तर उन्हाळी कामांचे दोन महत्वाचे टप्पे महत्प्रयासाने पार पाडल्यावर तिसरा आणि शेवटचा टप्पा आकार घ्यायला लागायचा.
कैरीचं लोणचं, तक्कू, पन्हं, आंबा पोळी हे सगळे चटक-मटक जिन्नस बनवण्याचं काम चालू असायचं.
तसं बघितलं तर उन्हाळा सुरु झाल्यापासून आमचे बाबा आठवडी बाजारातून कै-या आणायचे, ज्याचं इन्स्टंट लोणचं आई करायची. म्हणजे फक्त २/४ कै-या बारीक चिरून त्याला तिखट-मीठात घोळवून त्यावर जिरे-मोहरी-हिंगाची खमंग फोडणी 😋 अहाहा आठवलं तरी तोंडाला पाणी सुटलं. ती आंबटढाण कैरी त्यात तिखट-मीठ अहाहा,लाजवाब 😘 😘 😘 पण हे इन्स्टंट लोणचं एका दिवसात संपायचं, वर्षभरासाठी जे बनवलं जायचं ते पहिला पाऊस झाल्यावर ज्या कै-या मिळतात ना त्याचं बनवतात म्हणजे ते मस्त मुरतं आणि पुढचं अख्खं वर्ष खराब न-होता राहतं.
लोणचं म्हणजे आम्हा पोरांचा अतिशय आवडता 'पदार्थ'! नाश्त्याचा सोबती, जेवणाच्या ताटातला अविभाज्य भाग आणि लगे हात काकडी नाहीतर नुसताच खायला म्हणून पण अत्यंत उपयुक्त असा हा 'आॅलराऊंडर' पदार्थ 😄 😄 म्हणजे मला आठवतं की शाळेच्या डब्यात ब-याचदा फक्त लोणचं-पोळी असं पण घेऊन जायचो आम्ही किंवा घरी आल्यावर नावडती भाजी असेल तर लोणचं(भाजी इतकी क्वांटिटी हं) त्यावर थोडंसं तेल घालून पोळीसोबत मिटक्या मारत खायचं, यापेक्षा टेस्टी मेन्यू अजूनही सापडला नाही मला 😜
आणि फक्त कैरीचंच लोणचं हवं असं नाही आमच्याकडे लिंबाच्या लोणच्याचे पण दोन-तीन प्रकार करायची आई - साधं तिखट-मीठाचं लोणचं, उपासाचं काळीमिरी-सैंधव मीठ घातलेलं लोणचं आणि गोड लोणचं 😘 😘 पण ते पावसाळा-हिवाळ्यात जेंव्हा लिंबं स्वस्त मिळतात तेंव्हा बनायचं.
लोणच्याचा कंटाळा, नाही हो तो तर आज ३४वर्ष झाली कधी आला नाही मला आणि यापुढे कधी येईल असं वाटत नाही😄 म्हणण्यापेक्षा कैरीचा आणखीन एक असाच चविष्ट पदार्थ म्हणजे तक्कू किंवा टक्कू. हिरवीगार,करकरीत आंबट कैरी खिसून त्यात तिखट-मीठ घालून मस्त मुरु द्यायचं जेंव्हा खायचं तेंव्हा त्यातला थोडा खिस घेऊन त्यावर खमंग फोडणी घालायची आणि तक्कू तय्यार तुमच्या जिभेची तृष्णा भागवायला 😊 😊 आठवणीनेच I am drooling mannn 🤤😋😋
तप्त उन्हाळ्यामधे बाहेरून काम करुन आलं किंवा चार-पाच वाजता चहाऐवजी काय 'थंड' पेय घ्यावं यासाठी हमखास एक उत्तर म्हणजे कैरीचं पन्हं! तसं ते बनवणं थोडं जिकिरीचं आहे पण आई महत्वाचा टप्पा पार करवून द्यायची. कैरी उकडून त्याचा गर काढून दिला की त्यात पाणी, मीठ, गुळ(काहीजण साखर पण टाकतात) हे टाकून ढवळत बसायचं आणि मधून मधून चमचा-चमचा औषध प्यायल्यासारखं ते पन्हं पिऊन बघायचं. मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं मग गूळ कमी पडला की गूळ घालायचा असा चांगला तासाभराचा कार्यक्रम आमच्यापैकी कोणीतरी करत बसायचं!
एकदा का सगळी परफेक्ट चव तयार झाली की त्यात वेलची पूड घालून ते पन्ह्याचं भांडं फ्रिजमधे ठेऊन द्यायचं आणि हुक्की आली की ग्लास भरभरून पीत बसायचं 😄 😄 काय सुखाचे दिवस होते यार ते 😍 😍
जसजसे आंबे मिळायला लागायचे तसा आंब्याचा रस हाही एक असाच 'मेडिटेशन' करायचा उत्तम पर्याय सुरु व्हायचा.
आंबे स्वच्छ धुवून त्यांना माचून एका ताटात ठेवायचं. आमचं कुटुंब मोठं त्यामुळे एकावेळेला रस करायचा म्हणजे क्वांटिटी पण जास्त लागायची. आंब्यांना माचून माचून हात गळून जायचे!
एक एक आंबा घेऊन त्याचा देठ काढून अगदी एक म्हणजे एकच थेंब रस टाकून द्यायचा म्हणजे आंब्याच्या देठाला चुकून माकून काही तेल असेल तर निघून जायला. मग तो आंबा पिळायचा आणि त्यातला रस एका भांड्यात गोळा करायचा. मग कोय अगदी पिळून तिला असलेला रसाचा शेवटचा थेंबही निपटून काढायचा.कोयीची ही कथा तर सालींवर अत्याचार होणार नाही असं कसं शक्य आहे! शेवटी आंबा आहे यार तो, त्याचा एकेक थेंब अमृतापेक्षा मौल्यवान आहे 😘 😘 साली-कोयींना अगदी निपटून काढत सगळ्या आंब्यांचा रस काढून झाला की त्याला मिक्सरमधून एकदा एकजीव करुन घ्यायचं आणि रस भरलेलं ते भलं-मोठं भांडं फ्रिजमधे जाऊन गाssर व्हायला विराजमान व्हायचं!
यानंतर दोन्ही हाताच्या बोटांना लागलेला रस, मिक्सरचं भांडं चाटून लख्ख स्वच्छ करणे हा माझा अत्यंत आवडता छंद, जो अजूनही जोपासलेला आहे 😄 😄
आमरसासोबत खायला म्हणून कुरडया तळल्या जायच्या.आंब्याच्या रसात ती कुरडई बुडवली की चर चर असा आवाज येतो 😄 😄 आंबट-गोड रस आणि कुरडया हे एक जबरदस्त काॅम्बिनेशन आहे 👍👏👏
उन्हाळ्यात जसे कैरी, आंबे महत्वाचे तितकंच महत्व टरबूज(कलिंगड) आणि खरबूजाला सुध्दा होतं आमच्यासाठी. आठवडी बाजारातून अगदी पाच-पाच किलोचं भलं-मोठ्ठं कलिंगड आणायचं. विकत घेतांनाच त्याला एक चिर पाडून ते लालचुटूक आहे की नाही याची खात्री करुन घ्यायची.घरी आणलं की स्वच्छ धुवून त्याला कापड गुंडाळून माठाखाली थेंब थेंब होणा-या अभिषेकाखाली गार व्हायला ठेऊन द्यायचं.
आमच्या घराला मोठा चौक होता तिथे सगळेजण रात्रीची जेवणं झाली की कलिंगडावर ताव मारायला बसायचो. आमचे बाबा या मोहिमेचं नेतृत्व करायचे.भल्यामोठ्या कलिंगडाला चिरून त्याचे एकसारखे काप करुन आम्हा सर्वांना द्यायचे.रात्रीच्या क्वचित उष्ण-क्वचित गार अशा हवेत बसून गारेगार कलिंगडाच्या फोडी खाणं हा सुखाचा परमोच्च बिंदू असायचा 😊 😊 😊
टरबूज आणि विशेषतः खरबूजाच्या बिया स्वच्छ धूवून वाळवून फोडून खाण्याचे अयशस्वी प्रयत्नही क्वचित केले होते पण ते वेड काही फार उन्हाळे टिकलं नाही आमच्यात 😜
या सगळ्या आनंदलहरींवर स्वार होत होत मे महिना संपायचा. पावसाळ्याची चाहूल लागायची. कै-या,आंबे,कलिंगड सगळं आपसूक मागे पडायचं..
आदल्या वर्षी केलेलं लोणचं संपून त्याची बरणी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून नवीन लोणच्याचं स्वागत करायला सज्ज व्हायची.
पहिला पाऊस झाला की आमचे बाबा एका खास मार्केट मधे जाऊन लोणच्याची जी स्पेशल कैरी असते तिचे काप करुन आणायचे. साधारण १०किलो+ कै-यांचे काप घरी आल्यावर स्वच्छ पुसून घ्यावे लागायचे.आम्ही चिल्लर पार्टी हे कै-यांच्या फोडी पुसणे, मधूनच तोंडात टाकणे असं करेपर्यंत आईची पुढची तयारी चालू असायची. फोडींना लावायला म्हणून तिखट आणि मीठ योग्य प्रमाणात मिसळून ठेवलं जायचं. ते कै-यांच्या फोडींना लावतांना हाताची मस्त आगाग व्हायची आणि तोंडाला पाणी सुटायचं 😄 अजूनही त्या तिखट-मिठात घोळवलेल्या फोडींची चव जिभेवर रेंगाळते 😘 😘
तोवर आईचं पुढचं काम चालू झालेलं असायचं,
मोहरीची दाळ आणि मेथ्या किंवा मेथीचे दाणे खरपूस भाजणे. ते गार होईपर्यंत तेल कडकडीत गरम करुन त्यात जिरे-हिंगाची फोडणी तडतडायला लागायची. मग भाजून ठेवलेल्या मेथ्या आणि मोहरीच्या दाळीची भरड केली जायची. सगळा माल छान गार झाला की एकत्र केला जायचा. तेलामधे मेथ्या-मोहरीची भरड केलेली पूड आणि तिखट-मिठाने माखलेल्या कैरीच्या फोडी टाकून व्यवस्थित मिसळल्या जायचं. प्रत्येक फोडीला सगळा मसाला लागलाय की नाही ह्याकडे आईचं बारीक लक्ष असायचं.
एकदा का हे मिश्रण तयार झालं की त्याला लोणच्याच्या बरणीत भरून,बरणीचं तोंड घट्ट बंद करुन जिथे ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलं जायचं. मग रोज सकाळी आई ती बरणी उघडून लोणचं वर-खाली हलवायची,कधी कधी अख्खी बरणी पण गदागदा हलवली जायची!
हळूहळू मग या लोणच्यावर आमच्या उड्या पडायला सुरूवात व्हायची. सुरूवातीला फोडी अगदी टणक लागायच्या मग हळूहळू लोणचं मुरायला लागायचं 😋😋😋
इतक्या निगुतीनं केलेलं आईच्या हाताची चव घेऊन मुरलेलं ते लोणचं म्हणजे लाजवाबच!
सिट्रीक अॅसीड किंवा कृत्रिम आंबटपणा टाकून बनवलेल्या विकतच्या 'ब्रँडेड' लोणच्यांना त्याची सर येणं कधीच शक्य नाही!
No comments:
Post a Comment