Tuesday, March 24, 2015

वेळ

मला ना एक वाईट सवय आहे! बाहेर कुठेही गेल्यावर मला आजूबाजूला बसलेल्या लोकांचं निरिक्षण करायला फार आवडतं.

परवा असंच झालं, आम्ही दोघे एका हॉटेलमधे जेवायला गेलो होतो.जेवायची ऑर्डर देऊन झाल्यावर माझं निरीक्षण चालू झालं. रविवार संध्याकाळ असल्यामुळे हॉटेलमधे व्यवस्थित गर्दी होती.वेटरची लगबग चालू होती आणि जवळपास सगळेचजण आपापसात गप्पा मारण्यात मश्गूल होते.

आमच्या शेजारच्या टेबलवर माझं लक्ष गेलं तेंव्हा, तिथे तिनजण बसलेले दिसले. त्यापैकी एक छोटा मुलगा होता साधारण ३-४ वर्षांचा असेल अगदी गोड होता दिसायला :), त्याच्याशेजारी कदाचित त्याची आई बसलेली असावी आणि त्या बाईसमोर एक पुरूष बसलेला होता.

ती बाई आणि तो पुरूष एकमेकांशी गप्पा मारत होते आणि अशा रितीने बोलत-हसत होते की ते एखादं यंग कॉलेजगोयिंग कपल आहे, त्यांचं नुकतंच सूत जुळलं आहे आणि ते एकमेकांमधे हरवून गेलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचं त्यांना काही घेण-देणं नाहीये आणि मुख्य म्हणजे एक लहान मुलगा आपल्या बाजूला बसलेला आहे ह्याचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.

तो छोटा मुलगा अगदी केविलवाण्या नजरेने सारखा त्या दोघांकडे बघत होता..पण त्या दोघांचं खरंच लक्ष नव्हतं!!
अगदी बोअर होऊन तो नुसता समोर ठेवलेल्या पेल्यातलं पाणी पित बसला होता आणि स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता. इतक्यात माझी आणि त्याची नजरानजर झाली आणि मी त्याच्याकडे बघून हसले पण त्याने साशंक नजरेने बघत तोंड दुसरीकडे फिरवलं.

थोड्यावेळाने त्या कुटुंबाने(?) मागवलेला एक पदार्थ आला. मग त्या बाईने त्या छोट्या मुलाला सांगितलं की हातात काट्याचा चमचा घेऊन कसं खायचं ते आणि ती स्वतःचे फोटो काढण्यात मग्न झाली. त्या मुलाने एक किंवा दोनच घास खाऊन चमचा खाली ठेऊन दिला, त्याचं पोट भरलं होतं की त्याला आवडलं नाही माहित नाही पण, त्याच्यासोबत असणा-या त्या दोघांनाही त्याला विचारलं नाही की त्याला भरवायचा प्रयत्न केला नाही!

थोड्यावेळाने मुख्य जेवण आलं आणि त्यासोबत आईस-टी आला.त्या मुलाच्या खाण्याबाबत मगाशचीच गोष्ट घडली.फरक इतकाच की त्याने आईस-टी पूर्ण संपवला.मलाच इतकं विचित्र वाटत होतं ना ते सगळं बघून!

कदाचित त्या छोट्या मुलाने हॉटेलमधे येण्याआधी काहितरी खाल्लं असेल म्हणून त्याची आई त्याला भरवत नव्हती की जेवण करण्याबद्दल आग्रह धरत नव्हती, खरं काय होतं माहित नाही. पण, ज्या पध्दतीने ते दोघेही त्या लहानग्याकडे दुर्लक्ष करत होते ते मला अजिबात पटलं नाही.

ह्या सगळ्या प्रसंगाकडे बघत असतांनाच मागे अजून एक दृश्य दिसत होतं..असंच तिघांचं एक कुटूंब जेवण करत होतं.आई तिच्या २वर्षाच्या मुलीला कडेवर सांभाळत जेवण करत होती, तिला भरवत होती, तिच्याशी बोलत होती. आणि ती मुलगी सुध्दा अगदी आनंदाने सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देत होती.

दोन अगदी विरूध्द प्रसंग एकाच ठिकाणी घडतांना मी बघितले.

माझ्या मते, पहिल्या प्रसंगामधे जी बाई आहे ती नोकरी करणारी असावी आणि 'आय.टी.' मधे काम करणारी असावी जिला स्वतःच्या नव-यासोबत वेळ घालवायचा होता आणि स्वतःला पण वेळ द्यायचा होता.आणि मुलाला कदाचित जास्त वेळ तीच सांभाळत असेल तिच्या ऑफिसनंतर म्हणून आता हॉटेलमधे आल्यावर ती मुलाकडे लक्षही देत नव्हती!

याऊलट दुस-या प्रसंगामधे जी आई आहे ती कदाचित नोकरी करणारी नसावी, मुलीला सांभाळण्याचा तिला कंटाळा येत नसावा..तिचं पूर्ण विश्व फक्त तिची मुलगी असावी..

माहित नाही खरं काय ते ..पण मी मात्र खूप विचारात पडले..एकदा वाटलं त्या बाईने स्वतःला थोडा वेळ दिला तर काय चूक आहे त्यात? सारखं दुस-यासाठीच दिवसातले २४ तास मोजायचे का - मग तो मुलगा असो वा नवरा! पण मग असंही वाटलं की जर तिच्या लहान मुलाला तिने आत्ता वेळ नाही दिला तर कदाचित पुढे वेळ निघूनही गेलेली असेल!

दोनही प्रसंगांमधली कोणती आई बरोबर वागत होती आणि कोणती चूक माहित नाही पण, मला तरी असं वाटलं की, स्वतःच्या मुलांना शक्यतो जास्त वेळ द्यायला हवा. हल्ली नोकरीच्या निमित्ताने जसे दोघेही बाहेर असतात तसेच मुलंही शाळा-पाळणाघर-ट्युशन्स ह्यामधे व्यस्त असतात.ह्यामुळेच त्यांना आपल्या वेळेची आणि कदाचित त्यांच्यापेक्षा आपल्याला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याची खरी गरज निर्माण झाली आहे..

2 comments:

  1. Chan lekh aahe....aavdala
    http://hempatil.blogspot.in

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    ReplyDelete