Thursday, August 15, 2019

माई

माई..आमची गोड, क्यूटशी हसरी आज्जी..वयाच्या पंचाहत्तरी नंतरही ipad अगदी सहज हाताळू शकणारी अशी स्मार्ट 😁 आणि संत्री गोळ्या,चाॅकलेट्स वगैरे दिलं की आवडीने खाणारी अशी तिच्या नातू-पणतूंपेक्षा पण लहान वयाची 😄 😄
तिचा उत्साह आम्हा नातवंडांना पण लाजवेल असा होता.
तिला खूप गाणी पाठ होती,सणा-सुदीच्या-मंगलकार्याच्या प्रसंगी अगदी सुरात गायची. 'रमला कुठे गं कान्हा, बाई तिन्हीसांजा झाल्या' हे तिचं सर्वात आवडतं गाणं..मनात आलं की ती सतत गुणगुणत असायची..माझ्या लहानपणी शाळेच्या प्रत्येक सुट्टीत मी आजोळी जायचे. तिथे गेल्यावर जी धमाल यायची त्याची सर कोणत्याच गोष्टीला नाही.
तिच्याजवळ गोष्ट सांग म्हणून हट्ट केला की 'खडकावरच्या कोथिंबीरची' गोष्ट सांगितल्याचं मला अजूनही आठवतं 😄 😄
ती घरातली सगळ्यात मोठी सून त्यामुळे अगदी वयाच्या बाराव्या वर्षी लग्न होऊन आली तेंव्हापासूनच जबाबदारी अंगावर घेत-घेत मोठी झाली. माझ्या आजोबांचं कुटुंब म्हणजे मोठं खटलं होतं.आजोबांना तीन लहान भाऊ आणि दोन बहिणी,सासू आणि शेतात राबणारे गडी इतकी घरातली माणसं यासोबतच येणारे-जाणारे,शेजारी,भावकीतले अगणित लोक. सण-वार, सोवळं-वोवळं सगळं जिथल्या तिथे करत तिने कुटुंबाचा डोलारा सांभाळला. आजोबा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात उतरले तेंव्हा आजीनेच घरच्या सर्व लढाया सांभाळल्या.
तिला प्रत्येक गोष्टीची आवड होती. वर्तमानपत्रं,पुस्तकं जे समोर असेल ते ती वाचायची. टी.व्ही., सिनेमा, नाटक असू देत किंवा कुठे फिरायला जाणं असू देत, सगळ्यांच्या आधी तयार होऊन ती आनंद लुटायला बाहेर पडायची.
घरातल्या छोट्या-मोठ्या सणा-समारंभात तिच्याशिवाय पान हलायचं नाही कधी आमचं. ती आहे म्हणजे सगळं सुरळीतच होणार हा विश्वास प्रत्येकाला असायचा.
तिच्या सगळ्या छान सवयींपैकी सगळ्यात बेस्ट सवय म्हणजे तिने वेळ कधीही वाया घालवला नाही. सगळी कामं झाल्यावर टिवल्या-बावक्या करण्यापेक्षा हातवाती वळणं किंवा देवाला नैवेद्यासाठी लागणारं शेवयांसारखा एक पदार्थ असतो तो हातावर वळून ठेवणं,धान्य निवडणं असं सतत काहीबाही करतच असायची.
वयोमानानुसार तिला काही व्याधी जडल्या, दात काढून कृत्रिम दात म्हणजे कवळी/बचळी 😜 बसवावी लागली.तिचे ते कृत्रिम दात आम्हा एकाही नातवंडाला आवडायचे नाही, भेटल्यावर आधी तिला ते काढायला लावायचो मग ती अगदीच एखाद्या लहान बाळासारखी दिसायची आणि तोंडभरुन हसायची 😍 😍 😍 😍
पण सात वर्षांपूर्वी आजोबा देवाघरी गेल्यावर मात्र तिची तब्येत ढासळायला सुरूवात झाली 😢 शेवटी शेवटी तर तिचं बोलणं समजेनासं झालं पण तिची स्मृती अगदी शाबूत होती. भेटल्यावर अगदी तश्शीच गोड हसायची आणि तिचे डोळे आनंदाने लुकलुकायचे..
पण..काळाने शेवटी त्याचं काम चोख बजावलं आणि तिलापण आमच्यापासून हिरावून घेतलं..तिच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही..कधीच नाही..
आमचं आजोळच आता हरपलं 😟😞😓😭😭😭😭

No comments:

Post a Comment