण्याचा त्रास नाही, नाहीतर आपलं बघा!
महिन्याचा अर्धा पगार तर वीकमधे ऑफिसला घालण्याचे, वीकांताला भटकायला लागणारे, लग्न-कार्य आलं. तर कुठे सण-समारंभ आले ह्यासाठी कपडे घेण्यातच जातो!!
अजुन एक अगदी महत्त्वाचं म्हणजे त्यांना लग्नाचं टेन्शन नसतं..जो आवडेल तो, जी मादी भाव देईल तिच्या/त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय करायचं..उगाच कांदे-पोहे प्रोग्रॅम करायची गरज नाही की विधीवत लग्न करायची..पुन्हा लव्ह मॅरेज / अरेन्ज मॅरेज केल्यावर भांडणं झाली तरी लगेच वेगळं होऊ शकतात अन पोर-टोरं असले तरी त्यांचे ते समर्थ असतात त्यामुळे एकुण काय तर नो टेन्शन अॅट ऑल्ल्ल्ल्ल :-D !!
खाण्या-पिण्याचे चोचले नाही त्यामुळे जो काही दाणा-पाणी मिळेल त्यावर गुजराण करायची. सटर-फटर जंक फूड खाण्यामुळे होणा-या त्रासापासून आपोआपच सुटका :) बरं कधी कुठे लागलं-खुपलं,मोठा अॅक्सीडेंट झाला तरी निसर्गासारखा धन्वंतरी काळजी घ्यायला असल्यामुळे त्याचंपण टेन्शन नाही :-P
आयुष्याचा कालावधी कमी किंवा प्रमाणात म्हणता येईल, असल्यामुळे म्हातारं जर्जर होऊन घरच्यांसाठी ओझं होण्याचा त्रास नाही!
कश्शा कशाचं म्हणून टेन्शन नाही ह्या पाखरांना..ना कुठे भावनिक गुंतागुंत ना कुठे पैसे कमी पडण्याचा त्रास फक्त निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदी जगायचं..मस्त मनात येईल तिथे बागडायचं,विहार करायचा..घरटं असेल तर घरट्यात नाही तर कुठेतरी झाडाच्या फांदीवर राहायचं..सकाळ झाली की चिवचिवाट करून जगाला जागं करत आकाशात भरारी घेत नव्या दिवसाचा आनंद लुटायचा..
देवा मलासुध्दा पुढच्या जन्मी असाच एखादा चिमणी किंवा खंडयासारखा पक्षी बनव प्लीज
जावेद अख्तरने एका गाण्यामधे म्हटलंय ना,'पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके | सरहद इन्सानों के लिए है...'
मस्त लेख आहे बरेच दिवसांनी वाचला ब्लोग
ReplyDeleteधन्यवाद अभिजीत :)
Delete