Thursday, March 7, 2013

प्रवास..



पुस्तकांच्या कपाटामधे काहीबाही शोधतांना अचानक माझी पाटी मला सापडली. अजुनही अगदी सुंदर काळीशार दिसत होती ती..मला आठवतं अगदी पहिलीपासून ते चवथ्या इयत्तेपर्यंत मी पाटी-पेन्सील घेऊनच सगळा अभ्यास केला..पुढे १०वी पर्यंत गणितं सोडवायला सुध्दा वापरली..त्यानंतर मात्र पाटी फक्त सरस्वतीपूजनाच्या दिवशी बाहेर निघायला लागली..

आमच्या घरी अशी पध्दत आहे की मुलगा / मुलगी शाळेमधे जाण्याअगोदर त्याला / तिला ’बासर’ला घेऊन जातात. भारतामधे सरस्वती देवीचं एकमेव मंदीर बासर ह्या गावी आहे. तिथे देवीचं दर्शन घेऊन आई-बाबाच्या मांडीवर बसून पहिला ’श्री’ पाटीवर गिरवला जातो. मी, माझ्या भावाने सुध्दा तशीच सुरूवात केली असं, आई सांगते.

ह्या पाटीने मला मुळाक्षरं गिरवायला शिकवली, चित्र काढायला शिकवली आणि अंकगणिताची सुध्दा ओळख करून दिली. वळणदार अक्षर काढायचं म्हणून पाटीवर दोन्ही बाजूने खूप प्रॅक्टीस केल्याचं अजुनही आठवतं मला..आणि एकदा वर्गामधे गोंधळ केल्याबद्दल बाईंनी शिक्षा म्हणून, शुध्दलेखन घोटून घेतल्याचं सुध्दा अजुन लक्षात आहे माझ्या..

शिक्षणाची पुढची पायरी चढले तसा पाटीचा सहवास दुरावला अन शिसपेन्सीलशी ओळख झाली..शिसपेन्सील, खोडरबर, शार्पनर :) कित्ती कित्ती प्रकार होते माझ्याकडे ह्या तीनही गोष्टींचे :) परिक्षा असल्यावर तर कंपास भरून टोक केलेल्या शिसपेन्सीली आणि दोन-तीन खोडरबर्स कायम असायचे सोबत...हातामधे शिसपेन्सील धरायची सवय होईपर्यंत इयत्ता सातवी आली अन बॉलपेन हातात आला.

पेन वापरायला मिळतंय म्हणून एकदम मोठं झाल्याची जाणीव झाली :) मग वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स, गृहपाठ करायला म्हणून वेगवेगळ्या रंगांची शाई असलेले पेन्स असं सगळं वापरायला सुरूवात झाली.

दहावी मधे गोल्डन कलरचं झाकण असलेला ’चायना पेन’ वापरला. शाईच्या पेनाने अक्षर अगदी छान येतं ह्या (गैर)समजुतीमुळे मी अगदी बारावीपर्यंत तो वापरला. त्या पेनला स्वच्छ करण्यामधे आणि शाई भरण्यामधे परिक्षेच्या आदल्या दिवशीचा एक तास तर नक्कीच खर्ची पडायचा :) सगळीच मजा मजा..

पुढे कंम्प्युटरचं शिक्षण घ्यायला कॉलेजमधे प्रवेश केला आणि चायना पेन तर सोडाच साधा बॉलपेनही हातात घेणं दुरावलं. फक्त परिक्षेपुरतं काय तो पेन गरजेचा वाटायला लागला..त्यानंतर नोकरी सुरू झाली आणि फक्त पहिल्या दिवशी जी काही कागदपत्रं भरून सही करावी लागते तितकाच पेन बाहेर निघाला. बाकी अं हं, काही कामच नाही उरलं पेनला हात लावण्याचं!

पुढे टच स्क्रीनचा मोबाईल घेतला आणि स्टायलस नावाच्या पेनसदृश लेखणीने लिहायला सुरूवात केली..



आणि आज तेही मागे पडलं जेंव्हा हातामधे आय-पॅड आला. पुन्हा एकदा बोटाने गिरवायला सुरूवात केली :)


सुरूवात बोटांनी मातीमधे मारलेल्या रेघोट्यांनी झाली मग पाटीच्या पाठीवर पांढ-याशुभ्र पेन्सीलीने लिहायला शिकले, मग शिसपेन्सीलीची मानगूट पकडत वह्या-पुस्तकांवर अक्षरं उमटवली, नंतर पेनने त्याचा ठसा उमटवत लिखाणाला नवं रूप दिलं...आणि आज पुन्हा एकदा मी रेघोट्या मारतीये ह्या ई-पाटीवर... 

कळत-नकळत घडलेल्या ह्या प्रवासाचं चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं आज ह्या टप्प्यावर...मस्त होता हा प्रवास 



4 comments:

  1. hey... masttach... hya saglyanchi aathvan karun dilis... aajhi pen/pencil hatat yete tevha vatat.. mi miss karte hyanna.. pan pati,patipencil,khadhu,khodrabar,china pen.. wow.. mi tar janu visarlech hote ... :( :)

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हर्षदा :)

      Delete
  2. मस्तच,
    माहित नाही का पण लहान पणी पाटी पेन्सिल वरून खूप धपाटे खाल्ल्याचे आठवते.कारण रोज पेन्सिल हरवायची.. मग आईचे धपाटे ठरलेले,,,,, नंतर हळूच आजोबांना सांगायचो आणि मग ते कोटाच्या खिशातली पेन्सिल द्यायचे. आनंद होता. माणसाला बालपण का नाही येत पाहिजे तेव्हा?

    आजही ई पाटीवर लिहिताना "श्री" काढायला फोन्ट लोड करावा लागतोच .... पाटीचा तो एक फायदा असावा ...शिवाय पाटीवर लिहिलेले पुसता यायचे विचार न करता ... इथे डिलीट करता येते पण हिडन मेमरी मध्ये राहिलेले परत मिळतेच कधीतरी... :)

    मस्त .. मजा आली वाचून ...
    देव तुझे भले करो ...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अक्षय :)

      Delete