तर आज आहे राणीच्या देशातला सगळ्यात मोठ्ठा आणि एकमेव सण. जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदाने भारलेलं वातावरण आहे. रस्ते, दुकानं उत्साही माणसांच्या जत्थ्याने ओसंडून वाहत आहेत.घरांवर, बागेमधे आकर्षक रोषणाई केलेली आहे.
जवळपास महिनाभर आधीपासुन 'ख्रिसमस' चा माहोल घरा-घरातून ते अगदी आॅफिस मधे सुध्दा अनुभवायला मिळतो.
दिवसा भलेही ढगाळ वातावरण असेना का पण संध्याकाळ आणि रात्र मात्र अतिशय प्रकाशमान झालेली आहे.
डिसेंबर महिन्यातली गारठवणारी थंडी ह्या सणाच्या निमित्ताने मात्र प्रफुल्लित करणारी वाटायला लागली आहे.
लहान मुलांना जितका उत्साह असतो त्यापेक्षा कणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या लोकांना आणि त्यापेक्षा मणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या म्हणजे आजी-आजोबा जनरेशनला असतो असं मला जाणवलं. सांताबाबाच्या टोपीपासून ते अगदी सुटा-बुटापर्यंतचे कपडे परिधान करुन वावरायची जणू साथ येते.आॅफिसमधे सुद्धा रोजच्या करड्या ब्रिटिश शिस्तीचे कपडे घालून येण्याच्या नियमाला आपसूक बगल देऊन 'ख्रिसमस jumpers' ची रेलचेल वाढायला लागते.
घरी-दारी ख्रिसमस स्पेशल केक्स, चाॅकलेट्स, mince pie या पदार्थांची लयलूट सुरु होते. ओळखीच्या-पाळखीच्या,शेजार-पाजारच्या पासून ते अगदी दूरदेशी राहणाऱ्या नातेवाईकांना स्वहस्ते सजवलेली ग्रिटींग कार्ड्स आवर्जून पाठवली जातात.
रेस्टॉरंटमध्ये, हाॅटेल्स मधे 'ख्रिसमस स्पेशल लंच/डिनर' चे बोर्ड्स दिसायला लागतात. वर्षातून एकदा का होईना पण जे काही 'कुटुंब' असेल ते लोक एकत्र येऊन अशा स्पेशल लंच/डिनरचा आस्वाद घेतात.
हा झाला स्वतः च्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा एक भाग पण ह्यासोबतच इथली जनता जे बेघर आहेत, ज्यांना कोणत्याही कारणांमुळे ह्या सणाचा आनंद उपभोगता येणार नाही अशा लोकांसाठी सुध्दा सर्वतोपरी मदत करते.
काही लोक स्वतःच्या घरी अशा लोकांना आवर्जून जेवायला बोलावतात.शेजा-यांपैकी जर कोणी एकटा-दुकटा असेल तर त्याला स्वतःच्या कुटुंबाचा एक सदस्य समजून उत्सवात सामावून घेतात. सुपरमार्केट्स जरी बंद असली तरी गरजू लोकांना खाऊ म्हणून मूलभूत गोष्टी मुबलक प्रमाणात दुकानाबाहेर चकटफू ठेवलेल्या असतात.
हाॅटेल्स देखील अशा वेळेस 'फ्री लंच/डिनर' देऊ करतात.
एकूणात काय तर आपल्यासारखंच प्रत्येकाला या एकमेव सणाचा आनंद लुटता यावा यासाठी इथला प्रत्येक नागरिक सजग वाटतो आणि वागतोही 😊 😊
No comments:
Post a Comment