अगदी मोजक्या पानांचं, छोटेखानी पुस्तक आहे. हातात घेतलं तेंव्हा वाटलं, हं लग्गेच वाचून होईल पण माझा हा भ्रम पहिल्या ४-५ पानातच मोडला.
ह्यामधे गोष्ट तशी आहे पण आणि नाही पण. एका 'साउ' ने नव्याने ओळख झालेल्या एका व्यक्तीशी केलेला पत्रव्यवहार आहे हा. ती व्यक्ती कोण आहे कशी आहे ते शेवटपर्यंत कळालं नाही किंवा कळू दिलं नाही बहुतेक.
सहजगप्पा आहेत पत्रातून व्यक्त केलेल्या पण त्यात कुठेही प्रेम-पत्र अशी छबी उमटत नाही. पत्रव्यवहार जरी एका पुरूषाशी होत असला तरी तो एकमेव प्रेमभावनेच्या भरातला नाही, उलट प्रगल्भ विचारांची सुरेख मांडणी केलेली आहे.
'साउ' ने लिहिलेली ही पत्रं म्हणजे कुठेतरी स्वत:शी संवाद साधला आहे असं जाणवत राहतं. अर्थात फक्त इतकंच नाही त्या मजकूरामधे तर, आजुबाजूला घडणा-या घटनांचे पडसादही आहेत पण गरजेपुरतेच.
काही विचार जरा अवजड झाले मला तरी समजायला, पण ते अपवाद सोडले तर भाषा अगदी सहज-सोपी आहे आणि मुळात एकसंधपणा व्यवस्थित साधला आहे. वाचतांना असं सतत वाटत राहतं की आता तरी 'त्याचं' पत्र दिलेलं असेल पण नाही, वाचकाने 'साउ' च्या पत्रांमधूनच 'त्याला' आणि 'त्याच्या प्रतिसादांना' समजावून घ्यायचं आहे :)
मी अशा पिढीत जन्माला आले जिथे असे पत्रव्यवहार करायची वेळ कधी येऊ शकली नाही पण, हे पत्ररूपी पुस्तक वाचून एक वेगळा अनुभव नक्कीच मिळाला
No comments:
Post a Comment