कित्ती धावपळीचा गेला आजचा पण दिवस बापरे! पाठ टेकल्यावर किती बरं वाटतंय :-) झालं आता फक्त ३ दिवस राहिले लग्नाला :-)
फक्त ३ दिवस राहिले...ह्या घरात वावरण्याचे..आईच्या कुशीत शिरून रडण्याचे आणि बाबाच्या मांडीवर झोपण्याचे...सकाळी उठवणारा बाबांचा आवाज आता ऐकू नाही येणार...उठल्या-उठल्या आईच्या हातचा वाफाळलेला चहा दुरावणार...ताईसोबत शर्यत लावून तयार होण्याची घाई नसणार...ह्या घरातलं माझं सगळं इथे सोडून जावं लागणार अगदी कायमचं!!
सगळे म्हणतात आता माझं आयुष्य अगदी बदलून जाणार, खरं आहे त्यांचं; माझं २७ वर्षांचं आयुष्य इथेच ह्या घरात सोडून जावं लागणार आहे त्यामुळे सगळंच बदलणार आहे.मी एका नविन कुटुंबात जाणार कोणाची तरी बायको, सून, वहिनी बनून!
आजपर्यंत माझ्या असणा-या सवयी, विचार अन नावही मला इथेच सोडून जावं लागेल. कालपर्यंत जी व्यक्ती मला माहितदेखील नव्हती तिला आज मी माझं सर्वस्व अर्पण करायला निघालीये, माझ्या म्हणवणा-या सगळ्यांना मागे सोडून :-(
किती विचित्र कहाणी आहे ही स्त्रीजन्माची!
माझी आईसुध्दा अशीच तिच्या माहेराला सोडून ह्या घरात आली होती अन आज मला तेच काम पुढे करायचं आहे. ही जगरहाटी चालू ठेवण्याकरता मला माझ्या आईने दिलेला संसाराचा हा दिवा पुढे घेऊन चालत रहावच लागणार आहे..
युगे युगे भावनांचे धागे, जपावया मन तुझे जागे,
बंधने ही जन्माची, सांभाळी स्त्रीच मानिनी,
बंदीनी स्त्री ही बंदीनी.....
No comments:
Post a Comment