तर मे महिना उगवला की वर्षभर लागणाऱ्या धान्याची, हळद, तिखट, गरम मसाला, शिकेकाई इ. गोष्टींची तरतूद करायला आई-बाबांची लगबग सुरु व्हायची.
औरंगाबाद मधे मोंढा म्हणून एक भाग आहे, ते नाव असं का आहे नो आयडिया पण मी कायम तेच नाव ऐकत आले, तर तिथून सगळी खरेदी केली जायची. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तुरीची डाळ, चण्याची डाळ ह्या गोष्टी मुख्यत्वेकरून आणल्या जायच्या.
हे सगळं धान्य साठवायला आईने खास कोठ्या (पत्र्याचे मोठे चौकोनी बाॅक्स) बनवून घेतले होते. आधीच्या वर्षीचं धान्य संपलं की ह्या सगळ्या कोठ्या आम्ही स्वच्छ धुऊन म्हणजे, पार त्यात आत जाऊन बसून वगैरे स्वच्छ केल्याचं आठवतं मला 😜 कारण गहू साठवायची कोठी चांगली १क्विंटल म्हणजे १००किलो गहू साठवू शकतो इतक्या ताकदीची होती!
ह्या कोठ्या धुतल्यावर चांगल्या आठवडाभर उन्हात ठेऊन वाळवल्या जायच्या.
ठरलेल्या दिवशी आमचे बाबा त्या होलसेल धान्याच्या दुकानातून गहू, तांदूळ,ज्वारी आणि डाळींची पोती घेऊन यायचे. आमचं घर तीन मजली होतं त्यामुळे ही सगळी पोती पाठीवर टाकून बाबांना वर घेऊन यावी लागायची! आमचे बाबा म्हणजे उत्साह आणि ताकदीचा सुंदर मिलाफ!२५किलोचं पोतं बाबा खांद्यावर सहज उचलून तीन मजले चढून वर गच्चीवर नेऊन ठेवायचे!
धान्य एकदा घरात आलं की त्याला ऊन देणे हे सगळ्यात महत्वाचं काम असायचं. कारण, वर्षभराची ही बेगमी सगळे सोपस्कार न-करता जर तशीच ठेवली तर नुकसान झालंच म्हणून समजा!!
तांदूळाव्यतिरिक्त बाकी सगळं धान्य आठवडाभर उन्हात लोळवत ठेवलं जायचं! तांदूळाला मात्र ऊन वर्ज्य बरं! आई म्हणायची तांदूळाला ऊन सहन होत नाही, त्याचे लगेच तुकडे पडतात. त्यामुळे नाजूक-साजूक तांदुळाची रवानगी सावलीची मजा चाटवून, एखाद-दोन दिवसात कोठीमधे केली जायची.
गहू वाळवायला भलंमोठं प्लास्टिक वापरलं जायचं आणि एक एक करुन गव्हाची पोती उघडून त्यातला गहू हाताने, डबा, वाटी ज्याला जे साहित्य वापरून करायचं त्याने बाहेर काढून त्या जाजमावर पसरवला जायचा. सरतेशेवटी पोतं उलटं करुन, झटकून त्यातला एक न एक दाणा बाहेर काढला जायचा.मग सगळे गहू एकसारखे पसरवले जायचे जेणेकरून सगळ्या दाण्यांना व्यवस्थित ऊन लागेल. हे काम माझ्या खास आवडीचं, त्या गार गार दाण्यांचा तळहाताला गुदगुल्या करणारा स्पर्श फार आवडायचा मला 😊 पण, या सगळ्या उद्योगात हातांना, कपड्यांवर क्वचित तोंडावर त्या गव्हाला लागलेला 'खकाना' (म्हणजे धूळ हो) जी चिकटायची ती पार आंघोळ केली तरी नीट निघायची नाही 😟 शेतात लोक कसे काय काम करतात खरंच हॅट्स-आॅफ टू देम!
तर, गव्हाची पोती, त्यांचं तोंड बंद करायला वापरलेली सुतळी ह्या गोष्टी सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवायचे आई-बाबा, त्यांनी याबाबतीत कधी काही ज्ञानामृत नाही पाजलं आम्हांला पण, त्यांच्या ह्या साध्या कृतीतून सगळं व्यवस्थितपणे करायच्या सवयी मात्र सहज लागल्या.
गहू आणि इतर धान्य गच्चीभर वाळत घातलेलं असायचं, पण नुसतंच वाळत पडलंय असं करुन चालत नव्हतं! चिमण्या, कबुतरं टपलेलीच असायची धान्याची नासधूस करायला. त्यामुळे मग हातात भली मोठी काठी घेऊन राखणदार म्हणून एकेकाची ड्युटी लागायची. आमच्या गच्चीवर काही विशेष आडोसा किंवा खोली नव्हती बांधलेली त्यामुळे, डोक्याला रुमाल बांधून एखाद्या दगडाच्या तुकड्यावर नाहीतर लाल मातीच्या विटेवर बूड टेकवून हातात काठी घेऊन बसावं लागायचं. थोड्या थोड्या वेळाने बदलीचा माणूस म्हणजे आई-बाबा, ताई पैकी कोणी यायचं आणि तात्पुरती सुटका व्हायची.निघतांना किंवा आल्यावर त्या गरमागरम धान्यावरुन एकवार हात फिरवला जायचा, क्षुल्लक वाटणारी पण अतिशय महत्वाची स्टेप!
सुटका झाली की खाली येऊन हाशहुश करत घरात आलं की डोळ्यासमोर अंधारीच यायची, पटकन दिसायचं नाही,मग उगाच आपलं आंधळ्यासारखं चाचपडत चालायचं 😜
धान्य साठवणं फार जिकिरीचं काम हो! ज्या कोठ्यांंमधे साठवायचं त्यांची जागा पण पाण्यापासून लांब असायला हवी, जमिनीपासून थोड्या उंचीवर हवी, अगदीच भिंतीला खेटून नको, एक ना दोन शंभर गोष्टी!! बापरे 🙏
हे तर कौतुक फक्त कोठ्यांचं, धान्याचे तर वेगळेच लाड पुरवावे लागायचे!
त्यांना पावडरी काय लावा, इंजेक्शनं काय द्या, कधी कडुलिंबाचा पालाच ठेवा तर कुठे आयुर्वेदीक गोळ्या खाऊ घाला 😜
बरं हे सगळं धान्य वाळवणं झालं की लगेच कोठीत भरलंय असं नव्हतं काही! ते चाळून, निवडून क्वचित पाखडून ठेवावं लागायचं. उग्गाच नाही अख्खी दोन महिन्याची सुट्टी द्यायचे आमच्या शाळेवाले, घरोघरी हीच कामं चालायची मग पोरांची फौज हाताशी हवीच नं 😁 😁
गव्हाला 'टॅन' करुन झालं की सुरु व्हायचा दुसरा टप्पा! ते चाळून,स्वच्छ करुन कोठीत भरणे! त्यासाठी खास अशी चाळणी वापरतात. त्या चाळणीची खासीयत म्हणजे, गव्हाचा टपोरा दाणा बरोबर चाळणीत राहतो आणि त्यापेक्षा आकाराने लहान दाणे, खडे (हो त्याकाळी गव्हामधे प्रचंड म्हणजे Mr.India सिनेमात दाखवले आहेत नं, तितकेच खडे पण असायचे!), काडी-कचरा, चिमणी-कावळ्याची शी असला कै च्या कै असलेला कचरा खाली पडायचा.पण तो कचरा सरसकट फेकायचा नाही बरं, त्यात जे गव्हाचे दाणे असतात ते वेगळे करायला अजून एक चाळणी वापरायची माझी आई.दिवसेंदिवस हे काम चालायचं, करतांना कंटाळा यायचा, वाटायचं कित्ती गं हे काम आई, देना फेकून तो कचरा 😩
पण शेतक-याची पोर ती, दाण्या-दाण्याचं महत्व तिच्याइतकं कोणाला असणार, म्हणायची हे दाणे सुद्धा स्वच्छ करुन निवडून वापरता येतात, फेकायचे कशाला!
अर्थात तेंव्हा या वाक्यातला सगळाच अर्थ समजायचाच असं नाही पण, ते बघून किंवा करुन मनावर संस्कार नक्कीच होत होते.
महत्प्रयासाने ही कामं आटपून भरलेल्या कोठ्या जागच्या जागी स्थिरावल्या की एकदाचा आम्हां पोरांचा जीव कोठीत आपलं भांड्यात पडायचा!!
आई-बाबा मात्र लगेच पुढचं मिशन सुरु करायचे.
हळद, तिखट आणि काळा मसाला बनवायचं साहित्य येऊन ठेपायचं. एकीकडे हळकुंडाचे तुकडे करुन, सुक्या तिखट मिरच्यांचे देठ काढून वेगवेगळ्या डब्यांमधे भरून तयार ठेवलेले असायचे. तोवर दुसरीकडे काळ्या मसाल्यासाठीचे जिन्नस मग त्यात धने, जिरे, दगडीफुल इ. खरपूस भाजतांना सगळं घर मसाल्याच्या घमघमाटाने भरून जायचं 😊
यासोबतच वर्षभर पुरेल इतकी शिकेकाई पावडर पण बनवण्याचं साहित्य एकत्र केलं जायचं त्यासाठी शिकेकाई, रिठा, नागरमोथा आणि बावंची/बावची हे योग्य प्रमाणात एकत्र करुन एका खास डब्यामधे दिले जायचे.
या सगळ्या डब्यांची वरात मग 'मसाला कांडप केंद्रा'कडे निघायची. तिथे नंबर लावून, 'शिकेकाई सर्वात शेवटी करा हं, नाहीतर मसाल्याला उगाच वास लागेल', असा सज्जड दम भरून आम्ही घरी यायचो.तयार झालेले मसाले,हळद-तिखट वगैरे आठवडा-पंधरा दिवसांनी बाबांसोबत जाऊन घेऊन यायचे. त्या कांडप केंद्रात येणारा सगळ्या मसाल्यांचा तो जरासा उग्र पण रिफ्रेशिंग वास फार आवडायचा मला 😊
वेळ मिळाला की बाजारातून आणलेल्या चिंचेचा नंबर लागायचा.चिंचेला शक्य तितकं स्वच्छ करुन, मीठ आणि हिंग लाऊन त्याचे गोळे एका मोठ्या काचेच्या बरणीत भरून ठेवले जायचे.आणि लगोलग ती बरणी जायची माळ्यावर. ऊन आणि पोरांच्या तावडीत सापडू नये म्हणून 😄
यानंतर आई करायला घ्यायची सातुचं/सत्तुचं पीठ - हा पण आमच्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ, उन्हाळी मेव्यातला वन आॅफ दी इम्पाॅरटंट!
अत्यंत पौष्टिक आणि करायला, खायला पण एकदम सोप्पा.
धुतलेले गहू, फुटाणाच्या डाळ्या किंवा चण्याची डाळ, सुंठ, जिरे, वेलची किंवा जायफळ हे सगळं भाजून एकत्र दळूण आणायचं.
दुपारच्या उन्हातून घरात आलं किंवा चार/पाच वाजता भूक लागलेली असली की गार दूध किंवा पाण्यात थोडं सातुचं पीठ आणि गूळ घालून खायचं 😋😋
एकदा काय झालं आई जरा बाहेर गेलेली, बाबा आॅफिसमधे, त्यामुळे फक्त आम्ही पोरं आणि आजोबा घरात होतो.
पाच वाजता सातुचं पीठ खाऊया म्हणून ठरलं. मग शोधाशोध केली आणि एका डब्यात सापडलं, सगळ्यांना पुरेल इतकं पीठ घेऊन सगळ्या सोपस्कारासकट ते तयार केलं. खातांना काहीतरी वेगळा वास जाणवत होता नाकाला पण कोणी काही बोललं नाही. सगळ्यांनी अगदी मिटक्या मारत संपवलं! घरी आल्यावर आईने विचारलं, काय खाल्लं संध्याकाळी, आम्ही सांगितलं 'सातूचं पीठ!' आईला काय वाटलं माहीत नाही, तिने कोणत्या डब्यातून घेतलं विचारलं, आम्ही दाखवला. आईने कपाळावर हात मारला आणि हसायला लागली, म्हणाली अरे ती चकलीची भाजणी आहे!! 😂😂😂
अशा गमती-जमतींसकट उन्हाळी कामांचा आणखीन एक महत्वाचा टप्पा सुफळ संपूर्ण व्हायचा 👏👏👏
No comments:
Post a Comment