Tuesday, December 3, 2019

अलिप्तता

कमळाच्या पानासारखं मेणाचं कवच स्वतःच्या मनाला चढवायची इच्छा हल्ली सतत होते, जेणेकरून आजूबाजुला घडणाऱ्या वाईट आणि चांगल्या गोष्टींचा सुद्धा मनाला स्पर्शच नको व्हायला.. अलिप्तपणे राहता यायला हवं कोणी कोणत्याही गोष्टीबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया कानांवर आदळूनही!
पण नको नको म्हणतांना सुद्धा मनाचे कान अती तिखट आहेत, डोळे सताड उघडे आहेत आणि त्याची बुद्धी तर नको तितकी तीक्ष्ण आहे🤦 जे जे म्हणून ऐकायला, बघायला आणि लक्षात ठेवायला नको तेच बरोब्बर केलं जातं मनाकडून. आणि एकदा करुन त्याचं पोट भरत नाही तर नको त्या वेळी नको तिथे त्याची उजळणी करायची आणि मग डोळे तयारच असतात त्याबरहुकूम भरून यायला 😒😣😣
म्हणून आताशा सतत हाच विचार येतो की मन नावाच्या या दुष्ट प्राण्याला असं गुळगुळीत प्लास्टिकचं आवरण घालून टाकायचं म्हणजे जे आत आहे त्यात अजून भर पडणार नाही. मात्र त्याचसोबत असंही काही तंत्र सापडायला हवं जेणेकरून जुनेरी सगळी अगदी पाळा-मुळांसकट उपटून टाकता यायला हवी. मग मात्र लगेचच अशा नितळ, स्वच्छ मनाला त्या प्लॅस्टिक च्या आवरणात झक्कपैकी बंद करून अगदी माळ्यावर टाकून द्यायचं अडगळीत,कायमचं!!!
यामुळे काय होईल तर ऊठ-सूट जो त्रास होतो नं मनाच्या भोचकपणाचा तो संपून जाईल!!
ना कसला त्रास जाणवेल ना कसला आनंद..तेंव्हा कदाचित अशी तरल अलिप्तता ह्या 'आयुष्य' नावाच्या दिव्यातून तरुन जायला उपयोगी पडेल...
#triggeringthoughts

No comments:

Post a Comment