आज कित्येक वर्षांनी गिरणीत जाऊन काही दळून आणायचा प्रसंग आला आणि तिथल्या ताज्या ताज्या गरम पिठाच्या वासाने एका क्षणात मी लहानपणात पोहोचले :) मला आठवतं मी कदाचित पहिली-दुसरीमधे असल्यापासून आईसोबत दळण आणायला जायचे.गिरणी मधे काम करणारा माणूस अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत पिठामुळे पांढरा झालेला असायचा, अगदी त्याच्या पापणीच्या केसांवरही पिठ लागलेलं बघितल्याचं आठवतं मला :D सुरूवातीला आईसोबत जाऊन एखाद्या छोट्या डब्यात थोडंसं पीठ आणायचे मग हळूहळू डब्याचा आकार आणि त्यातलं धान्य वाढत गेलं.गरम-गरम पिठाचा डबा उचलून चालत घरी जाणं म्हणजे दिव्य कसरत असायची पण त्यातही आपण आईला मदत करत आहोत ह्याचं एक वेगळं समाधान आणि आनंद असायचा :)
गिरणीमधे येणारा एका लयीतला तो पट्ट्याचा चट् चट् आवाज अजून आठवतो, वेगवेगळ्या आकाराचे-प्रकाराचे डबे ओळीत ठेवलेले असायचे. काही पिशव्यांसकट असायचे तर काही नुसत्याच प्लास्टिकच्या पिशव्या असायच्या. कधी जर थालिपिठाची भाजणी किंवा चकलीचं मिश्रण दळायला असेल तर खमंग वास यायचा.एका गिरणीमधे तर 'आम्ही इथे काम करणा-या माणसाला पगार देतो, उगाच टिप देऊ नये' अशी पुणेरी पाटी बघितल्याचं पण माझ्या लक्षात आहे :D :D आई सुरूवातीला सांगायची किती किलो धान्य दिलं आहे आणि तिथे गेल्यावर त्या माणसाला सांगून नीट हिशोब करुन पैसे दे वगैरे, मग गिरणीत गेलं की किलोला किती पैसे ते बघून हाताच्या बोटावर मोजत हिशेब करायचा आणि तितकेच पैसे बरोबर उजव्या हाताच्या मुठीत ठेऊन दळण मिळायची वाट बघायची :) शक्यतो डबा ठेऊन कुठे जायचं नाही असं आईने बजावलेलं असायचं नाहीतर तो माणूस खाली सांडलेलं किंवा दुस-या कोणाचं पीठ आपल्या डब्यात भरून देईल ह्या सुचना आठवल्या की आता हसायला येतं, पण एकूण अशी सगळी मजा होती तेंव्हा.माहित नाही हल्ली लहान मुलांना असली कामं करायचा प्रसंग येतो की नाही ते,असो.
दळण घेऊन येणे हा कार्यक्रम तसा माहिन्यातून १-२वेळेस असायचा पण त्याहीपेक्षा धान्य निवडणे हा भाग महत्त्वाचा होता. विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी लागली की नविन वर्षासाठी धान्य घेऊन, उन्हात वाळवून आणि मग स्वच्छ करुन साठवलं जायचं. त्यात सगळ्यात वेळखाऊ आणि किचकट काम असायचं धान्य निवडणे!
गहू, ज्वारी वगैरे धान्य आई चाळून स्वच्छ करुन द्यायची आणि आम्ही परात किंवा मोठ्ठं ताट घेऊन ते निवडायचो मग वेगवेगळ्या प्रकारचे खडे, गारगोटी सारखे पण गव्हाळ रंगाचे तुकडे सापडायचे.एका वर्षी तर कानाच्या आकाराचं कसलं तरी बी आलेलं गव्हामधे ;) कै च्या कै :)
धान्य निवडण्यामधे पण दोन-तीन इटरेशन्स असायचे, आधी मोठ्या आकाराचा गहू - जो रोजच्या खाण्यासाठी वापरला जायचा. मग त्याला चाळल्यावर खाली पडणारा लहान आकाराचा गहू - हा गहू इतर काही पदार्थ बनवायला वापरला जातो आणि शेवटी जे काही उरेल ते चिमण्यांना खाऊ म्हणून, असं वेगवेगळ्या टप्प्यांमधे काम चालायचं!
आता तर निवडलेलं धान्य मिळतं दुकानामधे आणि त्याही उपर म्हणजे तयार पिठ मिळतं.मी स्वतः आज कित्येक वर्ष तयार/रेडी टू ईट आट्टाच घेत आहे. वेळेअभावी धान्य निवडणं, दळण आणणं ही कामं जमत नाहीत निदान मला तरी, पण अजूनही माझ्या आई-ताईकडे ह्याच पद्धती चालू आहेत.
वेळेअभावी अशा ब-याच स्वस्त पण पौष्टिक पर्यायांना मी मुकत आहे असं आज जाणवलं,हम्म विचार तर चालू आहे बघू काही सुवर्णमध्य काढता येतो का#आठवणी_लहानपणाच्या
Sunday, May 28, 2017
Monday, May 15, 2017
मृत्यू???
What if you die d moment you said - मी काय मरणार नाही आज!!
काय काय करायचं राहून गेलं असं वाटेल? आत्ता ह्या क्षणी फक्त एका व्यक्तीला भेटायचं राहून गेलं ही खंत नक्कीच मनात राहील असं वाटलं आणि कडा पाणावल्या..माझ्या मागे आहे का काही असं की जे आठवेल लोकांना? माझ्या म्हणवणा-या कोणाला माझी उणीव खरंच कुठल्याही स्वार्थाशिवाय जाणवेल का? की मी फक्त अमूक एक काहीतरी नकारार्थी विशेषण असणारी असेन!!
जन्माची प्रक्रिया माणसाला माहित आहे पण मृत्यू? ?किती गृहीत धरलंय आपण त्याला आणि कित्ती आत्मविश्वास आहे आपल्याला की तो इतक्यात भेटायला येणारच नाही म्हणून!!
कदाचित तोच 'काळ' आहे जो आपल्या खात्यातल्या प्रत्येक क्षणाचं मोजमाप करतोय..सतत..आणि आपण अनभिज्ञ आहोत किंवा जगण्याच्या गराड्यात त्याला विसरून गेलो आहोत. कुठल्याही क्षणी कोणत्याही स्वरूपात तो आपल्या समोर येऊ शकतो किंवा क्वचित प्रसंगी दर्शन पण देऊन जातो पण मग आपली त्याला सामोरं जायची तयारी आहे? तुम्ही म्हणाल मला वेड लागलं आहे, असं मृत्यू येईल म्हणून कोणी तयारी करून ठेवेल का किंवा अशी तयारी खरंच करणं शक्य आहे का? मन धजावेल असं काही करायला???हूह नाही माहित! सकाळी सकाळी इतका जड विचार पचवतात येत नाही पण कधी ना कधी ह्याबाबतीत पण प्रत्येकाने विचार करायलाच हवा ना.
आर्थिक बाजू म्हणजे तुमच्यावर असणा-या पैशाशी संबंधित जबाबदाऱ्या हा एक मुद्दा झाला पण तुमच्यावर भावनिकरित्या अवलंबून असणा-या व्यक्ती नाही नाही तुम्ही कोणावर भावनिकरित्या अवलंबून आहात का? तसं असेल तर खरंच जीव मोकळा होईल? कोणी बघितलं खरंच काय होतं ह्या सगळ्या भाव-भावनांचं एकदा श्वास संपला की!!
खूप विचित्र पण गूढ आहे नं माणसासाठी आजही हा विषय...
Friday, May 12, 2017
त्रयस्थ शांतता
काही प्रसंग घडतातच असे की आपण एका विचित्र अवस्थेत जातो.आपलं म्हणवणारं माणूस आपल्याला दुखावतं आणि ती जखम इतकी खोलवर होते की आपण चक्रावून जातो, जे घडलं आहे ते आपल्या आकलनापलिकडचं मुळात आपल्या अपेक्षेपलिकडचं असतं. आपल्या मनातली त्या व्यक्तीची प्रतिमा तेंव्हा हादरून जाते. तू?? शक्यच नाही इथून मनामधे प्रश्नांचं काहूर उठतं आणि मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती इथवर येऊन मेंदू थकून जातो. जे समोर आलं आहे हे वास्तव भयंकर असतं जे एकवेळ बुद्धीला कळतं पण मन मात्र विचारांच्या भोव-यात अडकून गरगरा फिरतच राहतं, नाही कळत त्याला की ह्या भोव-यातून बाहेर कसं यायचं आक्रंदन चालू होतं त्याचं
पण तेंव्हाही त्या प्रिय व्यक्तीला ह्या गोष्टी कळणार नाहीत आणि त्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी पण कुठेतरी सतत चालू असते.
अशा संभ्रमित करणा-या चमत्कारिक परिस्थितीत मन कुठेतरी बंड करुन उठतं की नको मला ती व्यक्ती आता माझ्या नजरेसमोरदेखील, सहनशक्तीच्या बाहेर आहे हे सगळं माझ्या!!
पण काहीच मनासारखं घडत नाही, ना ती व्यक्ती आपल्या नजरेसमोरून जाते ना आपण तिला मनातून कायमचं काढून टाकू शकतो :( मग ह्या सगळ्याचं पर्यावसन एका विचित्र गोष्टीत होतं- ती व्यक्ती अगदी अनोळखी, ति-हाईत वाटायला लागते, आपण जणू अजिबातच ओळखत नाही समोरच्याला असं बुद्धीलाही वाटायला लागतं आणि एकदा का समोरचा अनोळखी आहे असं मनाने पण मानलं की मग विषयच संपतो आणि त्या दोघांमधे एक त्रयस्थ शांतता पसरते पुढचा काही काळ-दिवस क्वचित महिने सुद्धा :'(
Subscribe to:
Posts (Atom)