Saturday, March 9, 2013

बालकलाकार = बालकामगार?


'आत्मा' ह्या नविन चित्रपटाचे ट्रेर्ल्स बघितले काल टिव्हीवर. नावावरूनच हा चित्रपट भयपट आहे ह्याची कल्पना येते. ह्यामधे एक छोटी, निरागस मुलगी दाखवली आहे.
एकूणच ते ट्रेलर बघून मला एक प्रश्न पडला की ह्या छोट्या डॉलला भिती नसेल का वाटली बरं ह्यामधे काम करतांना?
कदाचित चित्रपटाचं शूटींग सुरू असेल तेंव्हा नसेलही वाटली पण, प्रत्यक्षात जेंव्हा ती बघेल प्रिमियर शो तेंव्हा तिला स्वतःला असं बघता येईल मोठ्या पडद्यावर? तिच्या मनावर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा परिणाम होईल?

आज सिनेमामधे म्हणा किंवा टीव्ही सिरियल्स, टीव्ही कमर्शियल्स मधे म्हणा सर्रास लहान मुलं काम करत आहेत.
त्यांचं सगळ्यांच काम नो-डाऊट चांगलं असतं पण १८ वर्षाखालील मुलांकडून काम करवून घेणं हे नियमामधे बसत नसतांना सुध्दा हे सगळं चालतं? की टीव्ही / मिडीयासाठी काम करणा-या मुलांना हा नियम लागू होत नाही? कायदेतज्ञांनी मला इथे थोडी मदत करावी जर माहिती वेगळी असेल तर

'मकडी' ह्या चित्रपटामधे काम केलेल्या मुलीची मुलाखत मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती. तिला विचारलं की तू तुझं सगळं रूटीन कसं सांभाळतेस? त्यावर तिने जे उत्तर दिलं ते अगदी विचार करायला लावणारं आहे. ती म्हटली,'शूटींग के टायमिंग तो संभालने पडते हैं लेकीन उस वजह से स्कूलमें इर्रेग्युलर हो गयीं हूं, फिर भी एक्झाम से पहले पढाई कर लेती हूं. लेकीन मेरे सारे दोस्त मुझसे दूर हो गये हैं क्योंकी मैं उनके साथ टाईम नहीं बिता सकती और कहीं पर भी अगर जाना चाहूं तो सेलेब्रिटी स्टेटस संभालना पडता है.'

एका १०-१२ वर्षाच्या मुलीची ही प्रतिक्रिया किती बोलकी आहे. चित्रपटामधे काम करणं, ग्लॅमर वर्ल्ड ह्या सगळ्या गोष्टी एकवेळ पैसा, प्रसिध्दी मिळवून देतील त्या लहानग्या मुलीला आणि तिच्या आई-वडीलांना. पण तिचं जे बालपण आहे, शाळेत जाण्याचं वय आहे, मित्र-मैत्रिणींमधे खेळण्याचं वय आहे त्याचं काय? ते एकदा हरवलं की हरवलं ना!

दोन वर्षांपूर्वी स्टार प्लस की कसल्या तरी वाहिनीवर एक सिरीयल सुरू होती ज्यामधे अशीच एक ४-५ वर्षाची मुलगी काम करत होती. घरी खेळतांना तिचा हात फ्रॅक्चर झाला. तिच्या हाताला प्लास्टर घातलं पण ती ज्या सिरीयलमधे काम करत होती त्याचं शूटींग ती नसल्यामुळे अडलं होतं. त्यामुळे हात गळ्यात टांगून तिला कॅमेरासमोर उभं रहावंच लागलं, आता बोला!

हे असे सगळे प्रसंग बघून, वाचून असं वाटतं की कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणा-या छोट्या मुली, लहान मुलं ह्यांना जसं राबवून घेतात तसंच लाइमलाईटच्या झगमगाटामधे ह्या बालकलाकारांनासुध्दा राबवलंच जातं ना! इथे फरक इतकाच असतो की ही मुलं चांगले कपडे घालून, मेक-अप करून, एसी कारमधून फिरणारी आहेत आणि बांधकाम करणारी मुलं घाणेरड्या वस्तीत राहणारी अन फाटके कपडे घालणारी!

जसा बांधकाम करणा-या मुलांच्या आयुष्यावर, मनावर इतक्या लहान वयात काम केल्यामुळे परिणाम होतो तसाच बालकलाकारांच्या मनावर होत नसेल का बरं? एकाच वेळी मूव्ही, सिरियल, टीव्ही कमर्शियल्स करायच्या. शिफ्ट्स मधे कामं करायची आणि शाळा, खेळ सगळं तरीपण सांभाळायचं तेही ह्या कळत्या- न-कळत्या वयात?

इंग्लीश-विंग्लीश मूव्हीमधे काम केलेला मुलगा सध्या कोणत्यातरी सिरीयलमधे काम करतोय. त्यामधे तो अतिशय लाडावलेला, उध्दट आणि हट्टी दाखवला आहे. आता जर हा मुलगा सिरियलमधे करत असलेल्या रोलमधून बाहेर पडलाच नाही आणि हट्टीच राहिला अधिकाअधिक उध्दट होत गेला, सेलेब्रिटी असण्याची हवा त्याच्या डोक्यातून मेक-अप काढल्यानंतरही उतरलीच नाही, तर ह्याला जबाबदार कोण? त्या सिरियलचा डायरेक्टर किंवा डायलॉग रायटर की त्या मुलाचे पालक?

सध्या टीव्हीवर गाणी म्हणणारी आयडॉल्स, ड्रामेबाज वगैरे शोधण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. ब-याच काळापासून त्या सुरू आहेत वेगवेगळ्या नावाने. अशाच एका कॉमेडी कार्यक्रमामधे एक छोटी मुलगी पुढे आली तिच्या अंगभूत गुणांमुळे. पुढे तिला सोनी टीव्हीवरचा कॉमेडी शो मिळाला. त्यामधे तर ती चक्क मोठ-मोठ्या कलाकारांना लाजवेल अशा पध्दतीचे हातवारे करत, असभ्य भाषेतले डायलॉग्स म्हणत आजीचे वगैरे रोल्स करू लागली.

आपल्याला असं सगळं बघतांना मजा वाटते, दोन घटका करमणूक होते पण ही मुलं पुढे कशी वागतील?
आपण घरामधे जास्तीत जास्त काळजी घेतो लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची. पण, जर लहान मुलांना घेऊन असले कार्यक्रम सुरू असतील तर कार्यक्रमामधे काम करणा-या आणि ते बघणा-या मुलांवर काय परिणाम होईल ह्या सगळ्याचा??

तुम्ही म्हणाल हल्लीची मुलं खूप हुशार आहेत, सगळं बरोबर मॅनेज करतात. अरे पण, त्यामुळे जर त्यांचं मोठं होणं फास्ट फॉरवर्ड होत असेल तर पुढे त्यांच्या जगण्यामधे काही मुल्यं, संस्कार, माणूसपण टिकेल? त्यांना ह्या गोष्टी ज्या वयामधे कळायला हव्यात, शिकायला मिळायला हव्यात, अनुभवता यायल्या हव्यात त्या वयात ते इतके बिझी झाले तर कसं कळेल त्यांना? :(

खूप विचित्र प्रश्न आहेत हे :( उत्तरं मात्र...?  कदाचित तुमच्याकडे असतील, आहेत का हो?      

6 comments:

  1. nice read.. its hard question though..Only thing is when I was in school.. those who were in to the school.. many of them in to extra curriculum activities.. They used to be busy in singing, dancing, sports, elocution etc. But Now I see them they are no where. Even though they were good at studies as weel as extra things in school .. today when I look back and I was being average student. I am much better than them by all means at this stage of my life. So, I personally feels whatsoever one does / work / study in childhood all matters is how one handles every bit of his/her life while growing. Irrespective of how they are leading now.. Tomorrow can be totally different for him/her :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल, कृपया आपलं नावंही कळवा पुढच्यावेळेस.

      Delete
  2. @ प्रियांका
    प्रश्न सहाजिक आहेत. लहान मुलांना सिरीयल मध्ये काम देणे म्हणजे बाल मजुरीस प्रोत्साहन देणे हे खरेच आहे आणि ते कोणी नाकारू शकणार नाही. होम अलोन" चित्रपटात काम केलेला तरुण पुढे ड्रग्सच्या आहारी गेला. पैसा आणि प्रसिद्धी ... या दोन गोष्टींमुळे पालक या वृत्तीला प्रोत्साहन देतात. लहान मुलांनी अश्या सिरिअल्स अथवा स्पर्धांमध्ये भाग घ्यावयास हरकत नाही. परंतु त्यांना / त्यांच्या पालकांना एक अट घालावी. या सर्वाचे मानधन हे त्या मुलास किंवा त्याच्या पालकास तो / ती त्याच्या वयाच्या १८ / २१ वर्ष्याचा झाल्या नंतर मिळेल. आपले सरकार हा धाडसी निर्णय घेणार नाही आणि तो समाज या निर्णयाला विरोध करेल. "
    अरे लैंगिक संबंध वगैरे सारख्या बाबतीत लहान मुलांमध्ये असलेल्या गैरप्रकारा वर उपाय म्हणून सरकारने काय पाऊले उचलली?? तर ... वयोमर्यादा १८ वरून १६ वर आणली ... त्यामुळे सरकारकडून अपेक्षा सोड.
    समाज म्हणून आपण पुढील २ ३ गोष्टी करू शकतो.
    १) लहान मुलांचे वादग्रस्त कार्यक्रम / चित्रपट यावर बहिष्कार टाकू शकतो.
    २) घरात गरजू लहान मुलांना काम देऊन त्यांना आर्थिक मदत करू शकतो.
    ३) अशा गरीब / बालमजुरांना कामावरून काढण्यापेक्षा काम करताना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
    ४) किंवा नेहेमीप्रमाणे लेख लिहावे आणि जन जागृती करण्यात इतिकर्तव्यता मानवी .... :)

    अक्षय फाटक

    ReplyDelete
    Replies
    1. हम्म पर्याय तर आहेत फक्त ते कसे आमलात आणता येतील ते बघावं लागेल, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अक्षय

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद यशोधन :)

      Delete