स्पृहा जोशी आणि उमेश कामत ह्या 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' फेम जोडीचं 'डोण्ट वरी,बी हॅप्पी' हे नाटक सध्या हाऊस फुल्ल गाजत आहे. आता पर्यंत तीन वेळेस प्रयत्न करून शेवटी ७व्या रांगेतल्या तिकीटावर समाधान मानत काल हे नाटक बघायला गेले एकदाची.
नाटकाच्या कथानकाबद्दल थोडी कल्पना होती पण खास स्पृहाला भेटायचं म्हणून मी खरं तर नाटकाला गेले.एरवी नाटकाचा दिग्दर्शक आणि कलाकार बघून मी जायचं ठरवते पण ह्यावेळेस ते काही बघितलंच नाही.
नाटकाची तिसरी घंटा झाली, स्पृहाने आधी महत्वाच्या दोन सुचना दिल्या ज्या प्रत्येक नाटकाआधी देण्यात येतात - १)मोबाईल सायलंट करा आणि २) लहान मुल रडायला लागल्यास त्याला घेऊन त्वरित प्रेक्षागृहाबाहेर जा.
बरं झालं तिने दुसरी सूचना अशी नाही दिली की सर्वांनी आपापली मुलं आणि मोबाईल सायलंटला टाका.लोक ह्या वाक्याला पण फिदीफिदी हसतात! मी गेल्या काहि दिवसात बघितलेल्या जवळपास प्रत्येक नाटकात अशीच सुचना दिली जाते!
पुढे स्पृहाने नाटकाबद्दल माहिती द्यायला सुरूवात केली आणि दिग्दर्शकाचं नाव ऐकलं आणि माझ्या कपाळावर आठी उमटली 'अद्वैत दादरकर'!
मराठी नाट्यरंगभूमीवरचा तसा तरूण दिग्दर्शक आणि नाटकं पण चांगली दिली आहेत त्याने पण! तो कलाकारांकडून प्रचंड अतिशयोक्तीयुक्त काम करवून घेतो आणि जर तो स्वतः नाटकामधे असेल तर मग विचारायलाच नको!त्यामुळे मात्र नाटक सुरू होण्याआधीच माझा मूड थोडा खराब झाला. पण बघूया म्हटलं काय होतंय ते.
नाटक चालू झालं आणि माझी शंका दूर झाली :)
उमेश कामत,स्पृहा जोशी आणि मिहीर राजदा यांनी नाटक अगदी सुंदररित्या आपल्या समोर उभं केलं आहे.नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे एका जोडप्याच्या लग्नानंतरच्या आयुष्यामधे घडणा-या घटना.लग्न झाल्यावर जवळपास प्रत्येक जोडप्यामधे होणा-या कुरबुरी अगदी शब्दशः मांडल्या आहेत.म्हणजे एकवेळ बोअर होतं की घरात पण आपण हेच करतो आणि इथेपण हेच बघायचं का! पण अगदीच तसं नाही हं, पण ९९% जोडप्यांना साम्य आढळल्यावाचून राहणार नाही ;)
असो,तर विशेष आभार उमेश कामतचे की त्याने अज्जिबात ओव्हर एक्टिंग केली नाही आणि नाटक बघणं सुसह्य केलं.स्पृहाने सुध्दा प्रामाणिकपणे एका टिपीकल बायकोचा रोल निभावला आहे.
मिहीर राजदा हा ह्या नाटकाचा लेखक आहे आणि त्याने संवाद प्रचंड सुंदर लिहीले आहेत :)
वानगीदाखल एक सांगते - ' सगळे नवरे म्हणजे ब्ला.. ब्ला.. ब्ला आणि बायका बिच्चा-या अबला अबला अबला' :p .
नाटक आवडण्याकरता फक्त नट किंवा गोष्ट चांगली असेल तर भागतं असं नाही तर सगळ्याच गोष्टी जुळून यायला हव्यात जे ह्या नाटकामधे आहे.अर्थात दिग्दर्शकाने त्याच्या शैलीची चुणूक दोन सिन्समधे दाखवली आहेच पण पूर्ण नाटक बघता ते सुसह्य आहे.
नाटकाच्या नावात जरी हॅप्पी असलं तरी हे नाटक कॉमेडी नाही त्यामुळे त्या भ्रमात बघायला जाऊ नका मात्र, उमेश कामत आणि स्पृहाच्या अभिनय जुगलबंदीसाठी नक्कीच जाऊ शकता :) :)
No comments:
Post a Comment