आज अगदी कंटाळा आला भाजी-पोळी करायचा आणि विकांत असल्याने फ्रिजमधल्या भाज्यासुध्दा संपल्या होत्या. थोडी शोधाशोध केली तर कोथिंबीर तेवढी सापडली. थोडंसं डोकं चालवलं आणि तय्यार झाला चटपटा पराठा :)
तर साहित्य असं आहे
- कोथिंबीर - १/२ जुडी (किंवा फ्रिजमधे जितकी उरलेली असेल तितकी) ;)
- गव्हाचं पीठ - मोठे ३ चमचे
- दही - १२५ ग्रॅम
- १ चमचा चाट मसाला
- १ चमचा ओवा
- १ चमचा तिखट
- १ चमचा तीळ
- १ चमचा हळद
- ११/२ चमचा मीठ
आता कृती अशी आहे हं
कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्या. गव्हाचं पीठ घेऊन त्यामधे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरती दिलेले सर्व मसाले घाला. आवश्यक तितकं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या. दही घातल्यामुळे कदाचित थोडी पातळ होऊ शकते कणीक पण तरीही थोडं जास्त पीठ घालून व्यवस्थित गोळे बनवता येतील असं मळून घ्या. साधारण मध्यम आकाराचे गोळे बनवा आणि नेहमी पोळी जशी लाटतो तसे पराठे लाटून घ्या. पोळी भाजण्यासाठीचा तवा किंवा नॉन-स्टीक पॅन वापरून पराठा भाजून घ्या.
पराठा भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावा म्हणजे खमंग टेस्ट येईल आणि पराठे पटापट तयार होतील :)
तर तय्यार झालेले पराठे असे दिसतील
आता हे गरमा-गरम पराठे लिंबाच्या आंबट-गोड लोणच्यासोबत किंवा कांद्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता आणि जर खूप जास्त भूक लागली असेल तर तसेच गपागप हाणा, क्योंकी ये चटपटा परांठा है ;)
No comments:
Post a Comment