Thursday, April 3, 2014

ग्रंथालय

कृपया कोणीतरी मला एखादं चांगलं ग्रंथालय सांगा हो कोथरूड बस स्टँडच्या आसपास असेल असं, अगदी उपासमार होत आहे पुस्तकं वाचायला न-मिळाल्यामुळे :(

तसं म्हणायला एक दुकान आहे सिग्नलला जिथे म्हणे ते ग्रंथालय चालवतात.पहिल्यांदा दिसलं तेंव्हा डोकावले तर आतमधे रचलेल्या पुस्तकांची अवस्था बघून इच्छाच नाही झाली :( तरी आत जाऊन पुस्तकं शोधायचा प्रयत्न केला पण त्यांनी लावलेली व्यवस्था मला तरी ध्यानात नाही आली आणि तिथे काम करणा-या कोणीही आपणहून पुस्तकांबद्दल काही माहिती नाही दिली. कदाचित तिथे चांगली,काही दुर्मिळ पुस्तकं असतीलही पण इतका थंड प्रतिसाद बघून नकोच वाटलं.

ग्रंथालय कसं असं मस्त असायला हवं म्हणजे आत गेलं की नव्या-जुन्या पुस्तकांचा मंद सुगंध असेल.विविध विषयावरची, विविध लेखकांची पुस्तकं व्यवस्थित रचून ठेवलेली असतील. आपल्याला हवं ते पुस्तक शोधायला क्वचित त्याबद्दल माहिती द्यायला एखादी व्यक्ती असेल तर मग पुस्तक वाचनाचा आनंद व्दिगुणित होतो :)

मला अशीच एक लायब्ररी वनाझला सापडली होती. त्या लायब्ररी चालवणा-या काकांनी जुनी पुस्तकं एका दुस-या लायब्ररीवाल्यांकडून घेतली होती त्यामुळे, अगदी दुर्मिळ पुस्तकंही त्यांच्याकडं उपलब्ध होत. आणि पुस्तकं घ्यायला गेलं की ते नविन आलेल्या किंवा त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल आवर्जून बोलायचे,खूप मस्त वाटायचं :)

ह्याउलट मी पार्ल्याला असतांना एका शाळेतली लायब्ररी लावली होती. तिथे तीन काकू बसलेल्या असायच्या. प्रत्येकीसमोर ढीगभर पुस्तकं पडलेली, शक्यतोवर तुम्ही त्यातून पुस्तकं निवडा असा त्यांचा आग्रह. कारण, रॅकमधून पुस्तक काढून द्यायचा त्यांना येणारा कंटाळा! कधी कोणत्या पुस्तकाबद्दल विचारलं तर त्यांना माहित नसायचं किंवा त्या सांगायच्या नाहीत. मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे वाचून झालेल्या पुस्तकाबद्दल त्यांना सांगायचे तर त्या कधी त्यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या पण नाहीत :p

असो, सध्यातरी परिस्थिती अशी आहे की मला अगदी निकड आहे एखाद्या साध्याच पण चांगल्या लायब्ररीची.आता तुम्ही म्हणाल इतकंच वाटतं तर पुस्तकं विकत घे आणि वाच ना! पण, काय करू मला एक वाईट सवय आहे, कुठलंही पुस्तक वाचल्याशिवाय मला ठरवताच येत नाही ते संग्रही ठेवायचं की नाही ते!

म्हणून कृपया जाणकारांनी मदत करावी ही विनंती :)

No comments:

Post a Comment