Friday, March 13, 2015

ओएमजी - ओह माय गुगल!

आजच्या टाईम्स मधे एक धक्कादायक बातमी वाचली
IITian who killed family fearing AIDS tests negative

गुगल..गुगल..गुगल!!! आयआयटी मधून शिकलेला माणूस सुद्धा नीट विचार करू शकला नाही आणि गुगल च्या नादाने काय करून बसला!!

म्हटलं तर गुगल चा काही दोष नाही ह्या घटनेमधे पण आज जी टेक्नॉलॉजी आपल्या हातात इतक्या सहजपणे खेळतीये तिचे दुष्परिणाम इतके भयंकर असू शकतात!!

'वेबबेड' म्हणून एक मालिका एम.टीव्ही या चॅनेलवर दाखवली जाते. त्यातही अशाच काही लोकांच्या कथा दाखवल्या जातात जे टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचा किंवा
दुस-याचा जीव धोक्यात घालतात!!

हल्ली खुपच सोपं झालंय ना आपल्यासाठी, हातामधे ३जी मोबाईल असतो, काहीही अडलं की गुगल करा आणि उत्तर मिळवा.

कुठल्याही गोष्टीबाबत कुतूहल वाटणं साहजिक आहे पण, ते कुतूहल शमवण्यासाठी किंवा त्याबाबतीत माहिती मिळविण्यासाठी आपण जे स्त्रोत वापरतो ये कितपत योग्य आहेत आणि मिळालेली
माहिती कितपत 'खरी' आहे याची शहानिशा करतो का?

उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू ची प्रचंड साथ चालू आहे आपल्या भागामधे. ह्याबाबत काळजी कशी घ्यावी पासून ते होमिओपॅथीचं कोणतं औषध घ्यावं, कोणतं
फळ जास्त प्रमाणात खावं इतपर्यंत सर्व माहिती व्हॉट्स अ‍ॅपवरून किंवा फेसबुकवरून सर्सास इकडे-तिकडे पाठवली जात आहे. पण त्यात कितपत तथ्य आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

साधारणपणे आपल्याला जेंव्हा काही त्रास व्हायला लागतो म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप येणे, शरीर जेंव्हा काही वेगळी लक्षणं दाखवायला लागतं तेंव्हा आपण सहसा लगेच डॉक्टर कडे जात
नाही, मेडीकल वाल्याकडे जाऊन गोळ्या घेऊन येतो किंवा घरी असलेल्या गोळ्या घेऊन काम भागवतो.

पण, हल्ली असंही होत आहे की, काहीही झालं की आधी गुगलबाबाला विचारायचं, विशेषतः जी मुलं-मुली एकटी राहतात किंवा शिक्षणानिमित्त, कामानिमित्त घरापासून दूर राहतात त्यांच्यामधे
गुगलला विचारण्याकडे कल जास्त दिसतो.
हां तर मग गुगलबाबाकडून जे उत्तर मिळेल, समजेल किंवा आवडेल तो पर्याय निवडायचा आणि त्यानुसार पुढचं पाऊल उचलायचं.जर ती मात्रा लागू पडली नाही तरच मग डॉक्टरकडे जायचं! तिथे गेल्यावरही डॉक्टरला आपण 'गुगल'च्या कृपेने मिळविलेल्या ज्ञानाचा पाढा वाचून दाखवायचा आणि स्वतःच स्वतःच्या रोगाचं निदान सांगायचं!

आणि इथेच तर सगळी गम्मत घडत आहे! माहितीचा प्रचंड साठा असणा-या गुगल ला हे कळत नाही की कोणती माहिती खरीच 'खरी' आहे किंवा नाही. माहिती पुरवणं इतकंच त्याचं काम आहे पण तिचा उपयोग कसा आणि कुठे आणि किती प्रमाणात करायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं!

गुगलमधे जी माहिती मिळते ती तुमच्या-आमच्यासारखीच माणसं लिहून साठवतात. प्रत्येकवेळेस मूळ स्त्रोताचा संदर्भ दिलेला असतोच असं नाही त्यामुळे, डोळे उघडे ठेउन माहिती वाचा आणि शक्यतो खात्री करून घेऊन मगच तिचा उपयोग करा.


No comments:

Post a Comment