मागच्या आठवड्यामधे गुरूवारची सुट्टी सार्थकी लागावी म्हणून 'दोन स्पेशल' नाटकाची तिकीटं मिळवली.ह्यावेळेस वेळेत काढल्यामुळे ४थ्या रांगेत मधल्या सिट्स मिळाल्या :)
**महत्वाची सुचना : हे नाटक अत्यंत सिरीयस आहे!
महत्वाची पात्रं तीन आहेत ह्यामधे. त्यातल्या त्यात जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले ही मुख्य पात्रं आहेत.
पूर्ण नाटक हे एका वृत्तपत्राच्या ऑफिसमधे घडतांना दाखवलं आहे. १९८९ साल चालू आहे आणि रात्रपाळीसाठी आलेला उपसंपादक आहे जितेंद्र जोशी, त्याच्याकडे म्हणजेच दैनिक हिंदुस्थानच्या कार्यालयामधे नोकरी मागण्यासाठी आलेला एक होतकरू तरूण आहे रोहित हळदीकर आणि जितेंद्र जोशीची ९ वर्षांपूर्वीची प्रेयसी जी आज कोणा दुस-याची बायको आहे ती आहे गिरीजा ओक-गोडबोले. ही प्रेयसी ९ वर्षांपूर्वी ह्याच कार्यालयामधे काम करत होती.
रोहित हळदीकर हा बहुतेक नवोदित कलाकार आहे पण त्याचा अभिनय अतिशय नैसर्गिक आहे आणि सातारकडच्या लोकांच्या बोलण्याची लकब त्याने व्यवस्थित केली आहे.
जितेंद्र जोशी ला मी जवळ-जवळ ८ वर्षांनी नाटकात काम करतांना बघितलं पण तो एक ब्रिलियंट कलाकार वाटतो आणि म्हणून आवडतो सुद्धा मला, त्याचा अभिनय इतका सहज आहे ह्याही नाटकामधे की तुम्हांला वाटतच नाही कोणी कलाकार नाटक करत आहे तुमच्यासमोर! जणू एखादा मित्र त्याची कथा, व्यथा आपल्यासमोर मांडत आहे असं वाटतं बघतांना.
गिरीजा ओक-गोडबोले हिचं काम मी आजवर कधीच बघितलं नाही आणि नाटकात तर नाहीच नाही. पण ती कसदार अभिनेत्री आहे हे जाणवलं. कदाचित जितेंद्र जोशीसोबत जुळवून घेता यावं म्हणून तिला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल पण परिणाम अगदी अपेक्षित साधला आहे तिने.
ह्या नाटकामधलं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल मला तर ते बॅकग्राउंड म्युझिक! आजवर इतकी नाटकं बघितली पण असा जिवंत बॅकग्राउंड स्कोर कधी अनुभवला नाही मी! सायकल लावण्याचा आवाज, रस्त्यावरून जाणा-या गाड्यांचा आवाज, रात्रीच्या अंधारात अचानक कर्कश आवाज करत गेलेल्या टिटवीचा आवाज अगदी जिवंत आहेत हे सगळे आवाज.कथेमधल्या एखाद्या पात्रासारखा हा बॅकग्राउंड स्कोअर वापरला आहे.
कथा अशी आहे की, गिरीजा ओक-गोडबोले जितेंद्र जोशीला एक मदत मागायला आलेली असते. जर त्याने मदत केली तर तिची नोकरी शाबूत राहणार असते पण, तेच जितेंद्र जोशीची पत्रकारिता तत्त्व मात्र धुळीला मिळणार असतात.
दोघेही ९ वर्षांनी एकमेकांसमोर येतात आणि हळूहळू कथा उलगडत जाते.त्यांच्यामधले वाद, गैरसमज बाहेर येतात.
एकमेकांच्या संसाराबद्दल विचारपूस होते आणि हे सगळं घडत जातं एक बातमी आल्यामुळे.
नाटकातले संवाद अतिशय संवेदनशील आहेत आणि ज्यांना आयुष्यामधे ब्रेक-अप चा अनुभव आला आहे त्यांच्या आतमधलं सगळं ढवळून टाकणारे आहेत. तसंच पत्रकारिता त्या काळातली किंवा आजच्या काळातली ह्यावरही भाष्य केलं आहे.
तिनही पात्रांचे संवाद खूप छान आहेत पण दोन तासांनंतर सगळं खूप जड व्हायला लागतं.एखाद्या वृत्तपत्र कार्यालयामधे किती टेन्शन्स असू शकतात ह्याची चुणूक या नाटकामधून मिळते.
No comments:
Post a Comment