कादंबरीचा शेवट हा गोडच करावा असा काही नियम आहे का? म्हणजे त्या भास्करच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं आणि तरी पण दोन पानांच्या मजकुरामधे त्याने स्वतःला सावरलं आणि त्याच्या बायकोला 'भोळी' आहे, तिला जग माहीत नाही अशी स्वतःची समजूत घातली आणि सगळं आलबेल झालं??!! इतकं सोपं आणि सरळ ख-या आयुष्यात घडूच शकत नाही!!
मुळात जे स्पष्टीकरण नंदिनीने दिलं आहे तेच फोल वाटलं मला. तिचे विचार नव-याला समजत नव्हते मग तिला राजोपाध्याय भेटला, त्यांच्यामधे वैचारिक पातळीवर जवळीक निर्माण झाली पण मग शरीराने जवळ येतांना कितीही काहीही म्हटलं तरी जर नंदिनीची इच्छा नसती तर तिने पहिल्या क्षणाला त्याला झटकून बाजूला केलं असतं कारण त्याची जबरदस्ती सहन करायला ती काय त्याची बायको नव्हती!!
तिच्या म्हणण्यानुसार तिला मैत्री कुठवर जाऊ शकते हे बघायचं होतं पण वैचारिक पातळीवरुन शारीरिक पातळीवर जर ती जात आहे तर ते सुद्धा एक थ्रिल म्हणून तिने एंजाॅय केलं. फक्त एकदा बघायचं होतं तर पहिल्यांदा घडलं तेंव्हाच तिला प्रचिती येऊन तिची उत्सुकता शमायला हरकत नव्हती पण ते २-३ वेळेस घडलं, याचाच अर्थ तिला ते हवं होतं!
बाकी कथेचा वेग चांगला आहे, अगदी शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की काहीतरी वेगळं समोर येईल पण मग शेवटी भास्कर स्वतःची समजूत घालतो आणि तिला माफ करतो हे जरा घाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे भास्करच्या मनातले विचार आणि समुद्राचं वर्णन ह्याची सांगड छान घातली आहे. तसंच समुद्र, रिसाॅर्ट, किनारा, टेकडी सगळं व्यवस्थितपणे डोळ्यासमोर उभं राहतं, चित्रदर्शी लिखाण आहे अगदी.
No comments:
Post a Comment