सुधीर गाडगीळ यांच्या ’मुद्रा’ पुस्तकातील ’मैत्र जीवाचे’ हा लेख वाचला अन शेवटच्या वाक्यावर विचार सुरू झाले..
ह्या लेखामधे गाडगीळ यांनी दिग्गज लोकांच्या जिवलग प्राण्यांबद्दलचे किस्से सांगितले आहेत आणि शेवटी नमूद केलं आहे की जितकं प्रेम ही मंडळी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर करतात तसं त्यांच्या आसपासच्या माणसांवर का करत नाहीत!
प्रेम..नितांत सुंदर अन सगळ्या नात्यांमधली एक प्रमुख भावना. नात्यांपरत्वे प्रेमाची रूपं निरनिराळी आहेत पण भावना एकच..त्या व्यक्तीबद्दल वाटणारा जिव्हाळा, काळजी, त्यासोबत आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी चवीनं जगणं, आशा-निराशेच्या काळात आधार देणं, समजून घेणं...ते तर एकमेकांवर प्रेम करणा-या व्यक्तींमधे असतं ना, पण तरीही लेखकाने असा प्रश्न का केला?
नातं कुठलंही असू देत, प्रेम करणारी व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करत असते पण त्याबरोबरच असं प्रेम करणारी व्यक्ती तसंच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव ह्यांची अपेक्षा समोरच्या माणसाकडून ठेवते. तसं बघायला गेलं तर ह्यात वावगं काहीच नाहीये पण अशी अपेक्षा ठेवल्यावर जर समोरची व्यक्ती ती अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर कदाचित प्रेमाचा आवेग कमी होऊ शकतो..प्रेम ही सर्वोच्च भावना असली तरी अशावेळेस अपेक्षा वरचढ होते. समोरच्या व्यक्तीसाठी केलेली तगमग दुर्लक्षित केली जातीये ही भावना टोचायला लागते. जितका आदरभाव समोरच्या माणसाबद्दल असतो तो हळूहळू कमी होऊन कदाचित व्देषाची भावना जम धरू लागते. मग ह्यातूनच कधी टोकाची भूमिका घेऊन जोरजबरदस्तीने प्रेम मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो!
खरं तर ते असं मिळविणं हे प्रेम नसतं तर तो फक्त माझा पण तुझ्यावर हक्क आहे ह्याची जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. अशाने काही साध्य होत नाही उलट नात्यांमधे दुरावा निर्माण होतो, कधीतरी दुरावा इतका वाढतो की ती व्यक्ती एक माणूस म्हणून सुद्धा आपल्या मनातून उतरते!
पण ह्यामधे चूक कोणाची? प्रेम करणा-या व्यक्तीची की ते प्रेम समजून त्याची परतफेड न-करू शकणा-याची? कदाचित कोणाचीच नाही अन दोघांचीपण आहे. प्रेम करणा-या व्यक्तीची चूक ह्यामुळे की त्याने निरपेक्ष प्रेम केलं नाही..प्रेम केलं आहे तर तसंच प्रेम समोरच्या व्यक्तीकडून मिळेल ही अपेक्षा चुकीची आहे. जर अपेक्षा ठेवली नसती तर अपेक्षाभंग झाला नसता आणि त्रासही वाचला असता! पण, एखादाही माणूस अपेक्षांशिवाय जगू शकतो? तुम्ही समोरच्या माणसाची काळजी घेत आहात त्याला समजून घेऊन त्याला रूचेल, आवडेल असं वागायचा प्रयत्न करत आहात तर तसंच समोरची व्यक्ती का नाही वागू शकत? त्याने असं वागावं ही साधी अपेक्षा का नाही ठेवू शकत? ज्या माणसावर प्रेम केलं तो सुध्दा माझ्यासारखाच माणूस आहे त्यालापण भावना आहेत अन दुस-याच्या भावना त्याला कळत असूनही ती व्यक्ती तसं का नाही वागू शकत??
प्रेमाची परतफेड न-करू शकणा-या व्यक्तीची चूक कशी? तर,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, आपली काळजी करतंय, त्याच्यासोबत आपण आयुष्यामधे चार घटका चांगल्याप्रकारे अनुभवू शकतो ही सुंदर भावना जाणवत असून देखील ती व्यक्ती तसं नाही वागू शकत, का? कदाचित त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली असेल पण आपणही त्यात काहीतरी देणं लागतो ही जाणीवच नसेल किंवा त्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करता येत नसेल किंवा हे नातं त्याच्यावर अप्रत्यक्षपणे लादलं गेलं असेल किंवा सुरूवातीला जी अपेक्षा ह्या व्यक्तीने ठेवली तितकी समोरच्याने पूर्ण केली नाही अन ह्याच व्यक्तीचा अपेक्षाभंग झाला. नाहीतर असंही असू शकेल की भौतिक गरजांची पूर्तता करण्यापेक्षा मोठी असणारी भावनिक गरज पूर्ण करणं ही जबाबदारी त्या व्यक्तीला पेलवत नसेल!
कारणं खूप असू शकतात पण ह्यामुळे होतं असं की दोघांनाही प्रेम मिळत नाही..सुरूवातीला कदाचित वाद अन नंतर मना-मनामधे पडलेलं कायमचं अंतर!
श्या..विचारांचा नुसता गोंधळ आहे हा!! अखेरला वाटतं प्रेम वगैरे काही नाहीये फक्त माणूस दुस-याकडून अपेक्षा करत राहतो त्याने किंवा तिने कसं वागावं ह्याची, त्यात तो कुठेतरी हे मात्र विसरतो की जशा त्याच्या दुस-याकडून अपेक्षा आहेत तशा दुस-यांच्यासुध्दा त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत!!
आणि मला उत्तर सापडलं गाडगीळांच्या प्रश्नाचं!
पाळीव प्राणी तुमच्यावर खरंखुरं प्रेम करतात, अगदी निरपेक्ष! तुम्ही सकाळी घराबाहेर पडतांना त्याला घरात बंद करून जा पण संध्याकाळी तो तुमच्या जवळ येईलच. कधी तुम्ही त्याला बाहेर फिरायला नेलं नाहीतर ते तुमच्यावर नाराज होऊन खेळणं बंद नाही करणार उलट तुमचा थकवा घालवण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही त्याला कधी झिडकारलत तरी ते तुम्हांला कधी सोडून नाही जाणार, कधीच तुम्हांला एकटं असल्याचं जाणवू नाही देणार. तुमच्याकडून कसलीच अपेक्षा न-ठेवता तुमच्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करत राहणार. कदाचित ह्यामुळेच माणूस, माणसापेक्षा एखाद्या प्राण्यावर जास्त प्रेम करू शकतो..
No comments:
Post a Comment