Thursday, September 12, 2013

'नवरा' एक खोज - भाग ७

प्रत्यक्ष भेटी किंवा फोनवरून संपर्क अशा पध्दतीने माझ्यासाठी 'नवरा' ह्या प्राण्याचा शोध घेणं सुरू होतं. ह्यादरम्यान एका दिवशी माझं नाव नोंदवलेल्या वधू-वर सूचक मंडळाकडून एक मेल आलं.अमूक एका तारखेला त्यांनी वधू-वर मेळावा आयोजित केला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार हा मेळावा अगदी टीपीकल नसून वेगळा होता.वेगळेपण कसं तर, फक्त ज्या मुलांना आणि मुलींनी 'यंदा कर्तव्य आहे' तेच हा मेळावा अटेंड करू शकतात आणि नाव नोंदवणा-या पहिल्या पन्नास जनांना आणि जनींना ह्यामधे प्रवेश होता.मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही पालकांना ह्या कार्यक्रमामधे सहभागी होता येणार नव्हतं.

बाबा म्हटले तुझं नाव नोंदवू, बघ जाऊन तिथे कोणी सापडतो का Wink
मी पण विचार केला एका-एका मुलाला भेटण्यापेक्षा जर पन्नासजणांना एकदाच भेटता येत असेल तर चांगलं आहे.

तर मेळाव्याचा दिवस उगवला, सकाळी ११ची वेळ ठेवण्यात आली होती त्याप्रमाणे मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले.एका मंगल कार्यालयामधेच त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता Mosking
दारामधे मंडळाच्या दोन काकू बसल्या होत्या त्यांनी माझं नाव विचारून मला एक नंबर दिला आणि आतमधे दिलेल्या नंबरच्या ग्रुपमधे जाऊन बसायला सांगितलं.

आत गेल्यावर बरीच मंडळी ग्रुपमधे बसलेली दिसली.मी माझा ग्रुप शोधला आणि येऊन बसले.आमच्या ग्रुपमधे आम्ही तीन मुली होतो आणि दोन मुलगे बसलेले होते.पाच-एक मिनीटामधे कार्यक्रम सुरू झाला.
एक काका हॉलच्या स्टेजपाशी उभे राहून खणखणीत आवाजात बोलू लागले.मंडळाचा व्यवस्थापक म्हणून
त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि हा मेळावा काय आहे आणि कसा वेगळा आहे हे एकवार सांगून आम्ही बसलेल्यांनी नेमकं काय करायचं हे सांगितलं.

प्रत्येक मुलाला आणि मुलीला एक पत्रक दिलं होतं. त्यामधे मेळाव्याला आलेल्या सर्वांची नाव-गाव-पत्ता-फोन नंबर-शिक्षण-पगार वगैरे माहिती होती.ग्रुपमधे एकूण पाच जण होते. प्रत्येक ग्रुपला एक विषय दिला जाणार आणि त्यावर पाच मिनीटे चर्चा करायचा वेळ दिला जाणार. विषयावर बोलायला सुरूवात करण्याअगोदर प्रत्येकाने स्वतःची थोडक्यात ओळख करून द्यायची. पाच मिनीटे संपली की मुलांनी उठून पुढच्या ग्रुपमधे जाऊन बसायचं आणि परत चर्चा करायची.जर कोणाला एखादा मुलगा आवडला किंवा मुलगी आवडली तर त्या पत्रकामधे त्या व्यक्तीचा नंबर मार्क करून ठेवायचा.प्रास्तावीक करून काकांनी कार्यक्रम सुरू झाल्याची घोषणा केली.

आमच्या ग्रुपला पहिला विषय मिळाला.मी चिठ्ठीमधे लिहीलेला विषय सगळ्यांना सांगितला. मग आम्ही सर्वांनी एक-एक करून स्वतःची माहिती दिली आणि चर्चेला सुरूवात केली.कोणी विशेष काही बोलत नव्हतं.उलट, बसलेली दोन मुलं पत्रकामधे डोकं घालून बसली होती.

पहिल्या विषयाचा वेळ संपला तसे ते दोघे उठून दूस-या ग्रुपमधे गेले आणि नविन दोघे येऊन बसले.त्यातला एकजण अगदी झोपेतून उठून आल्यासारखा आला होता. चेह-यावर दाढी वाढलेली, डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त आणि कपडे तर त्याच्या मापाचे अजिबातच वाटत नव्हते इतके ढगळ!
त्याने स्वतःची ओळख करून देतांना मी 'रॉकस्टार' आहे आणि आमच्या रॉक बॅन्डमधे लीड सिंगर म्हणून काम करतो असं सांगितल्यावर त्याच्या अवताराचा अर्थ लागला Biggrin
दूसरा मुलगा त्यामानाने बराच बरा दिसत होता.

दिलेल्या विषयापेक्षा इतर गोष्टींवर म्हणजे एकमेकांबाबत जास्त माहिती मिळवण्याकडे सर्वांचा कल दिसला पण एक मुलगी अशी होती की ती सारखी सगळ्यांना आठवण करून देत होती की आपल्याला चर्चा करायला सांगितली आहे तर चर्चा करू उगाच वेळ संपली तर प्रॉब्लेम होईल.पण तिच्याकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही.

असंच बराच वेळ विषय चेंज होत गेले आणि नवनविन मुलं आमच्या ग्रुपमधे येऊन गेले पण मला कोणी विशेष वाटत नव्हता.अर्ध्याअधिक मुलांना तर असं मेळाव्यामधे एकदम तीन-चार जणांच्या ग्रुपमधे बोलायचं कसं हे सुचत नव्हतं.मुली त्यामानाने नीट माहिती देत होत्या आणि व्यवस्थित विचारही मांडत होत्या.

काही मुलांचा तर, हा सगळा टाईमपास सुरू आहे आणि आज रविवारची सुट्टी कशी वाया गेली असा सूर होता! काही मुलं व्यवस्थित बोलत होती पण मग त्यांच्या अटी अशा होत्या की, मी त्यामधे बसत नव्हते आणि काही मुलं माझ्यापेक्षा वयाने फारच मोठी होती!

दोन-तीन मुलं अशीही भेटली की ती तिस-यांदा अशा मेळाव्याला आली होती, अगदी सराईतासारखी ती आमचा इंटरव्ह्यू घेत होती Biggrin

दोन तास हा सगळा सोहळा चालला, वेळ संपली तसं व्यवस्थापक काकांनी माईक परत हातात घेतला आणि घोषणा केली की आता चहा-पान करून घ्या आणि तुम्हाला जर कोणा मुलाशी/मुलीशी बोलायचं असेल तर त्याला/तिला भेटून चर्चा करा.

पाच-एक मिनीटात सर्वजण हातात चहा घेऊन इकडे-तिकडे फिरू लागले.मी एका कोप-यात उभी राहून मजा बघत होते.हॉलमधे एका ठिकाणी मला बरीच गर्दी दिसली थोडं जवळ जाऊन बघितलं तर,मेळाव्यामधे सर्वात व्यवस्थित दिसणा-या एका मुलाशी तीन-चार मुली बोलायचा प्रयत्न करत होत्या.तो सुध्दा एकदम छाती पुढे काढून प्रत्येकीला अटेंड करत होता.मला गंमत वाटली आणि सहज म्हणून मी त्याचा आणि त्या मुलींचा नंबर चेक केला.तो मुलगा आणि त्या सर्व मुलींमधे जवळपास दहा वर्षांचं अंतर होतं!

मला काय कोणाशी बोलायची इच्छा नव्हती म्हणून मी नंतर तिथून बाहेर पडले.रिक्षा पकडून तडक घरी पोहोचले.घरी सगळेजण माझीच वाट बघत होते.

आईने पाणी दिलं आणि लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.कसा होता कार्यक्रम, किती जण आले होते, तुला किती आवडले. त्यातच ताईने विचारलं कोणत्या क्षेत्रातले होते,पगार किती काय.त्यांना उत्तर देईतो बाबा पण घरात आले मग त्यांनी सुरू केलं. पत्रिका आहे का त्या मुलांची, कोणाला बघायची नसेल तर तसं कितीजणांनी सांगितलं वगैरे वगैरे!

आई ग! किती ते प्रश्न! Nea

मला कोणीच आवडला नाही असं एकदाच सगळ्यांना उत्तर देऊन टाकलं मी.

ते ऐकून आई-बाबांचा चेहरा खर्रकन उतरला! ताईसुध्दा म्हटली काय? अगं पन्नास पोरांमधून तुला एकही नाही आवडला Shok

मी: ( शांतपणे म्हटलं) खरंच गं ताई मला कोणीच नाही आवडला.
ताई: पण का??
मी: एकतर अर्ध्या पोरांना धड बोलता येत नव्हतं.माहिती विचारली तर तत-पप करत होते.
बाबा:( नाराजीच्या सुरात ) तू दरडावून विचारलं असणार मग ते बिचारे घाबरले असतील, कसा आवाज फुटेल त्यांच्या तोंडून!
मी: बाबा! मी एकटीच मुलगी नव्हते काही तिथे, ग्रुपमधल्या इतर मुलींशी बोलतांना पण तीच अवस्था होती त्यांची. एक मुलगा तर अजागळासारखा उठून आला होता म्हणजे आपण कुठे जात आहोत ह्याचंसुध्दा त्याला भान नव्हतं!
आई: अगं असतात काही मुलं अशी. सगळेच कसे तुझ्यासारखे सगळ्या बाबतीत पर्टिक्युलर असतील.त्या मुलांना सोडून कोणी दूसरं दिसलं नाही का तुला?
मी: अगं अगदीच कोणी चांगलं नव्हतं असं नाही पण जे ठीक वाटले त्यांच्या अटी फार वेगळ्या होत्या गं.
म्हणजे एक डॉक्टर आहे, त्याचा दवाखाना त्याच्या गावामधे आहे. त्याला त्याची बायको तिथे राहणारी हवी आहे मग आता मी माझी नोकरी सोडून तिथे कशी शिफ्ट होऊ?
आई: अगं तिथे दूसरी नोकरी बघ ना, पोरीने नोकरी केलीच पाहिजे असा काही नियम नाहीये!
ताई: आई, नोकरीबाबत तिने तिचा निर्णय घेणं जास्त योग्य आहे. जर तिला नको वाटत असेल तर आपण बळजबरी करण्यात अर्थ नाही.
मी: अगं आई, मी एकवेळ नोकरीवर पाणी सोडलं असतं पण तो मुलगा डॉक्टर. आता त्याच्या दवाखान्यामधे मी काय मदत करणार त्याला? एनीवे. बाकी जे ठीक वाटले ते फार म्हणजे अगदी दहा वर्ष मोठे होते माझ्यापेक्षा मग मला ते नको वाटलं Sad
बाबा: दहाच वर्ष ना, त्यात काय होतं. मुलगा चांगला असेल, व्यवस्थित पगार, घर-दार असेल तर वयातलं अंतर थोडं जास्त असेल तर काय फरक पडतो!
मी आणि ताई एकदम अवाक झालो ते ऐकून!
आई: अहो काही तरी काय बोलत आहात. हल्लीच्या काळी नवरा-बायकोमधे इतकं जास्त अंतर नसतं.आपल्या वेळी ठीक होतं.हल्ली ते जनरेशन गॅप का काय ते असतं म्हणतात. त्यामुळे, नको इतकं अंतर उगाच. जाऊ दे गं, तुला नाही आवडला ना कोणी ठीक आहे. बघू आपण परत शोधू.
बाबा: तू मला एकच गोष्ट सांग, तुला स्वतःला तरी माहित आहे का कसा मुलगा शोधत आहेस तू?? आतापावेतो पन्नास-साठ मुलं बघितलीस पण तुला एकही ठीक वाटला नाही! बघा, कुठेतरी अ‍ॅडजस्टमेंट करायला शिका, सगळंच मनासारखं मिळत नाही प्रत्येकाला.

मी शेवटी तिथून उठून माझ्या रूममधे जाऊन बसले Cray 2

2 comments:

  1. Exactly same feelings as yours n exactly same reaction from parents. Nice blog, every girl will relate. Very well described!!

    ReplyDelete