Friday, May 12, 2017

त्रयस्थ शांतता

काही प्रसंग घडतातच असे की आपण एका विचित्र अवस्थेत जातो.
आपलं म्हणवणारं माणूस आपल्याला दुखावतं आणि ती जखम इतकी खोलवर होते की आपण चक्रावून जातो, जे घडलं आहे ते आपल्या आकलनापलिकडचं मुळात आपल्या अपेक्षेपलिकडचं असतं. आपल्या मनातली त्या व्यक्तीची प्रतिमा तेंव्हा हादरून जाते. तू?? शक्यच नाही इथून मनामधे प्रश्नांचं काहूर उठतं आणि मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती इथवर येऊन मेंदू थकून जातो. जे समोर आलं आहे हे वास्तव भयंकर असतं जे एकवेळ बुद्धीला कळतं पण मन मात्र विचारांच्या भोव-यात अडकून गरगरा फिरतच राहतं, नाही कळत त्याला की ह्या भोव-यातून बाहेर कसं यायचं आक्रंदन चालू होतं त्याचं
पण तेंव्हाही त्या प्रिय व्यक्तीला ह्या गोष्टी कळणार नाहीत आणि त्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी पण कुठेतरी सतत चालू असते.
अशा संभ्रमित करणा-या चमत्कारिक परिस्थितीत मन कुठेतरी बंड करुन उठतं की नको मला ती व्यक्ती आता माझ्या नजरेसमोरदेखील, सहनशक्तीच्या बाहेर आहे हे सगळं माझ्या!!
पण काहीच मनासारखं घडत नाही, ना ती व्यक्ती आपल्या नजरेसमोरून जाते ना आपण तिला मनातून कायमचं काढून टाकू शकतो :( मग ह्या सगळ्याचं पर्यावसन एका विचित्र गोष्टीत होतं- ती व्यक्ती अगदी अनोळखी, ति-हाईत वाटायला लागते, आपण जणू अजिबातच ओळखत नाही समोरच्याला असं बुद्धीलाही वाटायला लागतं आणि एकदा का समोरचा अनोळखी आहे असं मनाने पण मानलं की मग विषयच संपतो आणि त्या दोघांमधे एक त्रयस्थ शांतता पसरते पुढचा काही काळ-दिवस क्वचित महिने सुद्धा :'(

No comments:

Post a Comment