'मेरा नाम अमोल है| मेरी माँ को अमोल पालेकर बहोत पसंद है तो जब उनको बेटा याने मैं पैदा हुआ तो उन्होंने मेरा नाम अमोल
रख दिया| अब जिसका नाम ही 'अमोल' हो वो भला मिडलक्लास से बाहर कैसे आ सकता है!!!'
हे ऐकलं की असं वाटतं त्या बोलणाऱ्याच्या आणि त्या ओळी लिहिणाऱ्याच्या कानाखाली चांगला जाळ काढावा!!
लाज कशी वाटत नाही स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आई-बापावर फोडायला आणि परत टिक्कोजीरावसारखं वर तोंड करुन बोलायला 😤
ह्या ओळी मी ब-याचदा 'रेडिओ मिर्ची' च्या चॅनेलवर ऐकते आणि विचार येतो त्या माणसाला जर इतकाच त्रास आहे अमोल नावाचा आणि लाज वाटते मिडलक्लास असण्याची तर घ्यावं बदलून नाव! पण! तसं जर केलं तर मग स्वतःत नसलेल्या कर्तृत्वासाठी जबाबदार कोणाला ठरवणार ना!
खूप सोपं असतं कोणत्याही गोष्टीसाठी दुस-याला जबाबदार धरणं. विशेषतः आई-बापाला दूषणं देणं तर सगळ्यात सोप्पं आहे. कारण ते आई-बाप असतात आणि वयात आलेल्या पण 'समजदार??' पोराला/पोरीला त्याबद्दल बोलूच शकत नाहीत!!
किती क्षुल्लक गोष्टींपासून ते आयुष्यातल्या अगदी मोठ-मोठ्या चुकांसाठी आपण त्यांना जबाबदार धरतो 😢
जरा विचार करुन स्वतः मधे डोकावलं तर आपल्याला प्रत्येकाला असे प्रसंग सापडतील जेंव्हा नकळतपणे आई-बाबांना आरोपी ठरवून आपण मोकळे झालो आहोत.
अर्थात फक्त आई-बाबाच असं नाही तर बहुतेक वेळा आपल्या वाट्याला आलेल्या कोणत्याही अपयशासाठी आपण स्वतःपेक्षा इतर कोणा व्यक्तीला किंवा परिस्थितीला नाहीतर 'नशिबाला' दोष देतोच देतो.
स्वतः घेतलेल्या निर्णयांमुळे जर वाईट परिणामांना सामोरं जावं लागलं तर आपल्यातले बहुतेकजण कोणातरी दुस-यामुळेच हे घडलं किंवा परिस्थितीच कशी या सगळ्याला जबाबदार आहे असं रडगाणं गायला लागतो.
निर्णय घेतांना भलेही तुम्ही चार जणांना विचारलं असेल पण करतांना शेवटी स्वतःचंच डोकं वापरलं ना? मग होणाऱ्या परिणामांना भोगायची तयारी पण नको का ठेवायला??
पण नाही! त्यामुळे स्वतः च्या मनाला, शरीराला यातना होतील, कष्ट पडतील म्हणून मग दुस-याच्या डोक्यावर खापर फोडलं की मनाला आंजारुन-गोंजारुन माझी तर चूक नव्हतीच हे समजावणं सोप्पं होऊन जातं एकदम्म!!
आयुष्य परोपरीने समजावयाचा प्रयत्न करतं पण ज्यांना स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायचीच नाही ते त्या अमोल सारखे फक्त रडतच बसतात.
#triggeringthoughts
No comments:
Post a Comment