Sunday, May 28, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - पिठाची गिरणी

आज कित्येक वर्षांनी गिरणीत जाऊन काही दळून आणायचा प्रसंग आला आणि तिथल्या ताज्या ताज्या गरम पिठाच्या वासाने एका क्षणात मी लहानपणात पोहोचले :) मला आठवतं मी कदाचित पहिली-दुसरीमधे असल्यापासून आईसोबत दळण आणायला जायचे.गिरणी मधे काम करणारा माणूस अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत पिठामुळे पांढरा झालेला असायचा, अगदी त्याच्या पापणीच्या केसांवरही पिठ लागलेलं बघितल्याचं आठवतं मला :D सुरूवातीला आईसोबत जाऊन एखाद्या छोट्या डब्यात थोडंसं पीठ आणायचे मग हळूहळू डब्याचा आकार आणि त्यातलं धान्य वाढत गेलं.गरम-गरम पिठाचा डबा उचलून चालत घरी जाणं म्हणजे दिव्य कसरत असायची पण त्यातही आपण आईला मदत करत आहोत ह्याचं एक वेगळं समाधान आणि आनंद असायचा :)

गिरणीमधे येणारा एका लयीतला तो पट्ट्याचा चट् चट् आवाज अजून आठवतो, वेगवेगळ्या आकाराचे-प्रकाराचे डबे ओळीत ठेवलेले असायचे. काही पिशव्यांसकट असायचे तर काही नुसत्याच प्लास्टिकच्या पिशव्या असायच्या. कधी जर थालिपिठाची भाजणी किंवा चकलीचं मिश्रण दळायला असेल तर खमंग वास यायचा.एका गिरणीमधे तर 'आम्ही इथे काम करणा-या माणसाला पगार देतो, उगाच टिप देऊ नये' अशी पुणेरी पाटी बघितल्याचं पण माझ्या लक्षात आहे :D :D आई सुरूवातीला सांगायची किती किलो धान्य दिलं आहे आणि तिथे गेल्यावर त्या माणसाला सांगून नीट हिशोब करुन पैसे दे वगैरे, मग गिरणीत गेलं की किलोला किती पैसे ते बघून हाताच्या बोटावर मोजत हिशेब करायचा आणि तितकेच पैसे बरोबर उजव्या हाताच्या मुठीत ठेऊन दळण मिळायची वाट बघायची :) शक्यतो डबा ठेऊन कुठे जायचं नाही असं आईने बजावलेलं असायचं नाहीतर तो माणूस खाली सांडलेलं किंवा दुस-या कोणाचं पीठ आपल्या डब्यात भरून देईल ह्या सुचना आठवल्या की आता हसायला येतं, पण एकूण अशी सगळी मजा होती तेंव्हा.माहित नाही हल्ली लहान मुलांना असली कामं करायचा प्रसंग येतो की नाही ते,असो.

दळण घेऊन येणे हा कार्यक्रम तसा माहिन्यातून १-२वेळेस असायचा पण त्याहीपेक्षा धान्य निवडणे हा भाग महत्त्वाचा होता. विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी लागली की नविन वर्षासाठी धान्य घेऊन, उन्हात वाळवून आणि मग स्वच्छ करुन साठवलं जायचं. त्यात सगळ्यात वेळखाऊ आणि किचकट काम असायचं धान्य निवडणे!
गहू, ज्वारी वगैरे धान्य आई चाळून स्वच्छ करुन द्यायची आणि आम्ही परात किंवा मोठ्ठं ताट घेऊन ते निवडायचो मग वेगवेगळ्या प्रकारचे खडे, गारगोटी सारखे पण गव्हाळ रंगाचे तुकडे सापडायचे.एका वर्षी तर कानाच्या आकाराचं कसलं तरी बी आलेलं गव्हामधे ;) कै च्या कै :)
धान्य निवडण्यामधे पण दोन-तीन इटरेशन्स असायचे, आधी मोठ्या आकाराचा गहू - जो रोजच्या खाण्यासाठी वापरला जायचा. मग त्याला चाळल्यावर खाली पडणारा लहान आकाराचा गहू - हा गहू इतर काही पदार्थ बनवायला वापरला जातो आणि शेवटी जे काही उरेल ते चिमण्यांना खाऊ म्हणून, असं वेगवेगळ्या टप्प्यांमधे काम चालायचं!
आता तर निवडलेलं धान्य मिळतं दुकानामधे आणि त्याही उपर म्हणजे तयार पिठ मिळतं.मी स्वतः आज कित्येक वर्ष तयार/रेडी टू ईट आट्टाच घेत आहे. वेळेअभावी धान्य निवडणं, दळण आणणं ही कामं जमत नाहीत निदान मला तरी, पण अजूनही माझ्या आई-ताईकडे ह्याच पद्धती चालू आहेत.
वेळेअभावी अशा ब-याच स्वस्त पण पौष्टिक पर्यायांना मी मुकत आहे असं आज जाणवलं,हम्म विचार तर चालू आहे बघू काही सुवर्णमध्य काढता येतो का
#आठवणी_लहानपणाच्या

No comments:

Post a Comment