उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी
राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली
लहानपणी आजोबांनी गायलेल्या भूपाळ्यांनी जाग यायची. पहाटेच्या शांत वातावरणात धीरगंभीर आवाजात एका लयीत माझे आजोबा वेगवेगळ्या भूपाळ्या म्हणायचे, खूप मस्त वाटायचं :)
नंतर आमच्याकडे टेपरेकॉर्डर घेतल्यावर भूपाळ्यांची कॅसेट आणली होती ती बहुतेक करून सणा-सुदीला लावली जायची. मध्यंतरी शिक्षणामुळे घर सोडलं आणि भूपाळी ऐकणं वगैरे बंद झालं. आता लग्नानंतर पहाटे उठायला सुरूवात केली तेंव्हा कुठेतरी काहितरी मिसिंग आहे असं वाटलं आणि गुगलून बघितलं तर माझ्या लहानपणी ऐकलेल्या सगळ्या भूपाळ्या सापडल्या :) :)
आता रोज सकाळी माझ्या घरातली पहाट अगदी सुरमयी असते.तर माझ्या आवडीची भूपाळी आहे -
उठि श्रीरामा पहाट झाली
ही भूपाळी माझ्या आवडत्या गायिकेने म्हणजे आशा भोसले ह्यांनी गायली आहे आणि ह्यातले शब्द म्हणाल तर प्रत्येक शब्द इतका चित्रदर्शी आहे की जणू आपण श्रीरामाच्या प्रासादामधे, परिसरामधे उभे राहून सगळं बघत आहोत.
ही भूपाळी ऐकतांना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. कौसल्या माऊली हातामधे चांदीचा कलश घेऊन श्रीरामाच्या खोलीमधे आली आहे.श्रीरामाचं वय साधारण ७-८ वर्षे, तो अगदी गाढ झोपेत आहे.त्याच्या चेह-यावर एक निरागसपणा आणि साखरझोपेमधलं हास्य उमटलं आहे.अगदी कौतुकाने रामाला बघत कौसल्यामाता नाजुक आणि प्रेमाने ओतप्रोत आवाजात गाऊन त्याला जागं करायचा प्रयत्न करत आहे.
उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
उमलली हा शब्द फार सुंदर वाटतो ह्या ओळिमधे.जणू आकाशाचं फुल उमलत आहे आपली एकेक पाकळी बाजुला सारत असा भास होतो :)
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
खोलिच्या सज्जामधे उभी राहून जणू आजुबाजुच्या परिसरामधे घडणा-या घटना आता कौसल्या वर्णन करत आहे.हे सगळं ऐकतांना कुठेतरी वेद ऐकल्याचा पुसटसा भास होतो तर दुस-या ओळीतून जाणवतं की गोठ्यातल्या गायींची वासरं-कालवड त्यांना लुचत आहेत आणि भूपाळी गात जाणारी भाटमंडळी मंदिरासमोरच्या रस्त्याने परतत आहेत असं जाणवतं.
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी
ह्या कडव्यामधे कौसल्यामाता श्रीरामाला चंद्र - सुर्याच्या आवागमनाची गंमत सांगत आहे आणि तितक्यात तिला वसिष्ठ मुनिंची काटकुळी पण तेजःपुंज आकृती मंदिराकडे जातांना दिसत आहे. प्रत्येक ओळीतून आजुबाजूला घडणा-या गोष्टी सांगून श्रीरामाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे.
राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली
शेवटच्या कडव्यातुन ति सांगत आहे की, आता तर दासीपण आल्या आहेत खोलितल्या समया विझवण्यासाठी आणि बाहेर सूर्य पण अगदी झगझगीतपणे आपला प्रकाश पसरवत सगळ्या सृष्टीला जागं करत आहे, आता तरी जागा हो.
ह्या ओळि गातांना आशाबाईंनी 'राजसा' हा शब्द इतका प्रेमाने उच्चारला आहे की जणू कौसल्यामाता श्रीरामाच्या डोक्यावरून हात फिरवत आहे असा भास होतो.
मस्त वाटतं ही भूपाळी ऐकली की :) :)
No comments:
Post a Comment