तर आज आहे राणीच्या देशातला सगळ्यात मोठ्ठा आणि एकमेव सण. जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदाने भारलेलं वातावरण आहे. रस्ते, दुकानं उत्साही माणसांच्या जत्थ्याने ओसंडून वाहत आहेत.घरांवर, बागेमधे आकर्षक रोषणाई केलेली आहे.
जवळपास महिनाभर आधीपासुन 'ख्रिसमस' चा माहोल घरा-घरातून ते अगदी आॅफिस मधे सुध्दा अनुभवायला मिळतो.
दिवसा भलेही ढगाळ वातावरण असेना का पण संध्याकाळ आणि रात्र मात्र अतिशय प्रकाशमान झालेली आहे.
डिसेंबर महिन्यातली गारठवणारी थंडी ह्या सणाच्या निमित्ताने मात्र प्रफुल्लित करणारी वाटायला लागली आहे.
लहान मुलांना जितका उत्साह असतो त्यापेक्षा कणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या लोकांना आणि त्यापेक्षा मणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या म्हणजे आजी-आजोबा जनरेशनला असतो असं मला जाणवलं. सांताबाबाच्या टोपीपासून ते अगदी सुटा-बुटापर्यंतचे कपडे परिधान करुन वावरायची जणू साथ येते.आॅफिसमधे सुद्धा रोजच्या करड्या ब्रिटिश शिस्तीचे कपडे घालून येण्याच्या नियमाला आपसूक बगल देऊन 'ख्रिसमस jumpers' ची रेलचेल वाढायला लागते.
घरी-दारी ख्रिसमस स्पेशल केक्स, चाॅकलेट्स, mince pie या पदार्थांची लयलूट सुरु होते. ओळखीच्या-पाळखीच्या,शेजार-पाजारच्या पासून ते अगदी दूरदेशी राहणाऱ्या नातेवाईकांना स्वहस्ते सजवलेली ग्रिटींग कार्ड्स आवर्जून पाठवली जातात.
रेस्टॉरंटमध्ये, हाॅटेल्स मधे 'ख्रिसमस स्पेशल लंच/डिनर' चे बोर्ड्स दिसायला लागतात. वर्षातून एकदा का होईना पण जे काही 'कुटुंब' असेल ते लोक एकत्र येऊन अशा स्पेशल लंच/डिनरचा आस्वाद घेतात.
हा झाला स्वतः च्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा एक भाग पण ह्यासोबतच इथली जनता जे बेघर आहेत, ज्यांना कोणत्याही कारणांमुळे ह्या सणाचा आनंद उपभोगता येणार नाही अशा लोकांसाठी सुध्दा सर्वतोपरी मदत करते.
काही लोक स्वतःच्या घरी अशा लोकांना आवर्जून जेवायला बोलावतात.शेजा-यांपैकी जर कोणी एकटा-दुकटा असेल तर त्याला स्वतःच्या कुटुंबाचा एक सदस्य समजून उत्सवात सामावून घेतात. सुपरमार्केट्स जरी बंद असली तरी गरजू लोकांना खाऊ म्हणून मूलभूत गोष्टी मुबलक प्रमाणात दुकानाबाहेर चकटफू ठेवलेल्या असतात.
हाॅटेल्स देखील अशा वेळेस 'फ्री लंच/डिनर' देऊ करतात.
एकूणात काय तर आपल्यासारखंच प्रत्येकाला या एकमेव सणाचा आनंद लुटता यावा यासाठी इथला प्रत्येक नागरिक सजग वाटतो आणि वागतोही 😊 😊
Wednesday, December 25, 2019
Friday, December 13, 2019
#मुक्कामपोस्टUK : कॅब
आज घरी येतांना कॅबचा ड्रायव्हर पंजाबी होता. माझ्या नावावरून त्याने ताडलं की मी भारतीय किंवा भारतातून आले आहे. आत बसल्या बसल्या त्याने विचारलं are you from India?' मी हसून हो म्हणाले आणि संभाषणाला सुरूवात झाली.
साहजिकच मी त्यालाही विचारलं की तू पण भारतीय आहेस का, तर कळालं त्याचे आजोबा भारतीय आहेत आणि ६०-७० वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झाले मग ही त्यांची तिसरी पिढी वगैरे.
मी जिथे काम करते तिथे या आधीही बरीच मंडळी भारतातून कामानिमित्त येऊन गेल्याची माहितीही त्याने मला दिली. त्यानंतरचा अपेक्षित प्रश्न की मी इथे नेमकं काय काम करते, मी त्याला कळेल असं सुटसुटीत उत्तर दिलं.म्हणजे मी काही फार जगावेगळं काम करते किंवा अगदीच जटिल स्वरुपातलं करते असं नाही काही. पण आपल्याला कौतुक असतं नं जे काम करतो त्याबद्दल (निदान मला तरी आहेच 😌) त्यामुळे थोडंसं असं नाक उडवत वग्रै 😁
हां तर, असा मायदेशाशी निगडीत कोणीही माणूस इथे यूके मधे भेटला की मला अगदी छान वाटतं बाई आणि समोरचा जर गप्पीष्ट असेल तर मग तर बघायलाच नको, माझ्या बडबडीला जणू ऊधानच येतं 😄 😄
आमचं संभाषण आता मस्त रंगायला लागलं होतं त्यातून कळालं, त्याचा कोणी मित्र चेन्नईचा आहे. ते दोघे प्रोजेक्ट पार्टनर्स आहेत आणि त्याच्या निमित्ताने का होईना हा पठ्ठ्या भारतात जायला सुरूवात झाली.
मी म्हटलं काय शिकता तुम्ही? तो म्हणाला
Quantum physics आणि नुकताच ISRO सोबत एक छोटा प्रोजेक्ट पूर्ण केला.
मी - क क्काय 😳 😳 ?? Oh woww 😃👍👍
तो - शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आणि अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी टॅक्सी चालवतो.
पुढे आम्ही भारताबद्दलच्या शक्य तितक्या गोष्टींबद्दल बोललो; माझं घर आले मी उतरले, तो निघून गेला.पण त्याचं शिक्षण, असं काम करणं आणि तरीही इतकं निगर्वी वागणं हे कुठेतरी मनात रेंगाळत राहिलं..
#मुक्कामपोस्टUK
Tuesday, December 3, 2019
अलिप्तता
कमळाच्या पानासारखं मेणाचं कवच स्वतःच्या मनाला चढवायची इच्छा हल्ली सतत होते, जेणेकरून आजूबाजुला घडणाऱ्या वाईट आणि चांगल्या गोष्टींचा सुद्धा मनाला स्पर्शच नको व्हायला..
अलिप्तपणे राहता यायला हवं कोणी कोणत्याही गोष्टीबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया कानांवर आदळूनही!
पण नको नको म्हणतांना सुद्धा मनाचे कान अती तिखट आहेत, डोळे सताड उघडे आहेत आणि त्याची बुद्धी तर नको तितकी तीक्ष्ण आहे🤦 जे जे म्हणून ऐकायला, बघायला आणि लक्षात ठेवायला नको तेच बरोब्बर केलं जातं मनाकडून. आणि एकदा करुन त्याचं पोट भरत नाही तर नको त्या वेळी नको तिथे त्याची उजळणी करायची आणि मग डोळे तयारच असतात त्याबरहुकूम भरून यायला 😒😣😣
म्हणून आताशा सतत हाच विचार येतो की मन नावाच्या या दुष्ट प्राण्याला असं गुळगुळीत प्लास्टिकचं आवरण घालून टाकायचं म्हणजे जे आत आहे त्यात अजून भर पडणार नाही.
मात्र त्याचसोबत असंही काही तंत्र सापडायला हवं जेणेकरून जुनेरी सगळी अगदी पाळा-मुळांसकट उपटून टाकता यायला हवी. मग मात्र लगेचच अशा नितळ, स्वच्छ मनाला त्या प्लॅस्टिक च्या आवरणात झक्कपैकी बंद करून अगदी माळ्यावर टाकून द्यायचं अडगळीत,कायमचं!!!
यामुळे काय होईल तर ऊठ-सूट जो त्रास होतो नं मनाच्या भोचकपणाचा तो संपून जाईल!!
ना कसला त्रास जाणवेल ना कसला आनंद..तेंव्हा कदाचित अशी तरल अलिप्तता ह्या 'आयुष्य' नावाच्या दिव्यातून तरुन जायला उपयोगी पडेल...
#triggeringthoughts
Subscribe to:
Posts (Atom)